पावणे दोन कोटी चा शासकीय निधीचा अपहार; ग्रामविस्तार अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

बिरू देविदास नेमाणे हे अजनूप ग्रामपंचायतीमध्ये फेब्रुवारी 2014 ते मे 2017 कार्यरत असताना त्यांनी शासकीय निधीचा अपहार केला म्हणून पंचायत समितीच्या सभापती शोभाताई मेंगाळ व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती
fraud in Thane by Rural Development Officer
fraud in Thane by Rural Development Officer

शहापूर  : ग्रामपंचायतीच्या विविध योजने अंतर्गत 2014 ते 2017 या तीन वर्षात शासकीय पदाचा गैरवापर करून शासकीय निधीचा तब्बल पावणे दोन कोटी रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी शहापूर तालुक्‍यातील अजनूप ग्रामपंचायतीचे ग्राम विस्तार अधिकारी बी. डी. नेमाणे यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे शासकीय निधीतून एका ज्वेलर्सच्या दुकानातून सोने खरेदी केल्याचेही आढळून आले आहे. याबाबत शहापूर पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी रेखा बनसोडे यांनी ग्रामविस्तार अधिकारी बी. डी. नेमाणे यांनी एक कोटी 70लाख 86 हजार 784 रुपये शासकीय निधीचा अपहार केल्याबाबत मंगळवारी सायंकाळी शहापूर पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. 

बिरू देविदास नेमाणे हे अजनूप ग्रामपंचायतीमध्ये फेब्रुवारी 2014 ते मे 2017 कार्यरत असताना त्यांनी शासकीय निधीचा अपहार केला म्हणून पंचायत समितीच्या सभापती शोभाताई मेंगाळ व ग्रामपंचायत सदस्य प्रदीप चव्हाण यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत पाटील, विस्तार अधिकारी सुधाकर सोनावणे व रेखा बनसोडे यांनी 2 फेब्रुवारी 2018 या दिवशी ग्रामपंचायतीच्या दफ्तरांची तपासणी व बॅंक विवरण पत्रांची पडताळणी केली होती त्यानंतर तब्बल एक वर्षाने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीला मिळणाऱ्या 14 वित्त आयोग व ग्रामसभा कोष समितीचे पाच टक्के अबंध निधी अंतर्गत बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखा शहापूर येथून एकूण 48 वेळा विविध रक्‍मेद्वारे 66 लाख 84 हजार 850 काढण्यात आले असून यापैकी 27लाख 66 हजार 500 रुपये खर्च केल्याचे आढळून आले आहे. बी. डी. नेमाणे यांची भिवंडी येथे बदली झाल्यानंतरही जून 2017 या महिन्यात एक लाख 87 हजार व जुलै 2017 या महिन्यात दोन लाख 50 हजार असे एकूण चार लाख 37 हजार रुपये तसेच कॅनरा बॅंक खात्यातून तीन लाख 85 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. नेमाणे यांनी अबंध निधीचे ग्रामसभा कोष समितीचे 23 लाख 37 हजार रुपये बॅंकेतून काही रक्कम स्वतः व काही रक्कम कंपनीच्या नावे काढण्यात आलेली असल्याचे आढळून आले आहे. 

विशेष म्हणजे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता अबंध निधीचे ग्रामसभा कोष समितीचे शहापुरातील कॅनरा बॅंकेत खाते उघडून काही लोकांच्या नावाने तर काही कंपन्याच्या नावाने 15 लाख 81 हजार 350 रुपयांचा व्यवहार केला दिसत असला तरी याबाबत ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंदवही, कामांचे मुल्यांकन, अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका असे काहीही आढळून आलेले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. स्वच्छ भारत मिशनच्या बॅंक पासबुकातून मुथा ज्वेलर्स च्या नावे 60 हजाराचा धनादेश काढण्यात आलेला असल्याने शासकीय अनुदानाचा वापर सोने खरेदी केले असल्याचे दिसून आले आहे असे तक्रारीत म्हटले आहे.

जन सुविधेअंतर्गत दापूर व कोळीपाडा येथे प्रत्येकी तीन लाख 90 हजार 973 रुपये असे एकूण सात लाख 81 हजार 946 रुपये नवीन स्मशान भूमी बांधण्याकरिता ग्रामपंचायत खात्यात जमा करण्यात आले असून प्रत्यक्षात स्मशान भूमीचे काम सुरु नसल्याचे आढळून आले आहे. दरम्यान, याबाबत ग्रामविस्तार अधिकारी बी. डी. नेमाणे यांना निधीच्या अपहाराबाबत नोटीस देऊन लेखी खुलासा मागविला असता याप्रकरणी नेमाणे यांनी कोणताही खुलासा दिला नसल्याने त्यांच्या विरुद्ध शहापूर पोलीस ठाण्यात रेखा बनसोडे यांनी अपहाराबाबत गुन्हा दाखल केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com