Girish Bapat praises Ramdev Baba | Sarkarnama

रामदेव बाबा राष्ट्रपुरुष ,त्यांची टिंगल टवाळी करू नये - गिरीश बापट

गोविंद तुपे :  सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 22 मार्च 2018

पतंजलीचे सर्वेसर्वा, योगगुरू  बाबा रामदेव हे राष्ट्रपुरूष आहेत. देवतुल्य आहेत. त्यामुळे त्यांची टिंगल टवाळी करू नये असे विधान संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत केल्याने विधानपरिषदेत जोरदार गदारोळ झाला.

मुंबई  :   पतंजलीचे सर्वेसर्वा, योगगुरू  बाबा रामदेव हे राष्ट्रपुरूष आहेत. देवतुल्य आहेत. त्यामुळे त्यांची टिंगल टवाळी करू नये असे विधान संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी विधानपरिषदेत केल्याने विधानपरिषदेत जोरदार गदारोळ झाला.

बाबा रामदेव यांना राष्ट्रपुरुष म्हणण्यावर  आक्षेप घेत विरोधी पक्षाच्या आमदारांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांच्या या आक्रमक घोषणाबाजीमुळे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी परिषदेचे कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब केले.

रामदेव बाबा यांना जर राष्ट्रपुरुष महंत असाल तर आपल्या या सभागृहात ज्यांच्या तसविरी लावल्या आहेत त्या महापुरुषाचा हा घोर अवमान असल्याचे सांगत काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. एका भोंदू बाबाला राष्ट्रपुरुष म्हणत असाल तर या सरकारचा आम्ही धिक्कार करतो अशा शब्दात जगताप यांनी टीका केली. 

तर बापट यांच्या विधानाचा निषेध करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्यांनी वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केली. राष्ट्रवादीच्या जयंत जाधव यांनी तर भाजपाविरोधात घोषणा दिल्या. 'गली गली में शोर है, भाजपवाले चोर है', 'भोंदू रामदेव बाबाला राष्ट्रपुरुष म्हणणाऱ्या सरकारचा निषेध असो' अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

काँग्रेसचे आमदार संजय दत्त यांनी   बाबा रामदेव यांना जमिनी देताना सरकार खूप सवलती देते, आणि  त्यांना पाठीशी घालते असा आरोप केला. त्यावर गिरीश बापट यांनी तुम्ही बाबा रामदेव यांची टिंगलटवाळी करता, परंतु ते आंतरराष्ट्रीय स्तरावरील योगगुरू आहेत, त्यांनी योगाला एक स्थान मिळवून दिले  आहे. ते ऋषितुल्य, देवतुल्य आणि राष्ट्रपुरुष आहेत, त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करणे योग्य नसल्याचे बापट म्हणाले. आणि याविषयावर पडदा पडला

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख