पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांतील लक्ष्मीदर्शन उजेडात, चार दलाल गजाआड. 

mantralya
mantralya

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने बड्या पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे रॅकेट चालविणाऱ्या चौघा जणांना विलेपार्ले येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये बुधवारी रात्री अटक केली.

पोलिसांनी या चौघांकडून सहा लाख सत्तर हजार रुपये जप्त केले आहेत. अटक झालेल्या आरोपींनी पोलिस कोठडीत तोंड उघडले तर मंत्रालयातील अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांचा पर्दाफाश होण्याची शक्‍यता आहे. 

  
आयपीएस आणि पोलीस उपअधिक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या या रॅकेटमध्ये पकडल्या गेलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 6 लाख 70 हजार रुपयांची रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून दहा कोटी रुपयांचे धनादेश देखील जप्त केले आहेत . याशिवाय मंत्रालयातील विविध डेस्क ऑफिसर्सचे रबरी शिकके  आणि इतर आक्षेपार्ह साहित्यदेखील ताब्यात घेतले आहे . 


 तसेच मंत्रालयातील कुलुपबंद कपाटात असायला हवीत अशी काही कागदपत्रे या दलालांकडून पोलिसांनी जप्त केली आहेत. चौकशीत या दलालांची कोट्यावधी रुपयांची माया समोर येण्याची शक्‍यता आहे. 


हे प्रकरण पोलीस खात्याशी संबंधित असल्याने तपास करणारे पोलीस अधिकारी सविस्तर माहिती देण्यास कचरत आहेत. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली तर गेल्या सात-आठ वर्षांपासून सुरू असलेला गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्‍यता आहे. 


मुंबई शहरात आणि राज्यात चांगल्या पोस्टींगसाठी वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दलालांमार्फत मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांशी "अर्थपूर्ण' संवाद साधावा लागतो अशा चर्चा अनेकदा होतात. सोलापूर येथील पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण यांना मुंबईमध्ये क्रीम पोस्टिंग हवी असेल तर येऊन भेटण्याचा निरोप काही दलालांमार्फत मिळाला. नामेदव चव्हाण यांनी या दलालांना धडा शिकवायचा निर्धार केला. त्यांनी गुन्हे अन्वेषण विभागाच्या मदतीने सापळा रचला.

 त्यानुसार बुधवारी रात्री विलेपार्ले येथील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये भेट ठरली होती. या भेटीच्या वेळी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनीट आठच्या पोलीस अधिकाऱ्यांनी छापा टाकला. या छाप्यात बदल्यांचे रॅकेट चालविणाऱ्या टोळीतील चार जणांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्यामध्ये विद्यासागर हिरमुखे हा महानंदा डेअरीमध्ये मॅनेजर आहे.

 किशोर माळी हा या रॅकेटचा सुत्रधार असल्याचे समोर येत आहे. किशोर माळीचे मंत्रालयातील अनेक अधिकाऱ्यांशी सलगीचे संबंध आहेत. तसेच दिल्लीतील वरीष्ठ अधिकाऱ्यांशी त्याची जानपहेचान असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. किशोर माळी गेल्या पाच-सात वर्षापासून बदल्या प्रकरणात सक्रीय असल्याचे समजते. मुंबई शहरात आणि अन्यत्र चांगल्या पोस्टींगसाठी किमान दहा लाख रुपये ते पंचवीस लाख रुपयांची रक्कम किशोर माळी घेत असे, असे समजते. हिरमुखे आणि माळीसोबत विशाल ओंबळे आणि रविंद्र यादव यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने चारही आरोपींना सात जुन पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com