शहिदाची पत्नी झाली उपशिक्षणाधिकारी - Gadhchiroli News Martyers Wife | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

शहिदाची पत्नी झाली उपशिक्षणाधिकारी

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 18 जानेवारी 2018

माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पत्नीने पतीविरहाचे दुःख बाजूला ठेऊन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्या आता गडचिरोली जिल्ह्यात उपशिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत. हेमलता परसा असे त्यांचे नाव आहे.

गडचिरोली : माओवाद्यांशी लढताना शहीद झालेल्या पत्नीने पतीविरहाचे दुःख बाजूला ठेऊन यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण केली. त्या आता गडचिरोली जिल्ह्यात उपशिक्षणाधिकारी म्हणून रूजू झाल्या आहेत. हेमलता परसा असे त्यांचे नाव आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्‍यातील जुरू परसा हा आदिवासी तरुण पोलिस दलात रूजू झाला. लाहेरी येथे माओवाद्यांशी लढताना 8 ऑक्‍टोबर 2009 रोजी जुरू परसा याला वीरमरण आले. त्यापूर्वी काही महिन्यांपूर्वीच जुरूचे हेमलता यांच्याशी लग्न झाले होते. हेमलता एम. ए. झाल्या होत्या व गडचिरोली येथे एका शाळेत शिक्षिका होत्या. आयुष्याची सोबत करणारा साथीदार त्यांच्यापासून दैवाने हिरावून घेतला होता. वर आकाश व खाली धरती याशिवाय हेमलता यांच्याजवळ काहीही शिल्लक राहिले नव्हते.

आयुष्यावर कोसळलेल्या संकटाचा सामना करण्याचा निर्धार हेमलता यांनी केला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्याचा निर्धार केला. गडचिरोलीमध्ये चांगल्या मार्गदर्शनाची कोणतीही सुविधा नसताना हेमलता यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. गेल्या 10 जानेवारीला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला व त्यात हेमलता या उत्तीर्ण झाल्या. त्यांची उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली आहे. पतीविरहामुळे अश्रू गाळत बसण्यापेक्षा हेमलताने स्पर्धा परीक्षेची तयारी करून नव्या जीवनाची सुरूवात केली. हेमलता यांच्या या यशाबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी हेमलता यांचा सत्कार केला.

परिस्थितीला धैर्याने सामोरे जा- हेमलता
या संघर्षाबद्दल बोलताना हेमलता परसा म्हणाल्या, ''पतीला वीरमरण आल्यानंतरचा काळ खूप कठीण होता. काय करावे, हेच समजत नव्हते. परंतु, जीवन समोर होते. याची जाणीव झाल्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरूवात केली. ही कठीण परीक्षा उत्तीर्ण केली. माझ्या सारख्या भगिनींना हेच सांगणे आहे की, आलेल्या परिस्थितीला धैर्याने सामोरे जा. जीवन खूप मोठे आहे. तुमच्या आयुष्यात ज्या काही घटना घडतात, त्या जीवनाचा एक भाग असतात. त्या ओलांडून आपल्याला समोर जाता आले पाहिजे.''

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख