Ghanshyam Shelar has worked for people : Amol Kohe | Sarkarnama

सत्तापद नसताना लोकांसाठी झटणारा नेता म्हणजे घनश्‍याम शेलार  : कोल्हे 

सरकारनामा
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

..

श्रीगोंदे (नगर) : " अनेक वर्षे मंत्रिपदाच्या माध्यमातून लाल दिवा दिला; पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. त्यातून दोन कारखाने काढले. त्या वेळी "साहेब' त्यांच्यासाठी पांडुरंग होते. सत्तेचा व्यवस्थित उपभोग घेऊन त्यांनी साहेबांना सोडले. ते लोकांचे कधीच होणार नाहीत. त्यांना त्यांची जागा दाखवा,'' असा हल्लाबोल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा नामोल्लेख टाळून केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्या प्रचारार्थ बेलवंडी येथे झालेल्या सभेत कोल्हे बोलत होते. पाचपुते यांचा नामोल्लेख टाळून डॉ. कोल्हे म्हणाले, " वारी अर्धवट सोडून देतात, ते खरे वारकरी नसतात. शरद पवार यांच्या भाषेत ते "हौसे-नवसे-गवसे' वारकरी असतात. साहेबांनी त्यांना राजकारणात मंत्रिपदे दिली. पक्षाचे प्रदेशाध्यक्षपदही दिले. त्यातून दोन कारखाने काढले."

"एवढे सगळे दिल्यानंतर पवारांना सोडून दिले. पवारांनीच फसवले  हा खोटा प्रचार  करणाऱ्या, सामान्यांच्या मतावर पॅलेस बांधत, राजकारणातील पांडुरंगाला फसविणाऱ्या या नेत्याला त्याची जागा दाखवून द्या. दुसरीकडे, 34 वर्षे कुठलेही सत्तापद नसताना लोकांसाठी झटणारा घनश्‍याम शेलार हा नेता आहे. त्यांच्या पाठीशी आमदार राहुल जगताप यांचे कवच आहे. या दोघांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.''

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नापास झाले आहेत. समोर विरोधासाठी पैलवानच नाही अशी डरकाळी फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना सत्ता वाचविण्यासाठी दिल्लीकरांच्या सभांची गरज का भासली,' अशी टीकाही त्यांनी केली.

आमदार राहुल जगताप, बाबासाहेब भोस, राजेंद्र फाळके, संपत म्हस्के, दीपक भोसले, हरिदास शिर्के, अंबादास दरेकर, अनिल वीर, अत्तर शेख आदी उपस्थित होते.

माझी शेवटची निवडणूक :  शेलार
शेलार यांनी लोकांना भावनिक आवाहन केले. गेली 34 वर्षे कुठलीही सत्ता आणि पदे नसताना आपण लोकांमध्ये आहोत. पाणीप्रश्नासोबतच सगळ्या आंदोलनांत पुढे राहिलो. ही आपली शेवटची निवडणूक असून, यापुढे राहुल जगताप यांच्यासाठी सक्रिय राहून मदत करणार आहे, असे ते म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख