friendship of two rupalis | Sarkarnama

मनसे आणि राष्ट्रवादीतील दोन रूपालींची अशीही मैत्री : महिलांवर टीका करणाऱ्याला शिकवला धडा 

ज्ञानेश सावंत
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

पुणे : राजकारणात पक्षीय भूमिका मांडताना विरोधक एकमेकांवर हल्ले चढवून, घायाळ करण्याचा प्रयत्न करतात. आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत महिला नेत्यांही आघाडीवर असतात. पण, राजकीय आखाड्यात जेव्हा, महिलांना वैयक्तिक टीकेचे लक्ष्य केले जाते तेव्हा राजकारण बाजूला ठेवून या टिकेचा समाचार घेण्याची भूमिका इतर पक्षांतील महिलांनी घेतली. 

पुणे : राजकारणात पक्षीय भूमिका मांडताना विरोधक एकमेकांवर हल्ले चढवून, घायाळ करण्याचा प्रयत्न करतात. आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत महिला नेत्यांही आघाडीवर असतात. पण, राजकीय आखाड्यात जेव्हा, महिलांना वैयक्तिक टीकेचे लक्ष्य केले जाते तेव्हा राजकारण बाजूला ठेवून या टिकेचा समाचार घेण्याची भूमिका इतर पक्षांतील महिलांनी घेतली. 

राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पुणे शहराध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत फेसबुकवर आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्याला बीडमध्ये जाऊन धडा शिकविण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर महिला आघाडीच्या रूपाली पाटील यांनी घेतली. त्यांच्या या पवित्र्यानंतर संबंधिताने ती पोस्ट डिलीट केली. या प्रसंगाचा मात्र योग्य तो धडा खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्यांना मिळाल्याची चर्चा सुरू झाली. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बीड येथे जोरदार सभा झाली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी तेथे फटकेबाजीही केली. त्यावर भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी टीका केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची माझ्यासमोर उभे राहण्याची लायकी नसल्याचे उद्‌गार त्यांनी काढले. त्यावर रूपाली चाकणकर यांनी सोशल मिडियात टिप्पणी केली. ""ताई, राष्ट्रवादीच्या सभेला झालेली गर्दी पाहून, धक्का बसला का ? मग, चिक्की खा, थोडेसे पाणी घ्या. तेव्हा बरे वाटेल,''असा चिमटा मुंडे यांना चाकणकरांनी काढला.

त्यावरून मुंडे समर्थकांनी चाकणकर यांच्यावर वैयक्तिक आरोप केले. या प्रकरणी चाकणकर यांनी पुणे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची भेट घेतली. तसेच संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. याचे पडसाद राजकीय वर्तुळातही पडले. 

चाकणकर यांच्याविरोधातील आरोपांवर रूपाली पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित कार्यकर्त्याने केलेल्या टिकेला "फेसबुक'च्या माध्यमातून उत्तर देतानाच महिला कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही. पक्षांची भूमिका वेगळी असू शकतो, त्यातून आरोप-प्रत्यारोप होतात. मात्र, ते एका मर्यादेपर्यंत असावेत, अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली. मात्र, ज्या पध्दतीने चाकणकरांबद्दल लिहिले आहे, चुकीचे आणि निषेधार्थ आहे. "पोस्ट' न वगळल्यास "मनसे' स्टाइलने चोप मिळेल, अशा शब्दांत पाटील यांनी कार्यकर्त्याला बजाविले.

विशेष म्हणजे, एका आंदोलनादरम्यान चाकणकर आणि पाटील समोरासमोर आल्या होत्या. या दोघींच्या पक्षीय विचारधारा पूर्णपणे निराळ्या असल्याने त्यांच्यातही "सोशल मिडिया वॉर' रंगल्याचे दिसून आले. पण जेव्हा वैयक्तिक टीकेमुळे चाकणकर व्यथित झाल्या, तेव्हा, पाटील यांनी राजकीय मतभेद विसरून त्यांच्या मदतीसाठी पुढे आल्या. त्यांच्यातील या अराजकीय मैत्रीची चर्चा त्यामुळे सुरू झाली आहे.  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख