गावाकडे पायी जाणे जीवावर बेतले : टेम्पोने सात जणांना उडवले; चौघांचा मृत्यू; 3 गंभीर

लाॅक डाऊन झाल्यानंतर हजारो लोक पायी आपल्या गावी चालले आहेत. त्यातही मुंबईतून लोक परत फिरले आहेत.
corona pune
corona pune

नालासोपारा (बातमीदार) : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडल्याने हजारो कामगार आपल्या गावाकडे पायी निघाले आहेत. वसई, ठाणे, नालासोपारा परिसरातून राजस्थानकडे पायी निघालेल्या कामगारांना पोलिस प्रशासन नाकाबंदी करून परत पाठवत आहे.

त्यानुसार मुंबईकडे पुन्हा परतत असलेल्या कामगारांना भरधाव टेम्पोने उडवल्याची घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी पहाटे तीन वाजता घडली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तिघे जण गंभीर जखमी आहेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

देशात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (ता. 24) संपूर्ण देश लॉकडाऊन करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे देशभरातील सर्व वाहतूक व्यवस्थाही बंद करण्यात आली. लॉकडाऊनमुळे मुंबईसह अनेक शहरांत परराज्यांतून आलेले असंख्य कामगार अडकून पडले आहेत. एप्रिलपर्यंत शहरात काय करायचे, या चिंतेतून हजारो कामगार पायपीट करत आपल्या गावाकडे निघाले आहेत.

गावाकडे पायी जाणाऱ्यांना पोलिस प्रशासन खाणीवडे टोलनाका, मनोर येथे अडवून पुन्हा परत पाठवत आहे. त्याचप्रकारे राजस्थानच्या दिशेने पायपीट करणाऱ्या काही कामगारांना नाकाबंदीत अडवून पुन्हा मुंबईच्या दिशेने परत पाठवले जात आहे. त्यानुसार मुंबईच्या दिशेने परत निघालेल्या सात कामगारांना टेम्पोने उडवल्याची घटना मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे तीन वाजता घडली. या अपघात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य जखमींना विरार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रमेश भट (वय 55), निखिल पंड्या (वय 32), नरेश कलासुवा (वय 18), कालुराम भगोरा (वय 18) अशी मृतांची नावे असून चारही जण मूळचे राजस्थानचे रहिवासी आहेत; तर मयंककुमार भट्ट (वय 32), कल्पेश जोशी (वय 34) अशी जखमींची नावे असून अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या अन्य एका जखमीची ओळख अद्यापही पटली नाही.

घटनेची माहिती मिळताच मांडवी परिक्षेत्राचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक रंजितसिंग परदेशी आणि पथकाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर टेम्पोचालक फरारी झाला असून विरार पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com