Girish Mahajan given responsibility to win Dhule elections | Sarkarnama

गिरीश महाजन आता धुळे जिल्ह्यात भाजपचे ट्रबल शूटर  

निखिल सूर्यवंशी :  सरकारनामा ब्युरो 
शुक्रवार, 17 ऑगस्ट 2018

धुळे महानगरपालिका जिंकून दाखवू:  मंत्री महाजन 
'सरकारनामा'शी बोलताना मंत्री महाजन म्हणाले, " जळगाव, सांगली, जामनेर, पालघर आणि नाशिकप्रमाणे धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकून दाखवू. या निवडणुकांसाठी पक्षाने माझी प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. तशी घोषणा पक्षस्तरावरून लवकर केली जाईल. "

 

 धुळे : जळगाव महानगरपालिका निवडणुकीतील घवघवीत यशानंतर  वैद्यकीय शिक्षण व संशोधन, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन  यांचा भाजपमध्ये भाव वधारला आहे . डिसेंबरमध्ये होणाऱ्या धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पक्षीय सूत्रे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश स्तरावरील प्रमुख नेत्यांनी गिरीश महाजन यांच्याकडे सोपविली आहेत.  

भाजपमधील स्थानिक नेत्यांमधील  तीव्र संघर्षावर रामबाण उपाय करण्याचे आव्हान वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांवर यांच्यासमोर राहील . 
 

महापालिका, जिल्हा परिषदेची निवडणूक जवळ आल्याने विविध राजकीय पक्षांसह विद्यमान नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य आणि इच्छुकांनी कामाला सुरवात केली आहे. महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर जिल्हा परिषदेत कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे. 

भाजपचे नेते आमदार अनिल गोटे आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्यात राजकीय कलह सुरू असल्याचे सर्वश्रुत आहे. महापालिका निवडणुकीसाठी आमदार गोटे यांनी नवे चेहरे, कोरी पाटी असलेल्या इच्छुकांना नगरसेवक पदासाठी उमेदवारी देऊ असे घोषित केले आहे. कुणीही पैसे खर्च न करता निवडणूक लढवावी आणि मतदारांनी सत्ता परिवर्तन घडवावे, असे आवाहनही आमदार गोटे यांनी केले.

तत्पूर्वी, अनेक कार्यकर्त्यांकडून पक्षातील गटातटाचा वाद हा वारंवार मुख्यमंत्र्यांसह प्रदेशस्तरावर मांडला जात आहे. यात महापालिका निवडणुकीचे नेतृत्व कुणी करावे? यावरून गोटे आणि भामरे यांच्यात उघड वाद सुरू आहे. 

नेत्यांना पक्षाकडूनच धक्का 
असे असताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने प्रदेशस्तरावरून मंत्री गिरीश महाजन यांची प्रभारीपदी नियुक्ती करत त्यांच्या हाती धुळे महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची सूत्रे सोपविली. ते भामरे, गोटे, शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून महापालिका निवडणुकीसाठी पक्षांतर्गत जागा वाटपाचा 'फॉर्म्युला' तयार करतील.

याव्दारे गोटे आणि भामरे यांच्यातील कलहावर 'रामबाण' तोडगा काढतील. तसेच मंत्री रावल आणि ग्रामीण कार्यकर्त्यांशी संवाद साधून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रणनीती ठरवतील. मंत्री महाजनांच्या या नियुक्तीमुळे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला आहे, तर स्थानिक नेत्यांना मात्र धक्का बसल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख