पोलिसांची गांधीगीरी... आज गुलाब घ्या...पुन्हा दिसलात प्रसाद देऊ!  

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वारंवार विविध प्रकारे विनंती व सुचना देऊनही काही ठराविक लोकांकडून त्याचे उल्लंघन होतेच. त्यावर ओझर पोलिसांनीगांधीगिरीचा उपाय केला
Nashik District Ozar Police Doing Gandhigiri
Nashik District Ozar Police Doing Gandhigiri

ओझर : शासनेने लॉकडाऊन जाहीर केले आहे. तरीही अनेक विनाकारण घराबाहेर पडतातच. अनेकदा सांगूनही योग्य परिणाम होत नाही. त्यामुळे येथील पोलिसांनी आता वेगळीच शक्कल लढवली आहे. घराबाहेर पडणाऱ्यांची प्रेमाने चौकशी करुन गुलाबपुष्प देत गांधीगीरी सुरु केली आहे. 'दादा, घराबाहेर पडू नका. आज गुलाबाचे फुल देऊन स्वागत करतो आहे. पुन्हा दिसलात तर मात्र....वेगळे स्वागत होईल' असा प्रयोग सुरु केल्याने त्याचा चांगलाच परिणाम दिसू लागला आहे.

लाॅकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वारंवार विविध प्रकारे विनंती व सुचना देऊनही काही ठराविक लोकांकडून त्याचे उल्लंघन होतेच. अशा लोकांकडे कारणांचा तुटवडा नाही. लोक अशी कारणे सांगतात की पोलिसही निरुत्तर होतात. त्यामुळे प्रशासन अक्षरशः वैतागले आहे. त्यामुळे विचारपूस न करता वेगळाच उपक्रम पोलिसांनी ओझर, एचएएल वसाहत असलेल्या ओझरटाऊनशिप परिसरातील नागरिकांसाठी सुरु केला आहे. पोलिस निरिक्षक भगवान मथुरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या भागात जाऊन 'लॉकडाऊन'चे महत्व व त्याचे उल्लंघन केल्यास समाजाला होणारा धोक्‍याची माहिती देत जनजागृती केली. नागरिकांनी घरातच थांबावे असे आवाहन केले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

या उपक्रमानंतर देखील काही ठराविक मंडळी विविध कारणे देत बाहेर हिडतांना दिसतात. त्यावर त्यांनी गांधीगिरीचा उपाय केला. दंडुक्‍याचा वापर न करता पोलीस निरिक्षक भगवान मथुरे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक विजय गायकवाड, हवालदार चौगुले, श्री. खांडवी, बाळासाहेब पानसरे, भास्कर पवार, अरूण गायकवाड, भुषण शिंदे, अनूप जाधव, श्री. अहिरराव आदिंनी शुक्रवारी दिवसभर गांवातील रस्त्यावर फिरून विनाकारण रस्त्यावर फिरणारे दुचाकीस्वार, वाहनचालक, पादचाऱ्यांना थांबवून गुलाबपुष्प देत 21 दिवस घरातच थांबण्यासाठी समजावले. शेवटी 'आज गुलाब घ्या. पुन्हा दिसलात तर वेगळा प्रसाद मिळेल. सोबत कारवाई करु ती वेगळी' असा कडक इशारा दिला.

ओझर गावातील मशीदीचे मौलाना व ट्रस्टी याना समक्ष भेटून गुलाबपुष्पे देऊन शासनाचे जमावबंदी आदेशाचे पार्श्वभूमीवर मशीदीत नमाजसाठी गर्दी करू नये, लोकांनी घरातच नमाज अदा करावी बाबत सुचना दिल्या. तरीही जर मशीदीत गर्दी केल्याचे दिसून आल्यास संबंधीतांवर गुन्हे दाखल केले जातील, अशा स्पष्ट सुचना दिल्या. त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com