friendship of three IPS officers | Sarkarnama

तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे ये दोस्ती हम नहीं छोडेंगे... 

योगेश कुटे
शनिवार, 5 ऑगस्ट 2017

ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार हा जगभर मैत्री दिन म्हणून साजरा होतो. मित्र एकाच प्रोफेशनमध्ये असले की स्पर्धक बनतात, असा अनेकांचा अनुभव आहे. आयएएस आणि आयपीएस अशा सेवांमध्ये तर ही स्पर्धा टोकाची बनलेली असते. मात्र आयपीएस आणि बॅचमेट असूनही मैत्री जपणारे "थ्री इडियटस' आहेत. अशा तीन अधिकाऱ्यांच्या मैत्रीची ही कथा! 

कुठे मिटिंग असेल तरी एकत्र जायचे. मिटिंग सुरू होण्यापूर्वीही एकमेकांची थट्टा करायची. मुक्काम करायचा असेल तर हॉटेलमधील रूम शेजारीशेजारीच असतील, यासाठी लगबग करायची. पिक्‍चर पाहायलाही एकत्र जायचे आणि एकमेकांच्या सुखदुःखातही साथ द्यायची, हे मित्र म्हणून नातं असलेले सर्वच जण करतात. मात्र एकाच बॅचचे तीन आयपीएस ऑफिसर असे करतील, यावर प्रशासनातील कोणाचीही विश्‍वास बसणार नाही. एकाच बॅचचे अधिकारी एकमेकांच्या जिवावर उठलेले अनेक उदाहरणे महाराष्ट्रात आहे. पण एकमेकांना जीव देणारे 2005 च्या बॅचचे पोलिस अधिकारी डॉ. मनोजकुमार शर्मा, सुवेज हक आणि वीरेश प्रभू यांची मैत्री पोलिस दलात "मिसाल' बनून राहिली आहे. 

मनोजकुमार हे सध्या मुंबईच्या परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त आहेत. सुवेझ हक हे पुणे जिल्ह्याचे तर; प्रभू हे सोलापूरचे सध्या अधीक्षक आहेत. "गडचिरोली' हा त्यांच्यातील कॉमन फॅक्‍टर ! नक्षलग्रस्त भागात काम करायला बऱ्याच मंडळींचा नकार असतो. पण मिळेल ते पोस्टिंग घ्यायचे, हा तिघांनी पोलिस अकादमीतच निश्‍चय केलेला. त्यामुळे गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या ठिकाणी त्यांच्या नियुक्‍त्या झाल्या. तेथे एकमेकांकडून "चार्ज' घेण्याचीही वेळ बऱ्याचदा आली. हक यांनी गडचिरोलीत इतक्‍या योजना राबविल्या की त्यांचा पंतप्रधानांच्या हस्ते गौरव झाला. 

या मैत्रीतील दुसरा "कॉमन फॅक्‍टर' म्हणजे तिघेही एका व्यक्तिला "गुरू' मानतात. ते म्हणजे अतिरिक्त पोलिस महासंचालक व्ही. लक्ष्मीनारायण यांना. या तिघांचे हैदराबादच्या पोलिस अकादमीत त्यांचे प्रशिक्षण सुरू असताना नक्षलवादावर लक्ष्मीनारायण हे लेक्‍चरर म्हणून आले होते. लक्ष्मीनारायण यांचा प्रभाव तेव्हा या तिघांवर पडला. तो अजून कायम आहे. 

तिघेही सामान्य कुटुंबातून आलेले. शर्मा हे ग्वाल्हेरचे, हक हे बालाघाटचे तर प्रभू हे बेल्लारीचे. मसुरीत सुरवातीचे ट्रेनिंग सुरू असतानाच त्यांची मैत्री जमली. हक हे केमिकल इंजिनिअर, प्रभू आणि शर्मा हे कला शाखेचे विद्यार्थी. शर्मा यांनी नंतर पीएच.डीही मिळवली. मसुरीतील प्राथमिक प्रशिक्षण संपल्यानंतर हैदराबाद पोलिस अकादमीत त्यांचे ट्रेनिंग सुरू झाले. या कालावधीत ही मैत्री आणखी घट्ट झाली. आपल्या तिघांनाही महाराष्ट्राचे केडर मिळणार असल्याचे कळाल्यानंतर तर तिघांच्याही आनंदाला पारावर राहिला नाही. ट्रेनिंगमधील गमती आठवून तिघे आजही हसत असतात. अर्थात त्यासाठी तिघांचाच सेप्रेट "व्हॉटस ऍप' ग्रुप आहे. राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची एकत्रित मिटिंग असली तर मग तिघांनाही आनंदाच्या उकळ्या फुटतात. कारण त्या निमित्ताने मित्रांना भेटायची संधी मिळते. तिघेही स्ट्रिक्‍टली व्हेजिटेरियन! आपले पोट हे प्राण्यांना अखेरचा विसावा देण्यासाठीचे कब्रस्तान नाही, असा यामागचा विचार. चित्रपट पाहण्याचा तिघांनाही छंद. अर्थात चित्रपटात फारशी आवड-निवड नाही. 

मालेगाव येथील 2008 मधील बॉम्बस्फोटाच्या वेळी दंगल उसळली होती. वीरेश प्रभू हे तेव्हा तेथे अतिरिक्त अधीक्षक होते. त्यांच्यावर जिवघेणा हल्ला झाला होता. त्याच वेळी त्यांची पत्नी गरोदर होती. प्रभू यांची या दोघांनी त्यावेळी काळजी घेतली. प्रभू यांच्या बिकट शारीरिक परिस्थितीची माहिती त्यांच्या पत्नीला कळूही न देता, शर्मा व हक यांनी रुग्णालयात रात्र जागून काढल्या. पोलिस खाते म्हटले की ताणतणाव, समस्या आल्याच. मग हे तिघे एकमेकांचे सल्लागार बनतात. 

स्वतःच्या बदलीसाठी प्रयत्न करायचा नाही, कोणाचाही दबाव घ्यायचा नाही आणि भ्रष्टाचार करायचा नाही, ही या तिघांची पोलिस करिअरमधील त्रिसूत्री आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर इमानदारी आणि प्रामाणिकपणा हाच आमच्या मैत्रीचा पाया आहे. हक यांच्याकडे खासदाराचा मुलगा आला तरी त्याला इतरांसारखीच वागणूक. हक हे "प्रोफेशनल', प्रभू कारवाई करण्यात बेधडक तर शर्मा हे या तिघांत "अनॅलिटीकल स्किल' जास्त असलेले. 

""आमची कामाची पद्धत जवळपास एकच आहे. थोडाफार फरक असला तरी "टिम स्पिरीट' ठेवून काम करण्याकडे आमचा कल असतो. अकादमीत जे शिकून जे ठरवून बाहेर पडलो, त्यावर आम्ही आजही ठाम आहोत. त्यामुळे आमचे विचार आजही जुळतात. त्यामुळे आम्ही एकमेकांचे "फॅमिली फ्रेंड' झालो आहोत. आमच्या पत्नीही एकमेकांच्या मैत्रीणी झाल्या आहेत,' असे हक यांनी सांगितले. 

""इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात पोलिस खात्याची प्रतिमा चांगली आहे. कोल्हापूर असो की नागपूर येथे लोकांचेही सहकार्य मिळते. त्यामुळे चांगले काम करायला प्रोत्साहन मिळते. आपल्या कारकिर्दीत त्यामुळे येथे चांगले घडावे, असे शर्मा यांना वाटते. 
""सहकारी असो की कनिष्ट अधिकारी यांना योग्य मदत करण्याकडे आमचा कल असतो. मात्र कामात "नो नॉन्सेन्स' ऍटीट्यूड ठेवावाच लागतो. त्यामुळे कडक अशी प्रतिमा होते. पण त्याला काय करणार, असे प्रभूंचे मत बनते. 

विदर्भात हे तिघेही वेगवेगळ्या जिल्ह्यात काम करत असताना आमीर खानचा "थ्री इडियट' हा पिक्‍चर आला होता. या पिक्‍चरमध्ये तीन मित्रांची "स्टोरी' आहे. पोलिस दलातील या तिघांचीही "स्टोरी' त्या पिक्‍चरमधल्या मित्रांसारखीच आहे. "थ्री इडियट' म्हणून माध्यमांनी त्यांचा उल्लेख केला होता. "जहॉंपना तुस्सी ग्रेट हो.... तोहफा कबूल करो!' असेच हे तिघे एकमेकांना म्हणत असतील!  
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख