जैन, खडसेंना शह देत गिरीश महाजन बनले "किंग'

जैन, खडसेंना शह देत गिरीश महाजन बनले "किंग'

जळगाव : जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे यांचे मजबुत किल्ले होते. मात्र या दोघांनाही टक्कर देवून गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिकेवर भाजपचा निर्विवाद झेंडा फडकवून आपणच "किंग' आहोत हे आता सिध्द केले. खडसे यांनी जैन यांच्यासोबत शत्रुत्व पत्करून जे वीस वर्षात साध्य केले नाही, ते महाजन यांनी अवघ्या एका वर्षात जैन यांच्याशी मैत्री करून महापालिकेतील सत्ता मिळवण्याचे उद्दिष्ठ साध्य केले असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नेतृत्वाबाबत नेहमीच चर्चा होत होती. सुरेशदादा जैन व एकनाथराव खडसे यांच्यात कट्टर विरोध आहे. दोघे नेते आहेत. परंतु जैन यांच्यासमोर मध्यंतरी महापालिकेतील कथित गैरकारभारावरून अनेक अडचणी निर्माण झाल्या. एकनाथराव खडसे यांच्या पक्षाची केंद्रात व राज्यात सत्ता आहे. मात्र त्यांना वैयक्तिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. पक्षातील अंतर्गत राजकारणामुळे त्यांना मंत्रिमंडळातून दूर व्हावे लागले. भाजपमध्ये जिल्ह्यात गिरीश महाजन व खडसे यांच्यात वाद असल्याने सांगलीतील चंद्रकांत पाटील यांना जळगावात पालकमंत्रीपदावर नियुक्त करण्यात आले. मात्र पाटील यांनी महापालिका निवडणुकीकडे पाठ फिरविली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव महापालिका निवडणुकीचे नेतृत्व केले. 

भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांनी महापालिकेच्या सभेत प्रचार केला असला तरी त्यांनी नेतृत्व मात्र केले नाही. त्यामुळे भाजपला यश मिळाले तरी खडसे मात्र त्यात नाही असेच म्हणावे लागेल. खडसे यांचे कट्टर समर्थक अशोक लाडवंजारी, सुनील माळी, श्रीमती तडवी, रविंद्र पाटील यांना पराभव पत्करावा लागला आहे. यात केवळ सुनील खडके हे खडसे समर्थक निवडून आले म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाजन यांनी खडसे यांच्या नेतृत्वालाही आता मागे टाकले आहे. तर दुसरीकडे सुरेशदादा जैन यांचे नेतृत्वही आता झाकोळले गेले आहे. 

विशेष म्हणजे जैन आणि महाजन यांचे सख्य आहे. महाजन हे जैन यांना आपले गुरू मानतात. एवढेच नव्हे जैन अडचणीत असतांना महाजन यांनी त्यांना साथ दिली परंतु निवडणुकीत मात्र त्यांच्या विरोधात ठामपणे उभे राहून त्यांना पराभवाचा चांगलाच झटका दिला आहे. त्यामुळे महाजन यांनी जैन यांच्या नेतृत्वालाही धोबीपछाड देवून जिल्ह्यातील आपल्या नेतृत्वावरही शिक्कामोर्तब केले असून जळगावच्या पालकमंत्रीपदाची वाटही मोकळी करून घेतली आहे. 

विकासाच्या राजकारणाला कौल : गिरीश महाजन 
शहराच्या विकासाच्या राजकारणाला लोकांनी भरभरून मतदान करून भाजपला विजयी केले आहे.जे व्देषाचे राजकारण करतात त्यांना जनतेने चपराक दिली असून हा आमचा ऐतिहासिक विजय आहे असे मत राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त व्यक्त केले. जळगाव महापालिकेच्या निवडणूकीत भाजपचे नेतृत्व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले होते. या विजयाबाबत बोलतांना ते म्हणाले, कि जळगावातील भाजपचा विजय हा ऐतिहासिक विजय आहे. जळगावकरांनी विकासाच्या राजकारणाला मत दिले आहे. जनतेला आज द्वेषाचे राजकारण नको आहे, विकासाचे राजकारणच हवे आहे हे सिध्द झाले आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आपले खातेही इथे उघडू शकलेली नाही, त्यामुळे जळगावकरांनी त्यांना मोठी चपराक लगावली आहे, त्यांनी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात केलेल्या विकासकामांची ही पावती आहे. जळगावात आपण जनतेला विकास कामाची जी हमी दिली आहे. ती पूर्ण करणार आहोत. असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

"एमआयएम' ला अनपेक्षित यश 
जळगाव महापालिकेत 1985 पासून सुरेशदादा जैन यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती. त्यांना नेहमीच बहुमत मिळाले आहे. तब्बल 33 वर्षानंतर जळगावकरांनी त्यांना बहुमतापासून दूर नाही तर अगदी कमी जागा देवून धक्का दिला आहे. त्यामुळे जैन यांची जळगावातील "दादागिरी'संपली असल्याचे निकालावरून दिसून आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस तसेच सपा आघाडीते तब्बल 77 जागा लढविल्या मात्र त्यांना एकाही जागेवर यश मिळाले नाही. त्यामुळे या पक्षाना हा मोठा धक्का आहे. विशेषत: राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत 13 जागा होत्या, यावेळी पक्षाला एकही जागा मिळालेली नाही. कॉंग्रेसला तर पुन्हा एकदा खातेही उघडता आलेले नाही. 
एमआयएम ने अनपेक्षितपणे यश मिळविले आहे. पक्षाने केवळ सहा जागावर निवडणूक लढविली होती. त्यापैकी तब्बल तीन जागावर यश मिळविले आहे. खासदार असदुद्दीन ओवेसी यानी जळगावात केवळ पंधरा मिनीटांची सभा घेतली त्यांना तीन जागावर यश मिळाले ही मोठे यश मानले जात आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com