मनसेचा एकही नगरसेवक नाही पण तरीही ठाणे महापालिकेच्या लेखी गटनेत्याचे अस्तित्व! - Row in Thane corporation over letter to MNS | Politics Marathi News - Sarkarnama

मनसेचा एकही नगरसेवक नाही पण तरीही ठाणे महापालिकेच्या लेखी गटनेत्याचे अस्तित्व!

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

हापालिकेच्या निवडणुकीत मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. पण तरीही महापालिकेच्या मुख्यालय उपायुक्तांनी महापालिकेचे एक पत्र थेट मनसेच्या गटनेत्याच्या नावाने पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुळात नगरसेवक निवडून न आलेल्या पक्षाचा नेता महापालिकेने परस्पर तयार केला, असे म्हणत त्याला भाजपाने आक्षेप घेतला आहे

ठाणे : महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. पण तरीही महापालिकेच्या मुख्यालय उपायुक्तांनी महापालिकेचे एक पत्र थेट मनसेच्या गटनेत्याच्या नावाने पाठविल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुळात नगरसेवक निवडून न आलेल्या पक्षाचा नेता महापालिकेने परस्पर तयार केला, असे म्हणत त्याला भाजपाने आक्षेप घेतला आहे.

कोव्हिड रुग्णालयाच्या वादाच्या काळात महापालिका मुख्यालय उपायुक्तांकडून मनसेला एक पत्र पाठविण्यात आले आहे. यामध्ये मनसेच्या संबधित पदाधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख आवश्‍यक असताना हे पत्र मनसे गटनेतेच्या नावाने काढण्यात आल्याने वाद निर्माण झालेला आहे. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.

ठाणे महापालिकेने उभारलेल्या विशेष कोविड रुग्णालयासाठी महापालिकेने कंत्राटी तत्वावर कर्मचाऱ्यांची भरती केली होती. कालांतराने संबंधित कर्मचारी पुरविण्यासाठी निविदा मंजूर केली. त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांचे करार दहा ऑगस्ट रोजी रद्द करण्यात आले होते. परंतु, वीस ऑगस्ट रोजी महापालिका उपायुक्त (मुख्यालय) विजयकुमार म्हैसाळ यांनी एका आदेशाद्वारे बायोमेडिकल इंजिनियरसह, एच. आर. मॅनेजर, रिसेप्शनिस्ट, फार्मासिस्ट, डाटाएंट्री ऑपरेटर आदी बावीस कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती केली आहे. 

एकीकडे मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट दिले जात असताना, बावीस कर्मचाऱ्यांची दोन महिन्यांसाठी केलेली नियुक्ती संभ्रमात टाकणारी असल्याचा आरोप माजी गटनेते नारायण पवार यांनी केला आहे. कंत्राट दिले असतानाही संबंधित कर्मचाऱ्यांचा पगार महापालिकेच्या तिजोरीतून दिला जाणार आहे का, असा प्रश्न निर्माण होत असल्याने या विषयाची सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बाळकूम येथील विशेष कोविड रुग्णालय उभारण्यासाठी महापालिका, एमएमआरडीए, जितो-एमसीएचआय यांचा एकत्रितपणे सहभाग होता. या रुग्णालयासाठी निधी उभारण्यासाठी जितो-एमसीएचआयला परवानगी दिली होती. मात्र, सद्यस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी भरती व मनुष्यबळ पुरविण्याचे कंत्राट महापालिकेकडून दिले जात आहे. अशा परिस्थितीत जितो-एमसीएचआयची नक्की भूमिका कोणती, हा प्रश्न सामान्य ठाणेकरांना पडला आहे. या संदर्भातही सविस्तर माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच महापालिका उपायुक्त (मुख्यालय) यांनी संबंधित पत्र गटनेता - महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांना पाठविले आहे. प्रत्यक्षात महापालिकेच्या सभागृहात मनसेचा एकही नगरसेवक निर्वाचित नाही. महापालिकेत निवडून आलेल्या भाजपा, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना आदींच्या गटनेत्यांना माहितीसाठी पत्र न पाठविता अस्तित्वात नसलेल्या मनसेच्या गटनेत्याला पत्र पाठविल्याने महापालिकेच्या गोंधळाचा एक नमुना उघड झाला आहे. महापालिकेच्या कारभारात गटनेतेपदाचा अन्यनसाधारण महत्व आहे. अशावेळी परस्पर गटनेते पद स्थापन करण्यात आल्याने नारायण पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

महापालिकेच्या कारभारात गटनेतेपदाला अन्यनसाधारण महत्व आहे. पक्षाची महापालिकेतील अधिकृत भूमिका गटनेत्याकडून मांडली जात असते. पण मनसेचा एकही नगरसेवक निवडून आलेला नसताना त्यांना परस्पर गटनेतेपद बहाल करणाया या प्रकरणाची चौकशी होण्यासाठी आपण महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पत्र दिले आहे.
नारायण पवार,गटनेते, भाजप

या विषयाची सविस्तर माहिती घेतली जात आहे. तसेच काही त्रुटी होऊन असे पत्र गेले असल्यास यापुढील काळात त्याबाबत योग्य ती काळजी घेण्यात येईल.
संदीप माळवी, ठाणे महापालिका, उपायुक्त  

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख