कणकवलीत युतीतच तगडा मुकाबला- शिवसेनेतर्फे सतीश सावंत रिंगणात; मैत्रीपूर्ण लढतीचे संकेत

राज्यात युती झाली असतानाही कणकवली मतदारसंघात शिवसेनेने सतीश सावंत यांना निवडणूक रिंगणात उतरवून आमदार नीतेश राणे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. सावंत आणि राणे यांच्याकडे तळागाळातील मतदारापर्यंत पोचणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद असल्याने या द्वयींमध्ये महामुकाबला रंगणार आहे. याखेरीज भाजप आणि शिवसेना या पक्षांचीही ताकद पणाला लागणार आहे.
Satish Sawant - Nithesh Rane
Satish Sawant - Nithesh Rane

कणकवली : राज्यात युती झाली असतानाही कणकवली मतदारसंघात शिवसेनेने सतीश सावंत यांना निवडणूक रिंगणात उतरवून आमदार नीतेश राणे यांच्यापुढे आव्हान निर्माण केले आहे. सावंत आणि राणे यांच्याकडे तळागाळातील मतदारापर्यंत पोचणाऱ्या कार्यकर्त्यांची ताकद असल्याने या द्वयींमध्ये महामुकाबला रंगणार आहे. याखेरीज भाजप आणि शिवसेना या पक्षांचीही ताकद पणाला लागणार आहे.

सावंत हे तीस वर्षे राजकारणातील मुरब्बी व्यक्तिमत्त्व आहेत. जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष असलेल्या श्री. सावंत यांनी सहकाराच्या माध्यमातून मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडीतील कार्यकर्ता जोडला आहे. कणकवली आणि वैभववाडी तालुक्‍यात तर सावंत यांना मानणारा आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहणारा मोठा परिवार आहे. हा सर्व मतदार सावंतांच्या पाठीशी भक्‍कमपणे उभा राहिला, तर राणेंशी होणारा त्यांचा मुकाबला चुरशीचा असणार आहे.

माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्यावर जिवापाड प्रेम करणारा कार्यकर्ता देखील कणकवली मतदारसंघातील प्रत्येक गाव आणि वाडीवाडीत आहे. हा कार्यकर्ता राणेंप्रमाणेच त्यांचे सुपुत्र आमदार नीतेश राणेंच्या पाठीशी राहिला, तर राणेंना कणकवली मतदारसंघ राखणे कठीण जाणार नाही. कार्यकर्त्यांची ताकद पाहता राणे-सावंत या दोहोंनाही कणकवली मतदारसंघात समसमान संधी सद्यःस्थितीत आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राणेंच्या कार्यकर्त्यांकडून अनेक डाव-प्रतिडाव आखले जातात. विविध फंडे वापरले जातात. राजकारणातील अशी दिग्गज मंडळी राणे आणि सावंत या दोहोंकडे असल्याने कणकवली मतदारसंघात राजकीय डाव-प्रतिडाव मतदारांना पाहता येणार आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये पक्षप्रवेश सोहळे देखील रंगणार आहेत.

भाजप पक्षाने 2024 मध्ये शत-प्रतिशत भाजपचा नारा दिला आहे. शिवसेनेनेही भाजपला धोबीपछाड देण्यासाठी तथा जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या विजयासाठी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर तसेच आमदार वैभव नाईक यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. श्री. सावंत यांना शिवसेनेत आणून त्यांना पक्षाचा एबी फॉर्म देण्यामध्येही या त्रयींनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता कोणत्याही परिस्थितीत कणकवलीची जागा जिंकायचीच यासाठी शिवसेनेच्या या नेतेमंडळींकडून रणनीती आखली जात आहे.

कणकवलीचा कौल कोणाला मिळणार?
कणकवली मतदारसंघातील लढतीमध्ये वैभववाडी आणि देवगड तालुक्‍यात राणे आणि सावंत यांना समान संधी आहे. त्यामुळे कणकवली तालुक्‍यात मताधिक्‍य कुणाला मिळते यावर विजयाची गणिते ठरणार आहेत.

अवघ्या काही तासात मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतात हीच आपली ताकद आहे. निवडणूक निकालादिवशी ही कार्यकर्त्यांची ताकद दिसून येईल. तसेच शिवसैनिकांचा भक्‍कम पाठिंबा असल्याने कणकवली मतदारसंघात आमचा विजय निश्‍चित आहे.''
- सतीश सावंत, उमेदवार शिवसेना

आम्ही युतीचा धर्म पाळायला तयार आहोत. बोलावणे आले तर शिवसेना उमेदवाराचा प्रचार करण्याचीही तयारी आम्ही ठेवलीय. कणकवलीत शिवसेनेने उमेदवार उभा केला आहे. शिवसेनेने या मतदारसंघातून माघार न घेतल्यास राज्यातील युतीला सुरूंग लागेल. सिंधुदुर्गात भाजपच्या वाट्याला एक मतदारसंघ आहे, तर शिवसेनेकडे दोन मतदारसंघ आहेत, हे देखील त्यांनी लक्षात घ्यायला हवे.
- नारायण राणे, खासदार भाजप

नारायण राणे हे एनडीएचे घटक पक्ष होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत त्यांनी उमेदवार उभा करणे चुकीचे होते. त्यावेळी भाजपनेही त्यांना समज दिली नाही. त्यामुळे कणकवली मतदारसंघात आम्ही उमेदवार दिला त्यात गैर काहीच नाही. तसेच राणे उमेदवार असल्याने कणकवली मतदारसंघात युतीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही.''
- विनायक राऊत, सचिव, शिवसेना

सावंतवाडी, कुडाळ मतदारसंघात राणेंची सद्दी संपवली आणि कणकवली मतदारसंघात राणेंच्या दहशतीचे उच्चाटन करणार आहोत. सतीश सावंत यांना शिवसेना पक्षाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता राणेंना खऱ्या अर्थाने शिवसेनेची ताकद दाखवून देणार आहोत.''
- अरुण दुधवडकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना

कणकवली मतदारसंघात शिवसेनेने अधिकृत उमेदवार उभा केला आहे; मात्र राज्याप्रमाणे कणकवलीतही युतीचा धर्म पाळला जाईल, असा मला विश्‍वास आहे. शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांमधील गैरसमज आम्ही दूर करू. सतीश सावंत यांचा उमेदवारी अर्जदेखील मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून चर्चा होईल आणि शिवसैनिकदेखील युतीचे काम करतील.''
- प्रसाद लाड, राज्य उपाध्यक्ष, भाजप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com