Give one month ration to daily workers appeals satish chavan | Sarkarnama

मोलमजुरांना एक महिन्याचे रेशन द्या - आमदार सतीश चव्हाण

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 25 मार्च 2020

राज्यातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना शासनाने  तातडीने एक महिन्याचे रेशन व इतर खर्चापोटी शक्य होईल ती आर्थिक मदत करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.   

औरंगाबाद: राज्यातील मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांना शासनाने  तातडीने एक महिन्याचे रेशन व इतर खर्चापोटी शक्य होईल ती आर्थिक मदत करावी अशी मागणी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.   

  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण आणि आपले महाविकास आघाडी सरकार, शासकीय यंत्रणा अतिशय नियोजनपूर्वक व धोरणात्मक पाऊले उचलून महाराष्ट्रातील जनतेचे रक्षण करीत आहात. समस्त मानव जातीसमोर आलेल्या या संकटाचा सामना आपण राज्याचे प्रमुख म्हणून  धैर्याने व गांभीर्याने करीत आहात. 

हा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी 'सोशल डिस्टंस' हा एकमेव सुरक्षित उपाय असल्यानेच आपण तो तातडीने ३१ मार्च पर्यंत महाराष्ट्र 'लॉकडाऊन'करुन अंमलात आणला. परंतु काल देशाच्या पंतप्रधानांनी आता हा 'लॉकडाऊन'कालावधी २१ दिवसांचा म्हणजे १५ एप्रिल पर्यंत केला आहे.

 अर्थात तो सध्या महत्वाचा उपाय आहे त्याविषयी दुमत नाही. परंतु याप्रसंगी एका गोष्टीची काळजी वाटते. ते म्हणजे आपल्या  राज्यातील हातावर पोट असणाऱ्या व्यक्तींच्या रोजीरोटीची. अनेक कुटुंब अशी आहेत कि ते मोलमजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकतात. रोज काम केल तरच त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटतो. त्यामुळे अशा कुटुंबीयांसाठी घरात राहून तीन आठवडे काढणे अश्यक्य आहे. 

आपण किराणा माल, भाजीपाला यांची दुकाने उघडी जरी ठेवली असली तरी या नागरिकांनी ते आणायचं तरी कसे ? त्यामुळे अशा नागरिकांचा देखील आपण विचार करणे गरजेचे असल्याचे आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

राज्यात गरीब माणसं उपाशी राहता कामा नये, या न्यायाने आपल्या सरकारने सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून गरीबांना एक महिन्याचे राशन व इतर खर्चापोटी आपणास शक्य होईल ती आर्थिक मदत त्यांना द्यावी. जेणे करुन या महामारी विरोधात लढत असताना आपले गोरगरीब बांधव घरात उपाशी राहणार नाहीत.

 तातडीने या उपाययोजना केल्या तर सर्व सामान्य लोकांच्या मनातील पोटाच्या भुकेच्या प्रश्नांसंबंधीची भीती दूर होवून ते या कामी आपणांस घरात राहून अधिक उपयुक्त मदत करतील सतीश चव्हाण यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख