कुणीही उठते आणि म्हणते...करु का दादांना फोन; प्रशासकीय यंत्रणा झाली हैराण - Administration irritated due to Threats to call Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

कुणीही उठते आणि म्हणते...करु का दादांना फोन; प्रशासकीय यंत्रणा झाली हैराण

मिलिंद संगई
सोमवार, 31 ऑगस्ट 2020

शहर असो की तालुका प्रत्येक रुग्णालाच 'व्हीआयपी ट्रीटमेंट'ची अपेक्षा असल्याचे दिसते. त्यामुळे थेट अजितदादांना फोनवरुन तक्रारीचा दमच अधिका-यांना दिला जातो. अनेकदा अधिका-यांशी होणा-या संवादाचे रेकॉर्डींग करुन ते व्हायरल करण्याच्याही धमक्या दिल्या जातात. कामाच्या ताणाने त्रस्त असलेली यंत्रणा आता या नव्या बाबीला तोंड देत काम करत असल्याने वरिष्ठ पदाधिका-यांनी यात समन्वयाची भूमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे

बारामती : कोरोना संशयितांच्या तपासण्यांची वाढलेली संख्या, त्यात पॉझिटीव्ह सापडणाऱ्यांचीही वाढती संख्या, अशा लोकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची व त्यांच्या तपासण्यांची होणारी घाई, थोडासा जरी ताप, सर्दी, खोकला झाला की तपासणीसाठी होणारा आग्रह...या ओझ्यांखाली प्रशासकीय यंत्रणा दबून गेली आहे. त्यात थोडेजरी मनाविरुद्ध झाले की मग धमकीवजा विचारणा होते....करु का अजितदादांना फोन! ग्रामीण भागात वारंवार येत असलेल्या या अनुभवामुळे प्रशासकीय यंत्रणा जाम वैतागली आहे.

बारामतीत कोरोनाच्या साथीत आरोग्य, महसूल, नगरपालिका, पंचायत समिती या सह सर्वच यंत्रणांचे काम रात्रंदिवस सुरु आहे.  कोरोना नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासणीचे कामही अव्याहतपणे सुरु आहे. वास्तविक इतर तालुक्यांच्या तुलनेत बारामतीत तपासणी संख्या व रिपोर्ट मिळण्याची गती दोन्हीही जास्त आहे. तपासणीमध्ये अनेक जण पॉझिटीव्ह येतात. मग त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधायच्या, त्यांच्या तपासण्या करायच्या, प्रतिबंधित क्षेत्र ठरवायचे, रुग्णांच्या निवास, भोजनाची सोय करायची, रुग्णवाहिका पाठवून रुग्णांना दाखल करुन घ्यायचे, प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्याची धडपड करायची, यातच कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करायची, या सारख्या कामात यंत्रणा पूर्णपणे व्यग्र आहे.

अशा प्रकारचे संकट प्रथमच आले आहे. त्यामुळे अनेकदा अचानक येणा-या अडचणींचा अंदाज प्रशासनालाही नसतो, त्या मुळे अडचण निर्माण झाल्यावर त्या त्या परिस्थितीत उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा साधनांच्या कमतरतेसह मनुष्यबळाचीही अडचण यंत्रणेसमोर उभी राहते. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच प्रशासनातील व्यवस्थेलाही सांभाळून घेण्याची कसरत अधिका-यांना करावी लागते. त्यात विशेषतः  ग्रामीण भागातून रुग्णांना घेऊन येणा-या रुग्णवाहिकांच्या बाबतीत, रुग्ण दाखल करुन घेण्यासह इतर सुविधांच्या बाबतीतही थोडा उशीर झाला की गावपातळीवरील कार्यकर्ते अधिका-यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच थेट तक्रारीची धमकी देतात. 

गेल्या १८  मार्च पासून सर्वच यंत्रणा सुटी न घेता सातत्याने काम करत असल्याने दमून गेली आहे. पण शहर असो की तालुका प्रत्येक रुग्णालाच 'व्हीआयपी ट्रीटमेंट'ची अपेक्षा असल्याचे दिसते. त्यामुळे थेट अजितदादांना फोनवरुन तक्रारीचा दमच अधिका-यांना दिला जातो. अनेकदा अधिका-यांशी होणा-या संवादाचे रेकॉर्डींग करुन ते व्हायरल करण्याच्याही धमक्या दिल्या जातात. कामाच्या ताणाने त्रस्त असलेली यंत्रणा आता या नव्या बाबीला तोंड देत काम करत असल्याने वरिष्ठ पदाधिका-यांनी यात समन्वयाची भूमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे अधिका-यांचाही आता संयम सुटत चालला असल्याचे दिसते आहे. यात समन्वय राखणे गरजेचे बनले आहे. 

प्रत्येक रुग्णाला चांगली व्यवस्था देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य सरकारची नियमावली व उपलब्ध यंत्रणा यांचा समन्वय साधून प्रशासन रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्थितीत लोकांनी संय़म ठेवून प्रशासनाचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे, असे मत बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, यांनी व्यक्त केले आहे. 
Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख