Girish Gandhi Wishing Happy Birthday to Sharad Pawar | Sarkarnama

शरद पवारांनी स्वतः गाडी चालवित पाहिला वनराई बंधारा 

गिरीश गांधी, विश्‍वस्त, वनराई 
बुधवार, 12 डिसेंबर 2018

नागपूर जिल्ह्यातील मानेगाव येथील वनराई बंधारा पाहण्यासाठी मुख्यमंत्री असताना शरद पवार आले होते. पाऊस झाल्याने रस्ता खराब झाला होता. पुढे गाडी जाऊ शकणार नव्हती. शरद पवार यांनी पोलिसांच्या जीपगाडीचा ताबा घेतला. स्वतः स्टिअरिंगवर बसले व गाडी चालवित त्यांनी मानेगाव गाठले. 

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मानेगाव येथील वनराई बंधारा पाहण्यासाठी मुख्यमंत्री असताना शरद पवार आले होते. पाऊस झाल्याने रस्ता खराब झाला होता. पुढे गाडी जाऊ शकणार नव्हती. शरद पवार यांनी पोलिसांच्या जीपगाडीचा ताबा घेतला. स्वतः स्टिअरिंगवर बसले व गाडी चालवित त्यांनी मानेगाव गाठले. 

वनराईच्या माध्यमातून विदर्भात अनेक ठिकाणी वनराई बंधारे बांधले होते. यातून कमी खर्चामध्ये पाण्याचे सिंचनाची सोय शेतकऱ्यांना केली होती. नागपूर जिल्ह्यातील मानेगाव येथे वनराई बंधारा बांधला होता. मुख्यमंत्री शरद पवार यांना या बंधाऱ्याची माहिती कळली होती. त्यांनी दूरध्वनी करून बंधारा पाहायचा असल्याचे मला सांगितले. त्यानुसार मी सकाळी सात वाजता नागपुरातील मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान 'रामगिरी'वर पोहोचलो. त्यांच्यासोबत नागपूरहून मानेगावकडे निघालो. मानेगावच्याजवळ गेल्यानंतर गाडी समोर जाऊ शकत नव्हती. आदल्या रात्री पाऊस झाल्याने रस्ता खराब झाला होता. 'जीपगाडी जाऊ शकेल काय?' अशी विचारणा शरद पवार यांनी केली. पोलिसांनी होकार दिल्यानंतर पोलिसाकडील जीपगाडीची चावी त्यांनी मागितली. शरद पवार स्वतः गाडी चालवायला बसले. त्यांनी मला बाजूला बसविले. 

मागच्या सीटवर मंत्री जवाहरलाल दर्डा, रणजित देशमुख, खासदार तेजसिंगराव भोसले बसले व जीप मानेगावच्या दिशेने धावू लागली. मानेगावला गेल्यानंतर बंधाऱ्यातील पाणी पाहून ही क्रांती संपूर्ण महाराष्ट्रात झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केली. तेथे जमलेल्या शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांचे प्रश्‍न समजून घेतले. मानेगावला समाज भवन बांधण्याचे काम सुरू होते. परंतु निधीच्या कमतरतेमुळे काम संथगतीने सुरू होते. शरद पवार म्हणाले, 'गिरीश, आताच एका कागदावर अर्ज दे, निधी देतो.' मुख्यमंत्र्यांनीच सांगितल्याने तेथेच एका कागदावर अर्ज लिहून दिला व विसरून गेलो. खरेच काही दिवसांनी 5 लाख रुपयांचा धनादेश वनराईला प्राप्त झाला. निधी मंजूर करा, यासाठी मला पुन्हा फोन करावा लागला नाही किंवा त्यांना आठवण करून द्यावी लागली नाही.
 
शरद पवार साहेबांबद्दल अनेक आठवणी माझ्या मनात आहे. युवक काँग्रेसमध्ये काम करीत असताना शरद पवार यांच्याशी पहिल्यांदा परिचय झाला होता. ते तेव्हा राज्यात मंत्री होते. एकदा दिल्लीत भेट झाली. रामटेक (जि. नागपूर) येथील विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला होता. या पराभवाबद्दल पवार साहेबांनी माझ्याजवळ चिंता व्यक्त केली. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात आपला उमेदवार कसा पराभूत झाला, याचीच त्यांना चिंता होती. काँग्रेसच्या संघटनेकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी मला मंत्रीपद सोडावे लागले तरी चालेल, असे पवार साहेब तेव्हा बोलले होते. यावरून पवार साहेबांचे महाराष्ट्रातील प्रत्येक गावाकडे व छोट्या छोट्या कार्यकर्त्यांकडे लक्ष राहते, याचा अनुभव मला यातून झाला. 

पुढे ते पुलोदचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या कामाचा उरक व प्रश्‍नाची जाण याचा अनुभव येत गेला. पुढे ते राष्ट्रीय नेते म्हणून देशासमोर आले. सर्व पक्षातील नेत्यांशी सौहार्दाचे संबंध असलेला हा देशातील एकमेव नेता आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. 
(शब्दांकन : सुरेश भुसारी)
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख