गिरीश महाजन सिल्लोड नगरपालिकेत भाजपला सत्तेपर्यंत नेऊ शकतील का ?

गिरीश महाजन सिल्लोड नगरपालिकेत भाजपला सत्तेपर्यंत नेऊ शकतील का ?

औरंगाबाद : गेल्या पंचवीस वर्षापासून जालना लोकसभा मतदारसंघातील सिल्लोड नगरपरिषदेवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता आहे. सिल्लोड - सोयगांवचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांच्या राजकीय कारकीर्दीत मैलाचा दगड ठरलेल्या नगरपरिषदेच्या अध्यक्षपदासह नगरसेवकांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होत आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा विश्‍वास दाखवत पक्षनेतृत्वाने सिल्लोड नगरपरिषेदत कमळ फुलवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवल्याचे दिसते. 

धुळे, नाशिक, नगरसह राज्यातील अनेक महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला सत्ता मिळवून देण्यात गिरीश महाजन यांनी महत्वाची भूमिका पार पाडली होती. किंगमेकर ठरलेले गिरीश महाजन ज्या जिल्ह्यात जातील तिथे भाजपला सत्ता मिळाली. त्यामुळे आत्मविश्‍वास वाढलेल्या महाजनांनी थेट बारामतीला आव्हान देत बारामती नगरपरिषद देखील जिंकून दाखवतो असे आव्हान दिले होते. 

या पार्श्‍वभूमीवर मोदी लाटेत केवळ आपला मतदारसंघच नाही, तर नगरपरिषदेतील सत्ता देखील कॉंग्रेसकडे कायम राखण्यात यशस्वी ठरलेले आमदार अब्दुल सत्तार यांना टक्कर देण्यासाठी गिरीश महाजन यांना थेट सिल्लोडमध्ये पाठवण्यात आल्याची चर्चा आहे. रविवारी गिरीश महाजन यांची जाहीर सभा सिल्लोडच्या प्रियदर्शनी चौकात पार पडली. यावेळी केलेल्या तडाखेबंद भाषणात महाजन यांनी कॉंग्रेस आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टीका केली. 

पंचवीस वर्षापासून अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कॉंग्रेसने शहराचे वाटोळे केले आहे, त्यांना विकासाशी काहीच देणेघेणे नसल्यामुळे आता भाजपला संधी द्या असे आवाहन सिल्लोडकरांना त्यांनी केले. यावेळी सत्तार यांच्या घरातच दोनवेळा नगराध्यक्षपद होते याचा उल्लेख करतांना त्यांनी त्यांच्या घराणेशाहीवरही हल्ला चढवला होता. 

आता गिरीश महाजनांच्या यांच्यामुळे सिल्लोडमध्ये नाशिक, धुळ्याची पुनरावृत्ती होते ? की अब्दुल सत्तार नगरपरिषदेतील सत्ता पुन्हा आपल्याकडे कायम राखण्यात यशस्वी ठरतात याचा फैसला 28 फेब्रुवारीच्या मतमोजणीनंतर होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com