गिरीश महाजनांच्या गृहमंत्री साधनाताई  पुन्हा जामनेरच्या नगराध्यक्षा होणार का ? - Girish Mahajan's wife Sadhanatai in Jamner municipality election | Politics Marathi News - Sarkarnama

 गिरीश महाजनांच्या गृहमंत्री साधनाताई  पुन्हा जामनेरच्या नगराध्यक्षा होणार का ?

कैलास शिंदे : सरकारनामा ब्युरो
सोमवार, 19 मार्च 2018

नाशिकचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला. मात्र आता आपल्या घरी (जामनेर)पालिकेवर अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हानही त्यांच्या समोर आहे.महाजन यांच्या पत्नी सौ.साधना महाजन निवडणूकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत.

जळगाव  : नाशिकचे पालकमंत्री असलेल्या गिरीश महाजन यांनी नाशिक महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविला. मात्र आता आपल्या घरी (जामनेर)पालिकेवर अस्तित्व कायम ठेवण्याचे आव्हानही त्यांच्या समोर आहे.महाजन यांच्या पत्नी सौ.साधना महाजन निवडणूकीत नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने या निवडणूकीत आघाडी केली आहे.

राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा जामनेर मतदार संघ आहे. गेल्या नगरपालिका निवडणूकीत आमदार महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपला पराभव पत्करावा लागला होता. 20 पैकी पक्षाचे केवळ सहा नगरसेवक निवडून आले होते. तर कॉंग्रेसचे दहा व राष्ट्रवादीचे चार नगरसेवक विजयी झाले होते.

त्याच बळावर कॉंग्रेस व राष्ट्रवादीने सत्ता स्थापन करून पारस ललवाणी यांना अध्यक्ष केले होते. परंतु अडीच वर्षानी महिला आरक्षण निघाले, त्यानतंर भाजपने साधना महाजन यांना उमेदवारी दिली आणि कॉंग्रेसचे तब्बल पाच नगरसेवक फोडले. अकरा सदस्यांच्या बहुमताच्या जोरावर भाजपने पालिकेवर आपला झेंडा फडकविला होता.

सद्यस्थितीत पालिकेवर भाजपचीच सत्ता आहे. सहा एप्रीलला मतदान होणार आहे. अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता. भाजप विरोधात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी केली आहे. चोवीस जागामध्ये बारा-बारा जागा वाटून घेतल्या आहेत. तर नगराध्यक्षपद राष्ट्रवादी कॉंग्रेसला देण्यात आले आहे.

या पदासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे प्रा.निलीमा उत्तम पवार यांनी अर्ज दाखल केला आहे.  भाजपने मात्र सर्व 24 जागावर निवडणूका स्वबळावर निवडणूका लढविल्या आहे. शिवसेनेची ताकद जामनेर शहरात फारशी नाही. भाजपची खरी लढत कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीशी आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. 

नाशिकला पालकमंत्रीपदाचा कस लावून महापालिकेत सत्ता मिळवून देणाऱ्या महाजन यांना आता आपल्याच जामनेरमध्ये भाजपची सत्ता आणण्यासाठी नेतृत्वाचे 'पाणी' जोखावे लागणार आहे.

यावेळचे वैशिष्ट म्हणजे जळगाव जिल्ह्यात भाजपत महाजन आणि खडसे यांच्यात खुला वाद आहे. त्यामुळे विरोधी कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडीला त्याचा फायदा होणार काय? सात  एप्रीलला निकाल लागेपर्यंत या निवडणूकीकडे जळगाव जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष असणार आहे. कारण मंत्री महाजन सद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्‍वासातील मानले जात आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख