घनसावंगीत राजेश टोपेंना पुन्हा हिकमत उढाण टक्कर देणार 

Tope-VS-Udhan
Tope-VS-Udhan

घनसावंगी (जालना) : सलग चार वेळा आमदार, सलग १० वर्ष मंत्री राहिलेल्या राजेश टोपे यांची आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याच घनसावंगी मतदारसंघात दमछाक सुरू आहे.

रात्रीचा दिवस करीत मतदारसंघातील गावागावात पायपीट करणारे आमदार राजेश टोपे यांनी पाचव्यांदा मीच निवडून येणार तेही विक्रमी मतांनी असा दावा केला आहे. 

तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि २०१४ च्या निवडणुकीत पराभूत झालेले डॉ. हिकमत उढाण यांनीही कंबर कसली आहे. 

डॉ. हिकमत उढाण हे शिवसेनेकडून निश्चित उमेदवार असल्यामुळे गेल्या पाच वर्षांपासूनच त्यांनी तयारी सुरू केली आहे. त्याशिवाय शिवसेनेतून जिल्हा परिषद सदस्य महेंद्र पवार यांनी उमेदवारी मिळावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.

दोघांच्या या दाव्यामुळे आचारसंहिता लागण्यापूर्वीच भेटी-गाठींचा धुराळा उडू लागल्याने अख्ख्या मतदारसंघाला निवडणुकीचा साज चढल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

घनसावंगी हा जालना जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ आहे. २००९ मध्ये झालेल्या मतदारसंघ फेररचनेनंतर अंबडच्या ऐवजी घनसावंगी हा मतदारसंघ अस्तित्वात आला. या मतदारसंघात काही भाग हा गोदकाठाच्या अंबड तालुक्यातला तर घनसावंगी, जालना तालुक्यातील सातत्याने दुष्काळाने होरपळणारा भाग या मतदारसंघात येतो. 

घनसावंगी मतदारसंघात घनसावंगी तालुक्यातील ८ जिल्हा परिषद सर्कल, अंबडमधील ४ सर्कल आणि जालना तालुक्यातील ३ जिल्हा परिषद सर्कलचा समावेश आहे. याच भागातून पूर्वीच्या अंबड आणि आताच्या घनसावंगी मतदारसंघातून सलग चारवेळा म्हणजेच १९९९ पासून राजेश टोपे विजयी झाले आहेत.  

याकाळात सलग १० वर्ष कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली. दोन साखर कारखाने, शिक्षण संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे राजेश टोपे यांची या मतदारसंघावर पकड असल्याचे यापूर्वी झालेल्या निवडणुकीतून दिसून आले आहे. 

१९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सध्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचा १३ हजारांनी पराभव करून राजेश टोपे विधानसभेत पोहचले होते. त्यानंतर २००४ मध्ये २५ हजार मतांनी विजयी झाले. २००९ मध्ये ३७ हजारांनी विजयी झाले.

आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ४३ हजारांनी त्यांचा विजय झाला. २०१४ च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे राजेश टोपे यांचा विजय सोपा झाला. 

मात्र, यावेळी ही निवडणूक खडतर असल्याचं बोलले जात आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत राजेश टोपे यांना ९८ हजार ३० मते मिळाली होती. तर भाजपाचे विलास खरात यांना ५४ हजार ५५४ मते मिळाली होती.

शिवसेनेचे डॉ. हिकमत उडाण यांना ४५ हजार ६५७ मते मिळाली होती. जर युती राहिली असती तर राजेश टोपे यांचा २०१४ च्या निवडणुकीत पराभव झाला असता असं या मतदारसंघातील काही मतदार आणि जाणकार सांगतात. त्यामुळेच यावेळी हे निवडणूक राजेश टोपे यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण यावेळी या मतदारसंघात विलास खरात यांचा वावर फारसा दिसत नाही. त्यात शिवसेनेचे डॉ. हिकमत उढाण यांनी दंड थोपटत गावागावात गाठीभेटी आणि बैठका सुरू केल्या आहेत.


लढत राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्येच? 

सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झालेली आहे. भाजप शिवसेनेची युती टिकून राहील असं सांगितलं जाते. घनसावंगीमध्ये आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश टोपे हेच उमेदवार असणार हे निश्चित आहे. युती झाली तर घनसावंगी हा मतदारसंघ शिवसेनेकडे असेल आणि शिवसेनेचे डॉ. हिकमत उडाण हेच उमेदवार असतील जवळपास निश्चित आहे.
 जर युती झाली नाही तर भाजपकडून पुन्हा विलास खरात मैदानात उतरतील का हा प्रश्न आहे. त्याऐवजी त्यांचा मुलगा विश्वजित खरात हा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. पण त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशीच आगामी विधानसभेची निवडणूक होईल हे निश्चित दिसत आहे.

वंचित फॅक्टर चालेल?

 या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव राहील असं सांगितले जात आहे. मात्र, उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. शिवाय तशी वंचित बहुजन आघाडीची तयारीही दिसत नाही. मात्र, या मतदारसंघात ओबीसींची संख्या अधिक आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी यातला बराच भाग हा परभणी लोकसभेला जोडला गेलेला आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या भागातून वंचित बहुजन आघाडीला चांगली मते मिळाली होती. मराठा समाजाबरोबरीत ओबीसींचे प्राबल्यही असल्याने तो कोणाला तारक आणि कोणाला मारक ठरेल यावर सध्या चर्चा सुरू आहेत. 

टोपेंनी १० वर्ष मंत्री राहून काय काम केले : डॉ. उढाण
https://www.sarkarnama.in/rajesh-tope-was-minister-10-years-what-has-he-done-hikmat-udhan-42285

युतीची सत्ता असून पाच वर्षात त्यांनी काय दिवे लावले : राजेश टोपे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com