गणेश नाईक- विजय चौगुले यांच्यात मनोमिलन !

..
Chaugule-naik
Chaugule-naik

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जाणाऱ्या नाईक-चौगुले गटाचे मनोमिलन झाल्याचे समजते आहे.

येत्या 25 सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वडार भवनाच्या सदिच्छ भेटीच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवर गणेश नाईकांचे छापलेले फोटो त्याचे द्योतक आहे. तसेच लवकरच आम्ही गणेश नाईकांना भेटून आमंत्रण देणार असल्याचे स्पष्टीकरण शिवसेनेचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी दिले.


जर मातोश्रींच्या मनात असेल तर मी ऐरोली मतदार संघातून निवडणूक लढण्यास तयार आहे अशी इच्छा महाराष्ट्र राज्य वडार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी सोमवारी व्यक्त केली.

सानपाडा येथे चौगुले यांच्या नवी मुंबई वडार समाज संघातर्फे तयार करण्यात आलेल्या वडार भवनला बूधवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सदिच्छा भेट देणार आहेत. 

या भेटीचे औचित्यसाधून आयोजित कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी चौगुलेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परीषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तरे देताना चौगुलेंनी इच्छा व्यक्त केली.

विधानसभा निवडणूकांच्या जागा वाटपांवरून शिवसेना आणि भाजप यूतीचे घोडे आडलेले आहे. त्यामुळे नवी मुंबईत येणाऱ्या दोन मतदार संघापैकी नेमकी कोणती जागा कोणाला सोडणार याबाबत अद्याप दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालेले नाही. या परिस्थितीत गणेश नाईक कुटुंबियांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे आणखिनच पेच वाढला आहे. 

ऐरोली मतदार संघासोबतच नाईकांकडून बेलापूर मतदार संघावरही दावा केला जात असल्याने भाजपचे पक्षश्रेष्टी द्विधा मनःस्थितीत अडकलेले आहेत. तर बेलापूरमधून निवडणूक लढण्यास उपनेते विजय नाहटा याआधीपासूनच तयारी करीत असल्याने शिवसेनेचाही बेलापूर मतदार संघावर दावा केला जात आहे. 

काही दिवसांपूर्वीच युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरेंनी जनआशिर्वाद यात्रेदरम्यान पुन्हा बेलापूरमध्ये प्रचाराला येणार असल्याचे भाकित करून बेलापूर मतदार संघावर अप्रत्यक्ष दावा केला आहे. ऐरोलीतही भाजपकडून संदीप नाईक रिंगणात उतरण्याची शक्‍यता आहे.

परंतू युती न झाल्यास एकटे लढण्यासाठी सेनेतर्फेही चाचपणी केली जात आहे. ऐरोली मतदार संघाकरीता सहा इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात चौगुलेंचे नाव नसले तरी मात्र आज पत्रकारांसोबत बोलताना चौगुले यांनी पक्षाश्रेष्टींनी संधी दिल्यास नक्की सोने करीन अशी प्रतिक्रीया देऊन इच्छा व्यक्त केली आहे.

सानपाडा येथे उभारलेले वडार भवन हे नवी मुंबई वडार समाज संघातर्फे चालवले जाणार आहे. या भवनात असणारे बहुउद्देशिय सभागृह आणि वास्तव्याकरीता खोल्या वडार समाजातील होतकरु मूलांसाठी खुले असणार आहेत.

   राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या प्रत्येक वडार समाजाच्या मूलांसाठी हे हक्काचे आश्रयस्थान असणार आहे.  अशी माहिती महाराष्ट्र राज्य वडार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com