girish bapat | Sarkarnama

काही पत्रकारांची भीती वाटते : गिरीश बापट 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 एप्रिल 2017

या कार्यक्रमात ज्ञानेश्‍वर बिजले, संदीप प्रधान, शंतनू डोईफोडे, नम्रता वागळे यांना पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संदीप प्रधान यांनी यावेळी पत्रकार संरक्षणाचा कायदा होऊनही अजून हल्ले होत असल्याचे सांगितले. 

पुणे : "वरुणराज भिडे यांच्याविषयी कधी भीती वाटली नाही, नेहमी आदर वाटायचा. मात्र आजचे काही पत्रकार भेटले नाही, जाहिरात दिली नाहीतर ते कधी बांबू लावतील, अशी भीती वाटते,' अशा शब्दांत पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या भावना व्यक्‍त केल्या. 

एस. एम. जोशी फौंडेशनमध्ये आयोजित पत्रकार वरुणराज भिडे स्मृती पुरस्कार कार्यक्रमात ते बोलत होते. बापट म्हणाले, लोकशाही प्रक्रियेत पत्रकारांचे स्थान मोठे आहे. ज्या बाबी सरकारलाही दिसत नाहीत, त्या पत्रकाराला दिसतात. गेल्या काही वर्षात पत्रकारांवरील हल्ले वाढले होते. त्यांच्या संरक्षणासाठी सरकारने नुकताच कायदा केला आहे. सुरक्षेबरोबरच पेन्शन आणि आरोग्याचा प्रश्‍न महत्त्वाचा आहे. मी काही पत्रकारांचे हाल बघितले आहेत. त्यामुळे उतारवयात त्यांना मदत होण्यासाठी काय करता येईल कां, ते आम्ही पहात आहोत. 

सध्याच्या पत्रकारितेविषयी चिंता व्यक्‍त करून बापट म्हणाले, बहुतेक पत्रकार स्पॉटवर जात नाहीत. दुसऱ्याकडून माहिती घेऊन रिपोर्टिंग करतात. मग बातमीत त्यांचा वेगळा रंग कसा दिसणार ? राजकारणात वेगवेगळ्या तऱ्हेचे लोक असतात. ते वेगवेगळ्या मार्गाला जाऊन यश मिळवत असतात, पण ते योग्य नाही. पत्रकारांच्याबाबतीत अनेक अयोग्य गोष्टी होतात. काही पत्रकारांची मला भीती वाटते. वरुणराज भिडे यांची भीती वाटत नव्हती. आदर वाटत होता. दर्जेदार पत्रकारितेदृष्टीने प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. 

ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांचेही यावेळी भाषण झाले. 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख