नाईकांची साथ सोडून २५ नगरसेवक राष्ट्रवादीतच राहणार !

राष्ट्रवादीमध्ये जे निष्ठावान राहणार आहेत, असे 25 नगरसेवक आमच्यासोबत आहेत. 'जे सोबत येतील ते, जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय' आम्ही नवी कार्यकारिणी नियुक्त करण्याची अध्यक्ष शरद पवारांकडे विनंती करणार आहोत.- अशोक गावडे, माजी उपमहापौर व नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेस
Ganesh_Naik_
Ganesh_Naik_

नवी मुंबई  : आमदार संदीप नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर आणि माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या प्रवेशाच्या शक्‍यतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. भाजपच्या वाटेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना शह देण्यासाठी लवकरच राष्ट्रवादीची नवी मुंबईतील जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या नवी मुंबईतील घरी ज्येष्ठ नेते आमदार दिलीप वळसे-पाटील व जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तब्बल 25 नगरसेवकांनी हजर राहून भाजपमध्ये न जाण्याची शपथ घेतली.

नाईक कुटुंबाच्या भाजप प्रवेशामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. भाजप प्रवेशाचा जेवढा आनंद भाजपमध्ये केला जात नसेल, तेवढा धक्का राष्ट्रवादीच्या नेत्यांना बसला आहे. संदीप नाईक यांनी त्यांचा चुलत भाऊ सागर नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला असला, तरी ज्या नगरसेवकांच्या जीवावर नाईक कुटुंब भाजपमध्ये सत्तेची फळे चाखणार होते, त्या नगरसेवकांना गुंतवण्यासाठी राष्ट्रवादीतर्फे राजकीय खेळी खेळण्यास सुरुवात झाली आहे. 

सध्या राष्ट्रवादीचे 52 नगरसेवक व सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन भाजपमध्ये जाण्याचा निर्धार केला होता. ती जिल्हा कार्यकारिणीच बरखास्त करून तत्काळ नवीन जिल्हा कार्यकारिणी नियुक्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतला आहे. बैठकीत राष्ट्रवादीच्या नवीन कार्यकारिणी आणि तिच्यावर नियुक्त केल्या जाणाऱ्या नेत्यांच्या नावाची चर्चा झाली. 

या प्रसंगी उपस्थित 25 नगरसेवकांनीही आपण अखेरपर्यंत राष्ट्रवादीमध्येच थांबणार असल्याची खात्री दिली. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते शनिवारी (ता. 3) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे भेट घेणार आहेत. या भेटीत जुनी कार्यकारिणी बरखास्त करणे व नवीन कार्यकारिणी निवड करणे या विषयांवर चर्चा होण्याची शक्‍यता आहे.

राष्ट्रवादीमध्ये जे निष्ठावान राहणार आहेत, असे 25 नगरसेवक आमच्यासोबत आहेत. 'जे सोबत येतील ते, जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय' आम्ही नवी कार्यकारिणी नियुक्त करण्याची अध्यक्ष शरद पवारांकडे विनंती करणार आहोत.
- अशोक गावडे, माजी उपमहापौर व नगरसेवक,

राष्ट्रवादी कॉंग्रेस

गणेश नाईकांचे मौन
पुत्र संदीप नाईक व पुतण्या सागर नाईक यांनी काही माजी नगरसेवकांसोबत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी त्याबाबत आजपर्यंत मौन बाळगलेले आहे. गणेश नाईकांची भूमिका ऐकण्यासाठी गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या व्हाईट हाऊसवर आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीलाही ते उपस्थित राहिले नाहीत. तसेच त्यांनी कोणते संदेशही पदाधिकाऱ्यांकडे पाठवलेले नाहीत. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com