मोदींना आणखी एक संधी द्यावी : सुभाष देसाई

मोदींना आणखी एक संधी द्यावी : सुभाष देसाई

नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्याची फळे दिसायला थोडा अवधी लागेल. शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळाल्याने कर्जमाफीची मागणीच होणार नाही. डिजिटलायझेशनमुळे भ्रष्टाचार थांबला आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठीही मोदी कठोर पावले उचलू शकतात. त्यामुळे जनतेने त्यांना आणखी एक संधी द्यावी, असे सर्वांचेच मत आहे.- सुभाष देसाई

रेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्याची फळे दिसायला थोडा अवधी लागेल. शेतकऱ्यांना थेट अनुदान मिळाल्याने कर्जमाफीची मागणीच होणार नाही. डिजिटलायझेशनमुळे भ्रष्टाचार थांबला आहे. देशाच्या सुरक्षिततेसाठीही मोदी कठोर पावले उचलू शकतात. त्यामुळे जनतेने त्यांना आणखी एक संधी द्यावी, असे सर्वांचेच मत आहे. तसेच, गेल्या पंधरा वर्षांच्या कॉंग्रेस आघाडीच्या राजवटीच्या तुलनेत राज्य सरकारचीही कामगिरी उजवी आहे, अशी भूमिका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी "सकाळ'चे प्रतिनिधी कृष्णा जोशी यांच्याशी बोलताना मांडली...

प्रश्न : 'अच्छे दिन'बाबत पंतप्रधान मोदी काहीही न बोलता राष्ट्रवादाबद्दलच बोलत आहेत, अशा वेळी शिवसेना कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार?
देसाई : विकास हा आमच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा आहे. नरेंद्र मोदी यांनी चांगले निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे. त्याची फळे दिसायला वेळ लागणार असल्याने, मोदींना अजून एक संधी द्यावी लागेल. स्वच्छ भारत, डिजिटलायझेशन, लाभार्थींच्या बॅंक खात्यात थेट अनुदान या त्यांच्या अत्यंत चांगल्या योजना आहेत. गेली साठ वर्षे होणारी सरकारी योजनांमधील पैशांची गळती आता डिजिटलायझेशनमुळे थांबून सर्व पैसा जनतेपर्यंत पोहोचू लागला आहे. त्यामुळे भ्रष्टाचार थांबलाय, तसेच पैशांची बचत होत असून, त्याचा चांगल्या कामासाठी वापर होऊ लागला आहे. देशात 34 कोटी नवी बॅंक खाती उघडली गेली असून, त्यामुळे पारदर्शक व्यवहारांना चालना मिळेल. रेल्वेचे जाळे विस्तारले आहे, पारपत्रासाठी अर्ज करताच तो पंधरा दिवसांत घरी येऊ लागलाय. शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम थेट बॅंक खात्यात मिळू लागल्याने, शेतकरी स्वावलंबी होईल. शेती सुधारणांसाठी शेतकऱ्याला अर्थसाह्य आवश्‍यक आहे, त्यासाठी कर्ज घ्यावे लागते. मात्र, आता हे अनुदान मिळाल्याने कर्जाची आणि कर्जमाफीची गरजच राहणार नाही. अर्थात, शेतकऱ्यांना मिळणारी अनुदानाची रक्कम कमी आहे आणि ती वाढवावी, अशी आमची मागणी आहेच.

प्रश्न : दहशतवादाच्या निप्पातासाठी केलेल्या "सर्जिकल स्ट्राइक'चे पाऊल योग्य आहे का?
देसाई : होय, उलट हे हल्ले जास्त धारदार व्हावेत, असे आमचे मत आहे. देशाची सुरक्षितता हा आमच्या प्रचारातील दुसरा प्रमुख मुद्दा राहणार आहे. पूर्वी दहशतवादी हल्ल्यांनंतर कॉंग्रेस नेते फक्त निषेध व्यक्त करीत असत. मात्र, अमेरिका, इस्राईलप्रमाणे मोदींनी जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ती कारवाई अजून पूर्ण झालेली नाही, आम्ही नव्या सरकारमध्ये असू आणि गरज लागली, तर वारंवार अशी कारवाई करण्यास आम्ही भाग पाडू. मात्र, विरोधक अजूनही या सर्जिकल स्ट्राइकवर शंका घेत आहेत. कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यातून देशद्रोहाचे कलम काढण्याची हमी दिलेली आहे. याचा अर्थ त्यांना देशद्रोह्यांना मुक्त करायचे आहे आणि त्यास त्यांच्या अन्य सहकारी पक्षांचीदेखील साथ आहे.

प्रश्न :  मात्र मोदी हे विकासापेक्षा राष्ट्रवादाला महत्त्व देत आहेत?
देसाई : विरोधक आणि प्रसारमाध्यमे राष्ट्रवादाचा मुद्दा उपस्थित करतात तेव्हा त्यांना प्राधान्याने उत्तर देणे आवश्‍यक आहे. पण, याचा अर्थ मोदींनी विकासाचा मुद्दा गौण ठरवला, असा होत नाही. भाजपच्या संकल्पनाम्यात विकासाचे मुद्दे असून, त्याचे आम्ही स्वागत केले आहे. त्यातील देशहिताच्या मुद्यांना प्राधान्य देऊन शिवसेना त्यासाठी काम करीत राहणार आहे.

प्रश्न : हिंदुवाद्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा राममंदिर, समान नागरी कायदा, काश्‍मीरचे वेगळेपण संपवणे या मुद्यांबाबत मोदींनी पुन्हा पुढची तारीख दिली आहे, हे कुठपर्यंत सुरू राहणार?
देसाई : राममंदिरासाठी दिलेली मुदतवाढ आम्हाला मंजूर नाही, हा प्रश्न आम्ही ऐरणीवर आणला आहे आणि तो आमच्या प्राधान्यक्रमावर आहे. किंबहुना निवडणुकांनंतर पुन्हा अयोध्येला जाण्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच जाहीर केले आहे. काश्‍मीर, समान नागरी कायदा या मुद्यांबाबत विरोधक संभ्रम पसरवीत आहेत. मात्र, याबाबत कोणतीही तडजोड नको, काश्‍मीर हा आपलाच अविभाज्य भाग असून, त्याबाबत गरजेनुसार कायद्यात बदल करणे जरुरी आहे, अशी आमची भूमिका आहे. मात्र, विरोधक अशी ठाम भूमिका न घेता देशहिताकडे दुर्लक्ष करीत आहेत.

प्रश्न : राज्य सरकारच्या कामगिरीवर शिवसेना समाधानी आहे का?
देसाई : या सरकारची कामे आम्ही केव्हाही अडवली नसून, उलट त्यात सुधारणाच केल्या. कर्जमाफी सर्वंकष असावी, असे आमचे म्हणणे होते. प्रधानमंत्री फसल बिमा योजनेतील विमा कंपन्यांची कार्यालये फक्त मुंबईऐवजी निदान तालुका पातळीवर तरी असावीत, हे आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणले आहे. साधारणपणे गेल्या पाच वर्षांतील राज्य सरकारची कामगिरी समाधानकारक आहे आणि गेल्या पंधरा वर्षांच्या कॉंग्रेस राजवटीच्या तुलनेत ती भरीव आणि स्वच्छ आहे.

प्रश्न :  तीन राज्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने दोन्ही पक्षांनी घाईने युती केली का?
देसाई : मी दोन्ही पक्षांबाबत बोलू शकत नाही. भाजपच्या आग्रहाचे संदर्भ त्यांना आणि सर्वांनाच ठाऊक आहेत. आमचे आदर्श असलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व आयुष्य कॉंग्रेसशी लढण्यात गेले. कॉंग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. अशा कॉंग्रेसला आमच्या भांडणामुळे पुन्हा सत्तेवर येण्याची संधी मिळणे योग्य नाही. आज देशाची परिस्थिती पाहता विरोधकांवर विश्वास ठेवता येत नाही, त्यांच्याकडे खंबीर नेताच नाही. चंद्रशेखर, गुजराल, देवेगौडा यांच्या कारकिर्दीत देशाची वाताहतच झाली. अशा खिचडी पक्षांच्या तुलनेत मोदी ठामपणे काम करीत आहेत, त्यांनी विकासाची दिशा पकडली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी मोदी कठोर पावले उचलू शकतात, अशी आता जगाचीही खात्री पटली आहे. कठोर निर्णयासाठी सक्षम नेता हवा आहे आणि आम्ही त्या स्वरूपात मोदींकडे पाहतो.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com