औरंगाबाद महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त द्या; अंबादास दानवे यांची राज्यपालांकडे मागणी

औरंगाबाद महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त द्या; अंबादास दानवे यांची राज्यपालांकडे मागणी

औरंगाबादः महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त द्यावा अशी मागणी करणारे पत्र शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांना पाठवले आहे.

गेल्या महिनाभरापासून औरंगाबाद महापालिकेला आयुक्‍त नाही. डॉ. निपूण विनायक विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच प्रदीर्घ रजेवर निघून गेले होते. त्यांचा पदभार जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सोपवण्यात आला होता. पण निपूण यांनी रजा पुन्हा वाढवून घेतल्यानंतर आपल्याला पुढील आदेश नसल्याचे सांगत उदय चौधरी यांनी महापालिकेचा कारभार पाहण्यास नकार दिला होता.

महापालिकेची सोमवारी झालेली सर्वसाधारण सभा देखील आयुक्तांच्या गैरहजेरीतच झाली. शहरात डेंग्यूने अनेकांचे बळी घेतले, कचरा, आरोग्य, पाणीपुरवठा व रस्त्याचे प्रश्‍न देखील प्रलंबित आहेत. त्यामुळे आक्रमक झालेल्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत आयुक्तांना परत पाठवण्याची मागणी देखील महापौराकंडे केली होती.

त्यानंतर आज शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी देखील राज्यपालांकडे पत्र पाठवून महापालिकेला पुर्णवेळ आयुक्त देण्याची मागणी केली आहे. दानवे यांनी राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, महानगर पालिका अधिनियम 1949 चे कलम (67) (3) नूसार कार्यकारी अधिकार आयुक्तांना आहे.

परंतु आयुक्त प्रदीर्घ रजेवर असल्याने दैनंदिन कामात अनंत अडचणी येत आहेत. नजीकच्या काळात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका देखील होणार आहेत. त्यामुळे महापालिकेला कायमस्वरुपी आयुक्त मिळणे गरजेचे आहे. माननीय राज्यपाल महोदयांनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन महापालिकेत कायमस्वरुपी आयुक्तांची नेमणूक करावी अशी विनंती देखील या पत्रात करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com