डॉ. गणेश देवी म्हणताहेत, मी निवडणुकीच्या रिंगणात...पण

''निवडणुकीसंदर्भात याआधी मी कधीही बोललो नाही; पण आता बोलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला निवडणूक लढवायची नाही; पण हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. त्यासाठी सतत बोलत लोकांना सतर्क करायचे आहे. निवडणूक संपली की माझे हे काम संपेल,'' असे ज्येष्ठ विचारवंत, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी येथे सांगितले.
डॉ. गणेश देवी म्हणताहेत, मी निवडणुकीच्या रिंगणात...पण

लातूर : ''निवडणुकीसंदर्भात याआधी मी कधीही बोललो नाही; पण आता बोलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. मला निवडणूक लढवायची नाही; पण हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवायचे आहे. त्यासाठी सतत बोलत लोकांना सतर्क करायचे आहे. निवडणूक संपली की माझे हे काम संपेल,'' असे ज्येष्ठ विचारवंत, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी येथे सांगितले. नागरिकांच्या हक्कांसाठी, संविधान बचावासाठी दिल्लीत आता राजकीय भूकंप होण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्या वतीने आयोजित संविधान गौरव परिषदेत डॉ. देवी यांनी 'भारतीय संविधान: भटके विमुक्त, बहुजन आणि आजचे वास्तव' या विषयावर संवाद साधला. ते म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत खास काही केले नाही. भांडवलशाहीच्या हातात गेलेले जगभरातील हुकुमशहा जे करतात तेच मोदींनी केले. भारत खऱ्या अर्थाने 'सुजलाम सुफलाम' ठेवायचा असेल तर अशा हुकूमशहांना सत्तेपासून दूर ठेवा. मतदार या नात्याने सजग रहा. विचारपूर्वक मत द्या. संविधानाने दिलेले हे शस्त्र आहे. याचा नीट वापर करा.''

डॉ. देवी म्हणाले, "गेल्या पाच वर्षांत सरकारने स्वतःची गुर्मी वाढवली. झुंडशाही, झोडपशाही वाढवली. शेतकऱ्यांची अवहेलना केली. लोकांना होणाऱ्या यातनांकडे लक्ष दिले नाही. लोकांना खोटी स्वप्ने दाखवली. सतत खोटी आश्वासने दिली. ही काय राज्य करायची पद्धत आहे? या कारणामुळे माझा तुम्हाला विरोध राहील, असे म्हणण्याची हिंमत दाखवा. मनुस्मृती माथी बसण्याआधी संविधानावर विश्वास असणाऱ्यांना पुढे आणा. घाबरू नका. निर्भय बना.''

''आपल्या देशात १२ कोटी भटके विमुक्त आहेत. त्यांच्या नागरी हक्काला कात्री लावली जात आहे. उत्तर पूर्वेकडील देशातही असेच सुरु आहे. अशा छोट्या छोट्या घाणेरड्या युक्त्या करून सरकार नागरिकत्वाचे हक्क कमी आहे. हे सरकार दिल्लीत बसून संविधान बदलण्यापेक्षा अशा घटनांतून संविधान बदलत आहे. त्यामुळे आपण जागरूक राहायला हवे,'' असेही डॉ. देवी यांनी सांगितले. या वेळी साहित्यिक डॉ. नागोराव कुंभार, विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे प्रमुख धनाजी गुरव, समाजवादी नेते मनोहर गोमारे, डॉ. शिवाजी जवळगेकर, संघटनेचे प्रदेश नेते सुधीर अनवले उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com