girish mahajan | Sarkarnama

एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाला महाजनांचा पर्याय

कैलास शिंदे
शनिवार, 18 मार्च 2017

जळगाव : "दिवा' ते "कमळ' अर्थात "जनसंघ' ते "भाजप' अशा बदलाच्या दीर्घकालीन टप्प्यात जळगाव परिसरात भाजप केवळ रूजलाच नाही तर आज सत्ताधारी झाला आहे.

जळगाव : "दिवा' ते "कमळ' अर्थात "जनसंघ' ते "भाजप' अशा बदलाच्या दीर्घकालीन टप्प्यात जळगाव परिसरात भाजप केवळ रूजलाच नाही तर आज सत्ताधारी झाला आहे.

मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसेसारखा सर्वसामान्य कार्यकर्ता आमदार म्हणून निवडून आला एवढेच नव्हे तर त्याने आपल्या बळावर जिल्ह्यात नव्हे संपूर्ण खानदेशात कमळ फुलविले, जिल्हयातील हे नेतृत्व केव्हा राज्यापर्यंत पोहोचले हे कळलेच नाही. सर्वठिकाणी सत्तास्थाने ताब्यात आलेली असतांना एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाला राजकीय ग्रहण लागले. याच काळात गिरीश महाजन यांचे नेतृत्व पुढे आले त्यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आपली कार्यकुशलता दाखविली आहे हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे भाजपचे नेतृत्व बदलत्या वळणावर आहे. 
जळगाव जिल्हा म्हणजे एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजला जात असे.त्यावेळी कॉंग्रेसने कोणताही उमेदवार दिला तर तो सहज निवडून येवू शकतो असे म्हटले जात होते.

त्याच बळावर मुंबईचे नवशेर भरूचा जळगावातून कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडूनही गेले होते. अशा जळगाव जिल्ह्यात त्या काळात विरोधी पक्षाला कोणताही वाव नव्हता.

जनसंघाचा "दिवा'या िंठकाणी कधीच प्रकाशमान झाला नाही. तरीही (कै.) उत्तमराव पाटील यांनी आपला संघर्ष चालूच ठेवला, या बळावरच पुलोद सरकारमध्ये त्यांनी महसूल मंत्री पदावर स्थान मिळविले. पुढे भाजपची स्थापन झाल्यावर जळगाव जिल्ह्यात "कमळ' रूजविण्याचे त्यांनी काम केले. त्यांच्या नंतर मुक्ताईनगरचे भाजपचे पहिले आमदार म्हणून निवडून आलेले एकनाथ खडसे यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून जिल्ह्यात भाजपची शक्ती वाढविली. देशात व राज्यात कॉंग्रेसची सत्ता असतांना जळगाव जिल्हा परिषदेवरील कॉंग्रेसची सत्ता खालसा करून त्या ठिकाणी भाजपची सत्ता आणली तीही थोडथाडकी नव्हे तर तब्बल तीन कार्यकाळ. पुढे त्यांनी सहकारसह सर्वच क्षेत्रात भाजपचे कमळ फुलविले.

भाजप जिल्ह्यातही क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. मात्र त्याच वेळी खडसे यांच्या कारकिर्दीला "राजकीय'ग्रहण लागले. त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यानंतर त्यांच्यामागे सुरू झालेला चौकशीचा ससेमिरा आजही सुरू आहे. 

चौकशीच्या फेऱ्यात खडसे अडकल्यामुळे जिल्ह्यात पक्षाच्या नेतृत्वाचा वाद निर्माण झाला मात्र याच काळात जिल्ह्याची माहिती असलेले आणि खडसेंच्या मुशीत तयार झालेले जामनेरचे गिरीश महाजन यांची जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची इच्छा लपून राहिली नव्हती.

मात्र त्यांना थेट नेतृत्व दिल्यास पक्षात अंतर्गत वाद निर्माण होवून पक्षाला फटका बसण्याची शक्‍यता होती, त्यामुळे अशा काळात भाजप नेतृत्वाने जिल्हा सांभाळण्यासाठी पांडूरंग फुंडकर त्यानंतर आता चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्रीपदी नियुक्ती करीत जिल्ह्यात पक्षाचे सामुहिक नेतृत्व ठेवले. महाजन यांना नाशिकचे पालकमंत्री दिले परंतु ते त्यावर समाधानी नाहीत. त्यांना जिल्ह्याचे नेतृत्व हवे आहे.मात्र त्यासाठी त्यांना पक्षातर्गत परीक्षा त्यांना द्यावी लागेल असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

नाशिकचे पालकमंत्री असले तरी त्यांनी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत आपले बळ दाखविण्यासाठी आपल्या मित्र परिवारातील चंदूलाल पटेल यांना उमेदवारी देवून निवडूनही आणले. यापूर्वी खडसे यांनी आपले मित्र जगवानी यांना तर त्याअगोदर सुरेशदादा जैन यांनी आपले मित्र शरद वाणी यांना स्थानिक स्वराज्य संस्थेवर निवडून आणले होते. त्यामुळे "हम भी कुछ कम नही' हे महाजन यांनी दाखवून दिले, त्यानंतर त्यानीं पालिका निवडणूकीतही पुढाकार घेत कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ताब्यातील पालिकेवर भाजपची सत्ता मिळविली. यात भुसावळात त्यांचे नेतृत्व नव्हते हे त्यांनीही मान्य केले. त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका हे त्यांचे लक्ष होते. त्याच वेळी नाशिक महानगरपालिकेवरही त्यांचे लक्ष होते. जळगाव जिल्हा परिषदेत त्यानीं उमेदवार निश्‍चित करण्यापासून तर अगदी काही जणांना भाजपमध्ये प्रवेश देवून उमेदवारी देण्यापर्यंत त्यांनी निर्णय घेतले. त्यामुळे जर अपयश आले तर त्याची जबाबदारीही त्यांच्यावरच येणार होती मात्र पक्षाने मोठे यश संपादन करीत गेल्या पंधरा वर्षाचे रेकॉर्ड तोडीत तब्बल 33 जागा जिंकून एकहाती सत्तेच्या उंबरठ्यावर आले. तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असलेल्या ठिकाणीही महापालिकेवर भाजपला निर्विवाद बहुमत मिळाले.

त्यामुळे नाशिकच्या विजयाची किनार जळगाव जिल्हा परिेषदेच्या यशाला लाभली. त्यांचे नेतृत्व अधिकच बहरदारपणे झळकू लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये  गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळणार आहे. मात्र या नेतृत्वासाठी त्यांना संघर्ष करावा लागला एवढे मात्र निश्‍चित. त्यामुळे आता खडसे यांच्या नेतृत्वाची बरोबरी त्यांना करता येईल काय? हाच खरा प्रश्‍न आहे. खडसे यांनी विरोधी पक्षात राहून भाजपला बळ दिले.ते संघर्षातून पुढे आले आहेत,

चळवळीतून पुढे आलेला नेता हा कधीच हार खात नाही, परिस्थितीवर मात करून ते पुढे येतील हे काळात दिसून येईलच. अर्थात त्यावेळी महाजन यांचाही त्यावेळेचा संघर्ष होताच. जामनेरात कॉग्रेसचे बलाढ्य ईश्‍वरलाल जैन यांना टक्कर दिली आहे . मात्र आता सर्वत्र सत्ता असतांना यश मिळविणे कठीण बाब नाही असे म्हटले जात आहे. परंतु मग भाजपच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेही सत्ता आहे. मात्र यांना अपयश आलेच ना. सत्ता असतांना त्याचे नियोजन करणे आवश्‍यक आहे,यावेळी हेच नियोजन महाजन यांनी केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच त्यांना यश मिळाले.

परंतु भाजपमध्ये खडसे यांच्या नेतृत्वाला गिरीश महाजन पर्याय आहेत असे म्हणणे आज जरी धाडसाचे असले तरी आता भाजपचे जळगाव जिल्ह्याचे नेतृत्व बदलत्या वळणावर आहे हे मात्र मान्य करावेच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या निकटच्या वर्तुळात स्थान मिळवलेले महाजन मंत्रीमंडळात प्रमोशन मिळवणार हे निश्‍चित. मात्र पुढेही महाजनांना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख