ganesh naik | Sarkarnama

गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाच्या वावड्या

संदीप खांडगे पाटील
सोमवार, 24 एप्रिल 2017

नवी मुंबई : ठाण्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला दोन दिवसापासून गती मिळाली असून 1 मे रोजी अर्थात "महाराष्ट्र दिनी' गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसला "जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक राजकीय सूत्रांकडून देण्यात येत आहे. तथापि शरद पवारांचे व गणेश नाईकांचे जवळचे संबंध असून आणि काही दिवसापूर्वीच शरद पवारांनी गणेश नाईकांच्या घरीही भेट दिल्याने ही अफवा असल्याचे सांगत महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांकडून या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे. 

नवी मुंबई : ठाण्याचे माजी पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मातब्बर नेते गणेश नाईक हे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला दोन दिवसापासून गती मिळाली असून 1 मे रोजी अर्थात "महाराष्ट्र दिनी' गणेश नाईक राष्ट्रवादी कॉंग्रेसला "जय महाराष्ट्र' करून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक राजकीय सूत्रांकडून देण्यात येत आहे. तथापि शरद पवारांचे व गणेश नाईकांचे जवळचे संबंध असून आणि काही दिवसापूर्वीच शरद पवारांनी गणेश नाईकांच्या घरीही भेट दिल्याने ही अफवा असल्याचे सांगत महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवकांकडून या चर्चेत काहीही तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे. 

काही दिवसापासून महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रात नारायण राणे व गणेश नाईक यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना गती मिळाली आहे. नारायण राणे यांनी आमदार पुत्र नीतेश राणेंसह केलेली अहमदाबाद वारी व्हायरल झाल्याने राणेंच्या कमळप्रेमाला दुजोराही मिळू लागला. राणेंकडून या वारीचा स्वीकार करण्यात आला असला तरी भाजपप्रवेशाबाबत नकार देण्यात आला आहे. तथापि राणेंसह माजी खासदार नीलेश राणे व आमदार नीतेश राणे सातत्याने कॉंग्रेसच्या पडझडीसाठी प्रदेश नेतृत्व अशोक चव्हाण यांनाच जबाबदार धरून टीकेची झोड उठवत असल्याने राणे परिवार कॉंग्रेस पक्ष सोडणार असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे. 

गणेश नाईकदेखील राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेना अथवा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा ठाणे जिल्ह्यात जोरदार सुरू आहे. गणेश नाईक हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिकच असून 1999 मध्ये शिवसेना सोडल्यावर त्यांनी आजतागायत शिवसेना नेतृत्वावर अथवा शिवसेनेवर इतरांप्रमाणे कधीही टीका केली नाही. उलट राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात अथवा सार्वजनिक कार्यक्रमात शिवसेनेतील शिस्तबद्ध कार्यक्रमाविषयी "मी पलीकडच्या घरात असताना' असे सांगत शिवसेनेच्या शिस्तबध्दतेची प्रशंसा केली होती.

सुरवातीला गणेश नाईक शिवसेनेत प्रवेश करणार असून मातोश्रीशी जवळपास बोलणे निश्‍चित झाले असल्याच्या चर्चेवर ठाण्याच्या राजकारणात पैजाही लागत होत्या. त्यानंतर गणेश नाईकांच्या भाजप प्रवेशाविषयी राजकीय क्षेत्रात पैजा लागल्या आहेत. 28 मार्च रोजी गणेश नाईक दिल्लीत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या माध्यमातून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली असल्याचे भाजपतील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यातच दोनच दिवसानंतर बेलापूरच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेऊन गणेश नाईक भाजपमध्ये आल्यास मी आरतीचे ताट घेऊन त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. 

आमदार मंदा म्हात्रेंच्या वक्तव्याचे गणेश नाईकांकडून आजतागायत खंडन अथवा समर्थनही करण्यात आलेले नाही. गणेश नाईकांच्याविषयी राजकीय क्षेत्रात उठत असलेल्या वावड्यांविषयी नाईक अद्यापि मौन बाळगून असल्याने नाईकांच्या समर्थकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नाईक समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढीस लागली आहे. 

एप्रिल 2015 मध्ये नवी मुंबई महापालिकेच्या पाचव्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर गणेश नाईक भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. लोकसभा निवडणुकीतील मोदी लाटेमुळे डॉ. संजीव नाईकांचा 2 लाख 84 हजार इतक्‍या मतांनी झालेला दणदणीत पराभव, त्यापाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गणेश नाईकांचा 1200 मतांनी झालेला निसटता पराभव या पार्श्‍वभूमीवर नाईक समर्थकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती.

नाईक समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना अथवा भाजपमध्ये जाण्याच्या हालचालीही सुरू केल्या होत्या. वाशी सेक्‍टर मधील गणेश नाईक समर्थक संपत शेवाळे हे भाजपत गेले आणि पत्नीला भाजपच्या नगरसेविका बनविले. ऐरोली नोडमधील गणेश नाईकांचे कडवट समर्थक एम.के.मढवी हे शिवसेनेत गेले, त्यांनी स्वत:सह पत्नी व मुलाला महापालिका सभागृहात नगरसेवक म्हणून निवडून आणले. महापालिका निवडणुकीपूर्वी शरद पवार उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात दाखल असताना वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये भरत नखातेंसह अन्य नाईक समर्थकांनी मेळावा भरवीत नाईकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडून शिवसेना अथवा भाजप या राजकीय पर्यायाचा स्वीकार करावा असे उघडपणे सांगत त्यांना गळ घातली होती. या मेळाव्याला आमदार संदीप नाईक व तत्कालीन महापौर सागर नाईकही उपस्थित होते.

तथापि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आपल्या समर्थकांची सुरू असलेली गळती थांबविण्यासाठी गणेश नाईकांनी पक्षांतर खेळीच्या चर्चेची रणनीती असल्याचे ते निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. गेल्या मार्च महिन्यात 26 तारखेला गणेश नाईकांनी दिल्लीत असताना त्यांनी नितीन गडकरींच्या माध्यमातून अमित शहांची भेट घेतल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे व त्यापाठोपाठ भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी आपण नाईकांच्या स्वागतासाठी आरतीचे ताट घेऊन उत्सुक असल्याचे पत्रकार परिषदेत केलेले वक्तव्य आणि नाईकांनी बाळगलेले यावरचे मौन याबाबत ठाणे जिल्ह्यात सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.

1 मे रोजी गणेश नाईक माजी खासदार डॉ. संजीव नाईक व माजी महापौर सागर नाईकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. दोन-तीन नगरसेवकांचा अपवाद वगळता अन्य सर्वच नगरसेवक नाईक जातील त्या पक्षामध्ये जाण्याची शक्‍यता आहे. भाजपचे सभागृहात सध्या 6 नगरसेवक असल्याने उद्या नाईकांनी भाजप प्रवेश केल्यास सत्तेचे सुकाणू पेलणे नाईकांना अवघड जाणार नाही. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख