जॉर्ज फर्नांडिस.... एक झंजावात

जॉन जोसेफ फर्नांडिस आणि अलिस मार्था फर्नांडिस यांच्या पोटी 3 जून 1930 रोजी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. मंगळूरमधील या कॅथॉलिक कुटुंबातील जॉर्ज हे सहावे अपत्य. त्यांच्या आई किंग जॉर्ज पाचवे यांच्या चाहत्या, जॉर्ज यांचा जन्मही 3 जूनचा असल्याने ते नाव ठेवण्यात आले. त्यांचे वडील पिअरलेस फायनान्सचे दक्षिण भारतातील काम पाहायचे.
जॉर्ज फर्नांडिस.... एक झंजावात

जॉन जोसेफ फर्नांडिस आणि अलिस मार्था फर्नांडिस यांच्या पोटी 3 जून 1930 रोजी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म झाला. मंगळूरमधील या कॅथॉलिक कुटुंबातील जॉर्ज हे सहावे अपत्य. त्यांच्या आई किंग जॉर्ज पाचवे यांच्या चाहत्या, जॉर्ज यांचा जन्मही 3 जूनचा असल्याने ते नाव ठेवण्यात आले. त्यांचे वडील पिअरलेस फायनान्सचे दक्षिण भारतातील काम पाहायचे.

जॉर्ज यांना लहानपणी "गेरी' म्हणून संबोधायचे. त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण मंगळूरच्या सेंट अलायसीस महाविद्यालयात झाले. अत्यंत धार्मिक अशा फर्नांडिस (पिंटो) कुटुंबातील जॉर्जला धार्मिक शिक्षणासाठी बंगळूरच्या सेंट पिंटर्स सेमिनरीत धाडण्यात आले. दोन वर्षांच्या प्रशिक्षणात उक्ती आणि कृतीत फरक आहे, अशी जाणीव झाल्याने त्यांनी चर्चचे शिक्षण सोडून दिले. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी त्यांनी मंगळूरमधील वाहतूक आणि हॉटेल कामगार यांचे संघटन सुरू केले. 

जॉर्ज फर्नांडिस यांनी 1949 मध्ये नोकरीच्या शोधार्थ मुंबईची वाट धरली. तेथील रस्त्यावरच पथारी टाकून तेथेच झोपने सुरू केले. त्यांना वृत्तपत्रात मुद्रितशोधकाची नोकरी मिळाली आणि रस्त्यावरून ते घरात गेले. त्या आठवणी सांगताना जॉर्ज म्हणतात, "जेव्हा मी मुंबईत प्रथम आलो तेव्हा चौपाटीच्या वाळुतील बाकड्यांवर रात्र काढायचो. मध्यरात्रीनंतर कधीतरी पोलिस यायचे आणि उठवून हाकलून लावायचे. ज्येष्ठ कामगार नेते प्लासीड डिमोले आणि समाजवादी नेते राममनोहर लोहिया यांच्या संपर्कात ते आले. लोहिया यांच्या विचारसरणीचा प्रभाव त्यांच्या आयुष्यावर कायमचा राहिला. कामगारांच्या हक्कासाठी छोट्या स्वरुपात त्यांनी सुरू केलेला लढा अल्पावधीतच व्यापक झाला. पन्नासच्या दशकात ते मुंबईच्या कामगार विश्‍वातील प्रभावशाली कामगार नेते बनले. कंपन्यांमधील त्यांच्या कामगारांवर दबावाचे प्रयत्न झाले, हाणामारी करायची वेळ आली तेव्हा ते कामगारांच्या पाठीशी उभे राहिले. त्यासाठी तुरूंगवासही भोगला. 1961-68 या काळात ते मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. त्या व्यासपिठावरही त्यांनी कामगारांच्या प्रश्‍नांचा जागर केला. 

जॉर्ज फर्नांडिस यांनी 1967 मध्ये लोकसभेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि तोच त्यांना एकदम प्रकाशझोतात आणणारा ठरला. कॉंग्रेसचे बडे प्रस्थ असलेले, दोन दशके राजकारण गाजवणारे सदाशिव कानोजी उर्फ स. का. पाटील यांच्या विरोधात त्यांनी दक्षिण मुंबईतून संयुक्त सोशॅलिस्ट पक्षाच्यावतीने निवडणूक लढवली. 48.5 टक्के मिळवत त्यांनी पाटील यांचा दारूण पराभव केला. त्यावेळी "जॉर्ज द जायंट किलर', अशी घोषणाच केली गेली. या निवडणुकीने स. का. पाटील यांची राजकीय कारकिर्दही संपुष्टात आली. 

मुंबईच्या संपाच्या विश्‍वात साठच्या दशकाच्या अखेरच्या टप्प्यात जॉर्ज फर्नांडिस हे नाव कामगारविश्‍वात परवलीचे झाले. 1969 मध्ये ते संयुक्त सोशॅलिस्ट पक्षाचे सरचिटणीस आणि 1973 मध्ये ते पक्षाचे अध्यक्ष झाले. सत्तरच्या दशकात मात्र मुंबईच्या कामगार जगतावरील त्यांचा प्रभाव काहीसा ओसरू लागला होता. 

रेल्वेमनचा संप 
फर्नांडिस यांच्या संघटन कौशल्याचा आणि प्रभावीपणाचा अविष्कार म्हणून 1974 मधील रेल्वेमनच्या संपाकडे पाहिले जाते. 1947 ते 1974 या काळात तीन वेतन आयोग नेमूनही रेल्वे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरीव अशी काही वाढ झाली नव्हती. तोंडाला केवळ पाने पुसली गेली होती. त्यामुळे मंदीत सापडलेल्या सरकारची कोंडी करण्यासाठी फेब्रुवारी 1974 मध्ये नॅशनल कोऑर्डिनेटिंग कमिटी फॉर रेल्वेमेन्स स्ट्रगल (एनसीसीआरएस) स्थापन करण्यात आली. त्याच्या झेंड्याखाली कामगारांच्या सर्व संघटना, विरोधी पक्षांचे नेते एकत्र आले. त्याला मुंबई बेस्ट बस आणि टॅक्‍सी चालकांनी, मद्रासच्या कोच कारखान्यातील दहा हजारांवर कामगार आणि त्यांचे कुटुंबिय, गयातील संपकरी कामगार अशा सर्वांचा पाठिंबा लाभला. अखेर 8 मे 1974 रोजी संपाला तोंड फुटले. सरकारने कामगार नेत्यांची मोठ्या प्रमाणावर धरपकड केली. ऍमनेस्टी इंटरनॅशनलच्या आकडेवारीनुसार, तीस हजारांवर कामगार नेत्यांना देशभरात तुरूंगात डांबण्यात आले. अखेरीस 27 मे 1974 रोजी एकतर्फी संप मागे घेण्यात आले. "संपकऱ्यांनी नंतर वेगळीच भाषा सुरू केल्याने तो मागे घेतला', असे फर्नांडिस यांनी सांगितले. फर्नांडिस यांनाही त्याबद्दल अटक केली होती. त्यानंतर देशात अस्वस्थतेचे वातावरण सुरू झाले, त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी बेचैन झाल्या. आपल्या वर्चस्वाला धक्का असल्याचे त्यांना वाटले आणि त्यांनी जून 1975 मध्ये आणिबाणीची घोषणा केली. फर्नांडिस यांना अटक करून बेड्या ठोकण्यात आल्या. त्यांचे त्या अवतारातील छायाचित्र हे आणिबाणीच्या कराल दहशतीचे प्रतिक बनले. 

बडोदा डायनामाईट खटला 
इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी आणिबाणी लागू केली. सर्व मुलभूत हक्क हिरावून घेतले गेले. राजकीय नेते, विरोधक, वृत्तपत्रांचे बातमीदार यांची मोठ्या प्रमाणात धरपकड करण्यात आली. फर्नांडिस यांच्या विरोधात वॉरंट जारी केले गेले. ते भुमीगत झाले. जंगजंग पछाडूनही त्यांना पकडता न आल्याने पोलिसांनी त्यांचे बंधू लॉरेन्स यांना अटक करून छळ करण्यात आला जेणेकरून त्यांनी त्यांचा ठावठिकाणा सांगावा. स्नेहलता रेड्डी या अस्थमाच्या रुग्ण असलेल्या महिलेलाही फर्नांडिस यांच्या संपर्कात असल्याच्या आरोपाखाली अटक केले, अटकेत असताना अपुऱ्या वैद्यकीय सुविधांमुळे त्यांचा सुटकेनंतर लगेचच मृत्यू झाला. जुलै 1975 मध्ये फर्नांडिस बडोद्यात आले. तेथे त्यांच्या बडोदा पत्रकार संघाच्या किर्ती भट्ट आणि टाइम्स ऑफ इंडियाचे प्रतिनिधी विक्रम राव यांच्या भेटीगाठी झाल्या. इंदिरा गांधींचे सरकार उलथवण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू झाल्या. "मुकंद आयर्न'चे व्यवस्थापकीय संचालक आणि उद्योगपती विरेन शहा हेही चर्चेत सामील झाले. त्यात डायनामाईटच्या सहाय्याने सरकारी आस्थापनात स्फोट घडवून खळबळ माजवायची, मात्र कोणतीही जिवीत हानी होऊ द्यायची नाही, असा कट शिजला. वाराणशीतील इंदिरा गांधींची सभा उधळवण्यासाठी व्यासपिठ उडवून द्यायचे, असेही ठरले. याच सर्व कटाला "बडोदा डायनामाईट खटला' असे संबोधले जाते. भट्ट यांच्या दाव्यानुसार, आणखीही दोन कट रचले गेले होते. अखेरीस 10 जून 1976 रोजी फर्नांडिस यांना कोलकत्यात अटक करण्यात आली. त्यानंतर लगेचच आंतरराष्ट्रीय स्तरावरून त्यांच्या समर्थनार्थ ऍमनेस्टी इंटरनॅशनलने बाजू लावून धरत त्यांना वकिल उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली. जर्मनी, नॉर्वे, ऑस्ट्रेलियातून तेथील नेत्यांनी इंदिरा गांधींना फर्नांडिस यांच्या जीवाचे काहीही बरेवाईट होवू न देण्यासाठी दक्ष राहण्याचे इशारे दिले. त्यांना तिहारच्या तुरुंगात हलवले गेले. तथापि, या खटल्यातील आरोपींवर खटला चाललाच नाही. 

तुरुंगातून निवडणूक जिंकली
आणिबाणी 21 मार्च 1977 रोजी मागे घेण्यात आली. सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या. इंदिरा विरोधकांनी जनता पक्षाच्या नावाखाली येत सत्ताधारी कॉंग्रेसला विरोध केला. जनता पक्षाचे नेते मोरारजी देसाई पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान झाले. त्यावेळी बडोदा डायनामाईट खटल्यात तुरुंगात असलेल्या फर्नांडिस यांनी बिहारातील मुजफ्फरपूरमधून निवडणूक लढवली. प्रत्यक्षात मतदारसंघातही न जाता त्यांना तीन लाखांचे मताधिक्‍य लाभले, यावरून त्यांची लोकप्रियता लक्षात येते. देसाई मंत्रीमंडळात ते उद्योग मंत्री झाले. "फेरा' कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांनी "आयबीएम' आणि "कोका कोला' यांच्याशी कायद्याची लढाई लढली, कंपन्यांनी भारतातून काढता पाय घेतला. फर्नांडिस यांनी मुजफ्फरपूरला दूरदर्शन केंद्र, कांती थर्मल पॉवर स्टेशन, लिज्जत पापडचा कारखाना सुरू करून रोजगार निर्मितीवर भर दिला. पुढे औष्णिक प्रकल्पाला फर्नांडिस यांचेच नाव देण्यात आले. जनता पक्षातील भारतीय जनसंघाच्या अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्यासारख्या नेत्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले नाते तोडावे, यासाठी फर्नांडिस यांच्यासह अनेकांनी घोशा लावला. त्याचा परिणाम सरकार होवून, जनता पक्षात फूट पडली. देसाई सरकार अल्पमतात आल्याने पायउतार झाले. चौधरी चरणसिंग यांनी जनता (सेक्‍युलर) पक्षाची स्थापना करून कॉंग्रेसच्या मदतीने केंद्रात सरकार स्थापन केले. पण जनता पक्षातील मतभेदांनी 1980 मध्ये झालेल्या मध्यावधी निवडणुकीत कॉंग्रेसच्या बाजूने जनतेने कौल दिला. 1980 मध्ये फर्नांडिस मुजफ्फरपूरमधून निवडून गेले, पण विरोधी बाकांवर बसले. त्यानंतर 1984 ची निवडणूक त्यांनी बंगळूर उत्तरमधून लढवली आणि ते 40 हजार मतांनी पराभूत झाले. त्यानंतर त्यांनी 1989 आणि 1991 अशा दोन्हीही लोकसभेच्या निवडणुका मुजफ्फरपूरमधून लढवल्या आणि विजयी झाले. ते जनता दलात सामील झाले. विश्‍वनाथ प्रतापसिंह मंत्रीमंडळात 1989-90 मध्ये रेल्वेमंत्री झाले. या काळात त्यांचे योगदान भरीव ठरले. मंगळूर आणि मुंबई यांना जोडणाऱ्या कोकण रेल्वेचा महत्त्वपूर्ण प्रकल्प त्यांच्या काळात मार्गी लागला. रेल्वेने स्वातंत्र्यानंतर प्रगतीची पहिलीच मोठी उडी घेतली.
 
समता पक्षाची स्थापना 
फर्नांडिस यांनी 1994 मध्ये जनता दलातून बाहेर पडून समता पक्षाची स्थापना केली. त्यांनी भारतीय जनता पक्षाशी (आधीचा जनसंघ) आघाडी केली, 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या केंद्रातील 13 दिवसांच्या सरकारात सामील झाले. एच. डी. देवेगौडा आणि इंदरकुमार गुजराल पंतप्रधान असताना फर्नांडिस भाजपसोबत राहिले. 1998 मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर अतिशय टोकावरील आघाडीचे बहुमत निर्माण करत भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीचे सरकार सत्तेवर आले, पण जे. जयललिता यांच्या आण्णा द्रमुकच्या असहकाराच्या धोरणाने 13 महिन्यांतच ते सत्तेतून बाहेर गेले. त्यानंतर भाजपच्या नेतृत्वाखाली 24 पक्षांची मोट बांधून राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) स्थापन झाली, त्यांनी मग 1999 ते 2004 या काळात केंद्रात कारभार केला. फर्नांडिस आघाडीचे समन्वयक बनले. 27 जुलै 1999 मध्ये जनता दलात फूट पडून जनता दल (संयुक्त) आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) आकाराला आले. 2003 मध्ये फर्नांडिस यांच्या पुढाकाराने हे दोन्हीही पक्ष आणि समता पक्ष यांचे विलीनीकरण करून जनता दल (संयुक्त) स्थापन करण्यात आला. 

संरक्षणमंत्री म्हणून फर्नांडिस यांनी एनडीएच्या काळात दोनदा काम पाहिले. 1999 मध्ये ते संरक्षणमंत्री असताना पाकिस्तानने कारगील भागात घुसखोरी करून देशाच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. ऑपरेशन विजयनंतर, काहीशे सैनिकांच्या बलिदानानंतर आपण पाकिस्तानच्या कारवाया संपवण्यात यशस्वी झालो. मे 1998 मध्ये भारताने पोखरण येथे पाच अणूचाचण्या घेतल्या, त्यावेळी आण्विक निशस्त्रीकरणाचे पुरस्कार करणारे फर्नांडिसच त्याचे समर्थन करू लागले होते. त्यांच्याच काळात संरक्षण खर्चात खूप मोठी वाढ करण्यात आली. व्हाईस ऍडमिरल हरींदरसिंग यांना नौदल उपप्रमुख केल्याने त्यांचे तत्कालीन नौदल प्रमुख विष्णू भागवत यांच्याशी टोकाचे मतभेद झाले, भागवत यांनी पदावरून बडतर्फ करण्यात आले. मार्च 2001 मध्ये तहलका नियतकालीकाने संरक्षण साहित्य खरेदीमागील दलालीचा चेहेरा उघड केल्यानंतर फर्नांडिस यांनी पदाचा राजीनामा दिला, पण काही काळानंतर त्यांना पुन्हा संरक्षणमंत्री करण्यात आले. पदावर असताना सोळा वेळा त्यांनी जगातील सर्वात उंचावरील युद्धभुमी असलेल्या सियाचीनला भेटी देवून जवानांचे मनोधैर्य उंचावण्याचा प्रयत्न केला होता. 

2004 मधील निवडणूक एनडीए सरकार हरले आणि कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचे (युपीए) सरकार सत्तेवर आले. त्यानंतर फर्नांडिस आणि त्यांचे समता पक्षातील अनुयायी नितीशकुमार यांच्यात मतभेद झाले. 2009 मधील निवडणुकीवेळी संयुक्त जनता दलाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मुजफ्फरपूरमधून अपक्ष निवडणूक लढवली आणि पराभूत झाले. त्यानंतर, शरद यादव यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर फर्नांडिस यांनी त्या जागेवरून उमेदवारी केली, त्याला संयुक्त जनता दलाने विरोध केला नाही, बिनविरोध ते राज्यसभेवर निवडले गेले. 

वादग्रस्त फर्नांडिस

जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर एलटीटीईचे समर्थनकर्ते होते, असा आरोप झाला होता. सीआयएकडून निधीसाठी प्रयत्न केला असे सांगितले जाते, तथापि ते सिद्ध झाले नाही. शस्त्रास्त्रविक्रीत दलालीचा आरोप असलेला तहेलका घोटाळा उघडकीस आला, त्यावेळीही फर्नांडीस यांच्यावर आरोप झाले, त्यात त्यांना माजी न्यायमुर्ती फुकन यांच्या नेतृत्वाखालील समितीने क्‍लिनचीट दिली होती. संरक्षणमंत्री असताना फर्नांडीस यांनी चीन हा भारताचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे, असे विधान केले होते. कारगिल युद्धावेळी हुतात्मा सैनिकांच्या शववाहिकांच्या खरेदीत फर्नांडीस यांच्या गैरव्यवहाराचा आरोप झाला, तथापि, 2009 मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) क्‍लिनचीट दिली होती. 

पत्रकारितेशी संबंध 
फर्नांडिस यांना लेखनाची आवड होती, विद्यार्थीदशेतच त्यांनी पत्रकारिता सुरू केली होती. 1949 मध्ये ते "कोकणी युवक' मासिकाचे संपादक होते. त्याचवेळी "रयतवाणी' या कन्नड साप्ताहिकाचेही संपादक होते. इंग्रजीमधील प्रकाशन थांबलेले "द डॉकमॅन' या साप्ताहिकाचे प्रकाशनही फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली 1952 मध्ये सुरू झाले. फर्नांडिस यांनी "वॉट एल्स द सोशॅलिस्ट (1972), "द काश्‍मीर प्राब्लेम', "रेल्वे स्ट्राईक ऑफ 1974', "डिग्निटी फॉर ऑल - एसेज्‌ इन सोशॅलिझम अँड डेमॉक्रॅसी (1991) या ग्रंथांचे तसेच "जॉर्ज फर्नांडिस स्पिक्‍स' (1991) या आत्मचरित्राचे लेखन फर्नांडिस यांनी केले आहे. मानवी हक्कांसाठी लढणारे फर्नांडिस ऍमनेस्टी इंटरनॅशनल, 'पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीज्‌' आणि "प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया'वरही कार्यरत होते. 

फर्नांडिस संयुक्त सोशॅलिस्ट पार्टीचे सरचिटणीस असताना बांगलादेशहून परतताना कोलकता ते दिल्ली विमानाने येत होते. त्याच विमानातून माजी केंद्रीय मंत्री हुमायून कबीर यांच्या कन्या लैला कबीर "रेडक्रॉस'च्या सहायक संचालक म्हणून सिमावर्ती भागात काम पार पाडून दिल्लीला परतत होत्या. तेथून त्यांचे प्रेमसंबंध बहरू लागले. एकमेकांना डेटिंग करू लागले. 21 जुलै 1971 रोजी उभयता विवाहबद्ध झाले. त्यांचा मुलगा सीन फर्नांडिस आता न्यूयॉर्कमध्ये इन्व्हेस्टमेंट बॅंकर आहे. 1980 मध्ये उभयता विभक्त झाले. 1984 पासून फर्नांडिस जया जेटली यांच्यासोबत आहेत. 

ओघवत्या शैलीत हिंदी आणि इंग्रजी बोलणाऱ्या फर्नांडिस यांना दहा भाषा अवगत आहेत. यामध्ये कोकणी, हिंदी, तुलू, कन्नड, मराठी, तमीळ, उर्दू, मल्याळम आणि लॅटिन या भाषांचा समावेश आहे. यातील लॅटिन त्यांनी सेमीनरीत शिकत असताना, तर तुरुंगात असताना मराठी आणि उर्दू आत्मसात केली. 

फर्नांडिस यांना 2010 मध्ये अल्झायमर्स आणि पार्किनसन्स या रोगांनी गाठले होते. लैला कबीर या पुन्हा त्यांच्या आयुष्यात आल्यानंतर त्यांच्या विनंतीवरून फर्नांडिस यांनी बाबा रामदेव यांच्या हरिद्वारच्या आश्रमातही उपचार घेतले. कबीर आणि सीन या दोघांनी फर्नांडिस यांचा ताब्यात घेतला आहे. त्याला त्यांच्या बंधूंनी हरकत घेतल्यानंतर त्यांना केवळ भेटण्यास परवानगी दिली, त्यानंतर 2012 मध्ये जया जेटली यांनाही न्यायालयाने फर्नांडिस यांची भेट घेण्यास मुभा दिली होती. 

जॉर्ज फर्नांडिस जीवनपट 

  • 1930 - मंगळूर, कर्नाटक येथे जन्म 
  • 1946 - धर्मगुरूच्या प्रशिक्षणासाठी बंगळूरला पाठवले 
  • 1946-48 - बंगळूरच्या सेंट पिटर्स सेमिनरीमध्ये प्रशिक्षण 
  • 1949 - नोकरीच्या शोधार्थ मुंबईत दाखल, सोशॅलिस्ट ट्रेड युनियनमध्ये दाखल 
  • 1950-60 - मुंबई विविध संपांचे, आंदोलनाचे नेतृत्व 
  • 1971 - लैला कबीर यांच्याशी विवाह 
  • 1974 - देशाच्या इतिहासात गाजलेल्या रेल्वे संपाचे नेतृत्व 
  • 1980 - फर्नांडिस आणि कबीर विभक्त, 1984 पासून जया जेटली त्यांच्या सोबतीला 
  • 1998 - सरकारच्या अणुचाचण्यांची घोषणा तसेच नौदलाला बेकायदा शस्त्रे नेणाऱ्या बोटी रोखण्याच्या कृतीला अटकाव केला 
  • 2009 - अपक्ष राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com