बैठक आघाडीसाठी; पण काँग्रेस नेत्यांनी मांडल्या मनातल्या व्यथा - Pune Congress Leader Put their Grievances in Party Meeting | Politics Marathi News - Sarkarnama

बैठक आघाडीसाठी; पण काँग्रेस नेत्यांनी मांडल्या मनातल्या व्यथा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 ऑगस्ट 2020

शहर कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार, प्रदेश आणि शहर पदाधिकारी यांची शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत दोनचा की सिंगल वॉर्ड, महाविकास आघाडी सहभागी व्हावे की नाही, यासह विविध विषयांवर चर्चा झाली. काही पदाधिकाऱ्यांनी सिंगल वॉर्डची आग्रही भूमिका मांडली, तर काहींनी दोनच्या प्रभागाला सहमती दर्शविली

पुणे  : "आगामी महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी करण्यापूर्वी पक्षाला किती जागा मिळणार, हे आधी ठरवा; त्यानंतरच आघाडी बाबतचा निर्णय घ्या,' असे शहर कॉंग्रेसच्या झालेल्या बैठकीत एकमताने ठरविण्यात आले. आगामी निवडणुकीची व्यूहरचना ठरविण्यासाठी बोलाविलेल्या या बैठकीत अनेकांनी आपली दुखणी यानिमित्ताने मांडून घेतली.

शहर कॉंग्रेसचे आजी-माजी आमदार, प्रदेश आणि शहर पदाधिकारी यांची शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत काही पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीत दोनचा की सिंगल वॉर्ड, महाविकास आघाडी सहभागी व्हावे की नाही, यासह विविध विषयांवर चर्चा झाली. काही पदाधिकाऱ्यांनी सिंगल वॉर्डची आग्रही भूमिका मांडली, तर काहींनी दोनच्या प्रभागाला सहमती दर्शविली. तसे झाले तर जागा वाटपात कॉंग्रेसला स्थान मिळू शकले, असे सांगितले.

तेव्हा एका पदाधिकाऱ्याने वॉर्ड की प्रभाग कितीचा असावा, यापेक्षा निवडणुकीत एकमेकांना साह्य करा. आधी एकत्र या. गेल्या निवडणुकीत मी चार तिकिटे मागितली; पण पक्षाने दिली नाही. त्यामुळे मी एकटा उभा राहिलो आणि निवडून आलो. काही जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. ते उभे राहिले असते, तर पक्षाची संख्या दोनने वाढली असती. काही जण असे ऐनवेळी माघार घेतात, असा टोलाही एका पदाधिकाऱ्याला लगाविला, तर दुसऱ्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून मिळणाऱ्या वागणुकीबद्दल उघड उघड नाराजी व्यक्त केली.

अनेक गोष्टीत शहर कॉंग्रेस म्हणून आपण आपली भूमिका मांडली पाहिजे. अध्यक्ष तुम्हाला अडचण येत असेल, तर आम्हाला बोलवा, आम्ही ती मांडू, अशी एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने अध्यक्षांना सूचना केली. त्यावर पुणे विद्यापीठ पूल पाडण्यासंदर्भात भूमिका ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्षांना फोन केला, तर त्यांनी पालकमंत्र्यांचे नाव पुढे करून गप्प बसण्याच्या सूचना केली. काय करणार? अशा शब्दांत एका नेत्याने आपली व्यथा मांडली.

पक्षश्रेष्ठींचे शहर कॉंग्रेसकडे दुर्लक्ष
आपण जरी काही ठरवत असलो, तरी पक्षश्रेष्ठी शहर कॉंग्रेसला विचारात घेत नाही. राज्यातील एकही नेता अजित पवार यांच्यामुळे पुण्यात लक्ष घालण्यास तयार नाही, असे एका पदाधिकाऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. अखेर आजच्या बैठकीत 

पक्ष सोडलेल्यांसाठी समिती
वॉर्डरचनेसह विविध समित्या स्थापन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्याचवेळी "गेल्या निवडणुकीत जे पक्षाबाहेर गेले त्यांना परत आणण्यासाठी, तसेच जे सध्या पक्षात आहेत, ते पक्ष सोडून जाणार नाहीत, त्यासाठी समिती नेमा,'' अशीदेखील सूचना बैठकीत करण्यात आली.
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख