एकनाथ खडसेंच्या साम्राज्यावर गिरीश महाजनांचा झेंडा !

खडसे यांनी ज्या प्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राज्यात उमटविला होता. त्याच प्रमाणे गिरीश महाजन यांनीही आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रात उमटविला आहे. पक्ष आणि सरकारच्या संकटसमयी त्यांनी वेळोवेळी यशस्वी मध्यस्थी केली आहे.
Khadse - Mahajan
Khadse - Mahajan

जळगाव :बदल हा निसर्गाचा नियम आहे. कोणाचाही काळ कायमस्वरूपी नसतोच, त्याला राजकारणही अपवाद नाही. त्यानुसारच भारतीय जनता पक्षानेही जळगाव जिल्ह्यात आता नेतृत्वाची कुस बदलली आहे.

एकेकाळी माजी महसूलमंत्री व पक्षाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या मार्गदर्शनाशिवाय पक्षाचे पानही हालत नव्हते. मात्र आता त्याच नेतत्वाला बाजूला करीत राज्याचे जलसंपदामंत्री व पक्षाचे संकटमोचक म्हणून ओळख निर्माण झालेले गिरीश महाजन यांच्याकडे आता जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. 

शिवाय आता त्यांच्याकडेच पक्षाच्या नेतृत्वाचीही धुराही आपोआपच आली आहे. त्यामुळे भाजपने अलगदपणे जळगाव जिल्ह्यातील नेतृत्वाची कुस बदलली आहे. 

प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि एकनाथ खडसे एकेकाळी भारतीय जनता पक्षाच्या मुलूख मैदान तोफ म्हणून ओळखले जात असत. 'मास'लीडर म्हणून त्यांची राज्याला ओळख होती. सत्तेवरील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस सरकारला आपल्या शब्दांच्या बाणांनी ते अक्षरश: घायाळ करीत होते. याच बरोबर राज्यात भाजपच्या बांधणीकडेही त्यांनी तेवढ्याच सक्षमपणे लक्ष दिले. बहुजनांचा पक्ष म्हणून 'भाजप'ला ओळख मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा निश्‍चितच आहे. 

राज्यात भाजपला सत्तेत आणण्यात गेल्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांचा मोठा वाटा होता. पक्षनेतृत्वाच्या आदेशाप्रमाणे तब्बल 25 वर्षाची शिवसेनेसोबत असलेली युती तोडून स्वतंत्रपणे निवडणूका लढविण्याचा मोठा निर्णय जाहिर करण्याचे धाडस त्यांनी दाखविले होते. विधानसभेत राज्यात भाजप सर्वात जास्त जागा मिळवून क्रमांक एकचा पक्ष असेल असे भाकितही त्यांनीच वर्तविले होते. आणि तेही खरे ठरले होते. 

राज्यात पक्ष सत्तेवर आल्यावर त्यांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची अपेक्षा होती. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळाली नाही. त्यानंतर झालेले 'राजकारण'पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. ताकदवान असलेले खडसे यांचे पक्षातर्गत महत्व कमी करण्यात आले. अगदी महाराष्ट्रातच नव्हे तर जळगाव जिल्ह्यातही ते कमी करण्यात आले. त्यांचे मंत्रीपद गेल्यावर जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पांडूरंग फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आली, त्यानंतर कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आणि आता जिल्ह्यातीलच गिरीश महाजन यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

खडसे यांनी ज्या प्रमाणे आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा राज्यात उमटविला होता. त्याच प्रमाणे गिरीश महाजन यांनीही आपल्या कार्याचा ठसा महाराष्ट्रात उमटविला आहे. पक्ष आणि सरकारच्या संकटसमयी त्यांनी वेळोवेळी यशस्वी मध्यस्थी केली आहे. या शिवाय महापालिकेपासून तर थेट लोकसभेपर्यत उत्तर महाराष्ट्रात भाजपला यश त्यांनी मिळवून दिले आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील भाजपचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. 

जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले. त्यावेळी जिल्ह्यातील भाजपचे नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र खडसे यांना विविध प्रकरणात मिळालेली "क्‍लिनचिट'लक्षात घेवून त्यांना विस्तारीत मंत्रीमंडळात शेवटच्या काही महिन्यासाठी संधी दिली जाईल अशी शक्‍यता वाटत होती. मात्र विस्तारानंतर आता तीही मावळली आहे. त्यामुळे आता पक्षाने जळगाव जिल्ह्यातील नेतृत्वाची जबाबदारी पक्षाने  गिरीश महाजन यांच्याकडे अलगदपणे सोपविली आहे.

 त्यामुळे आगामी  विधानसभा निवडणूक जिल्हयात भाजप  गिरीश महाजन यांच्याच नेतृत्वाखाली लढणार हे सुध्दा निश्‍चित झाले आहे. लोकसभा निवडणूकीत उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचा पक्षाला फायदा झाला आहे. आता विधानसभा निवडणूकीत प्रथमच गिरीश महाजन जळगाव जिल्ह्यात पक्षाचे स्वतंत्रपणे नेतृत्व करणार आहेत. जिल्ह्यात अकरा जागापैकी केवळ एक जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे आहे. तर एक जागेवर अपक्ष आमदार आहे. त्यामुळे आगामी निवडणूकीत सर्वच्या सर्व जागा युतीकडे मिळविण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे, त्यात यश आल्यानंतरच त्यांच्यावर खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होईल एवढे मात्र निश्‍चित.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com