यवतमाळ-वाशीममध्ये ठाकरे गवळी यांच्या लढतीत अन्य बड्या उमेदवारांचीही भर

यवतमाळ-वाशीममध्ये ठाकरे गवळी यांच्या लढतीत अन्य बड्या उमेदवारांचीही भर

यवतमाळ : यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युती, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची आघाडी, वंचित बहुजन आघाडी व प्रहार जनशक्ती पक्षाचे उमेदवार जाहीर झाले आहेत. काहींनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यात आध्यात्मिक गुरू प्रेमासाई महाराज यांचाही समावेश आहे. प्रमुख उमेदवारांसह बहुतांश अपक्ष उमेदवार सोमवारी उमेदवारी दाखल करणार आहेत. तूर्तास, युती व आघाडीच्या उमेदवारांतच खरी लढत होणार असली तरी प्रहार व वंचित बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांचे मोठे आव्हान असणार आहे. 

हा मतदारसंघ एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु आता तो भाजप-शिवसेनेच्या ताब्यात आहे. कॉंग्रेसचे माणिकराव ठाकरे यांच्या मतदारांसोबत भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. शिवसेनेची यादी आज जाहीर झाली असून यवतमाळ-वाशीममधून खासदार भावना गवळी व हिंगोलीत लोकसभा मतदारसंघातून हेमंत पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे. दोन्ही प्रमुख पक्षांचे उमेदवार सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी शिवसेना युवाप्रमुख आदित्य ठाकरे यांची हजेरी असणार आहे. 

माणिकराव ठाकरेही दोन्ही कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित उमेदवारी दाखल करणार आहे. मात्र, आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या माजी आमदार संदीप बाजोरिया यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीला यवतमाळ व वाशीम जिल्ह्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी कॉंग्रेसविरोधात शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचे जाहीर केले. 

वाशीम जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, वाशीम जिल्हा महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस उमेदवारांबाबत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे मुहूर्तालाच आघाडीतच बिघाडीचा सूर दिसून आला. तर, प्रहारने 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्‌घाटक व आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची बायको वैशाली येडे यांना उमेदवारी दिली आहे. प्रहारच्या उमेदवाराचे युती व आघाडी दोन्ही उमेदवारांसमोर आव्हान राहण्याची शक्‍यता आहे. शिवाय, बहुजन वंचित आघाडी व अपक्ष प्रेमासाई महाराज यांचेही आव्हान असणार आहे. एकूणच तिरंगी लढत होणार नसली तरी निवडणुकीच्या आधीच एकमेकांना "मायनस' करण्याचे प्रयत्न दोन्ही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून सुरू असल्याचे दिसते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com