geography paper of ssc student has been canceled but this may be system to give marks | Sarkarnama

SARKARNAM SPECIAL दहावीच्या रद्द झालेल्या भूगोल विषयाचे गुण असे ठरणार....

उमेश घोंगडे
रविवार, 12 एप्रिल 2020

सरासरी गुण देण्यासाठी परीक्षा मंडळासमोर तीन पर्याय आहेत. 

पुणे : नववी व अकरावीची पूर्ण परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज जाहीर केला. दहावीचा भूगोल विषयाचा पेपरदेखील रद्द करण्यात आल्याची घोषणा गायकवाड यांनी केली. नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांचा वर्षभरातील शैक्षणिक कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना सरासरी गुण देण्यात येणार आहेत. मात्र, दहावीच्या भूगोल विषयासंदर्भात राज्य शिक्षण मंडळ काय निर्णय घेणार ? विद्यार्थ्यांना कशाच्या आधारे गुण देणार याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये उसत्सुकता आणि काळजी आहेच.

दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर तसेच नववी व अकरावीच्या परीक्षेबाबत १४ तारखेनंतर लॉकडाॅऊन राहाणार की नाही हे पाहून निर्णय घेण्यात येईल, असे शालेय शिक्षण मंत्री गावकवाड यांनी यापूर्वी सांगितले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिनाअखेरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय शनिवारी जाहीर केला. त्यानंतर या तीन्ही परीक्षांबाबत वर्षा गायकवाड यांनी निर्णय जाहीर केला.

दहावीचा भूगोलाचा पेपर होणार नाही हे आता निश्‍चित झाले आहे. मात्र, या विषयाचे गुण कोणत्या प्रकारे देणार याबाबत विद्यार्थी-पालकांमध्ये उत्सुकता आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या तज्ञांच्या मते जेव्हा अशी वेळ येते तेव्हा सरासरी गुण देण्याच्या तीन पद्धती आहेत. यापैकी कोणत्याही पद्धतीचा वापर राज्य मंडळ करू शकते. राज्य मंडळाच्या अध्यक्ष डॉ. शकुंतला काळे यांना या बाबत निर्णय घेण्याचा आधिकार आहे.

पहिल्या पद्धतीनुसार सहा विषयांच्या गुणांमधून भूगोल विषयाचे ४० गुण वजा केले तर ५६० गुण उरतात. या ५६० पैकी विर्द्थ्यााला मिळालेल्या गुणांच्या आधारे भूगोल विषयात ४० पैकी गुण देण्यात येऊ शकतात. दुसऱ्या पद्धतीत इतिहास व भूगोल विषय प्रत्येकी शंभर गुणांचा असतो. यापैकी प्रत्येकी दहा गुण तोंडी किंवा प्रात्याक्षिक परीक्षेचे असतात. उरलेली प्रत्येकी ४० गुणांची लेखी परीक्षा होते. इतिहास विषयाचा पेपर झाला आहे. या पेपरमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे भूगोल विषयाचे गुण देता येऊ शकतात. तिसऱ्या पद्धतीनुसार परीक्षा झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेत विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांची सरासरी काढून गुण देतात येतील. पाच विषयांची ४४० गुणांची लेखी परीक्षा झाली असेल तर यापैकी विद्यार्थ्याला मिळालेल्या गुणांच्या आधारे भूगोल विषयात ४० पैकी सरासरी गुण देण्यात येतील.

काही अपवादात्मक परिस्थितीत (पेपर गहाळ झाले किंवा भिजले अशा प्रकरणात) या पूर्वी या पद्धतीचा अवलंब करण्यात आल्याचे मंडळात काम केलेल्या निवृत्त आधिकाऱ्यांची स्पष्ट केले. मात्र, सरसकट सर्वच विद्यार्थ्यांना अशाप्रकारे गुण देण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असेल, असे त्यांनी सांगितले. यातील नेमकी कोणती पध्दत वापरून गुण दिले जाणार हे राज्य शिक्षण मंडळाकडून येत्या काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख