दिल्लीच्या 'निर्भया'ला अखेर न्याय; चारही नराधमांना फासावर लटकावलं

संपूर्ण देशच हादरवून टाकणाऱ्या दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणात चारही नराधमांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात आज पहाटे ५.३० वाजता फाशी देण्यात आले. या चौघांनीही आपली फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या साऱ्या क्लुप्त्या वापरल्या. पण अखेर त्यांना फासावर लटकवून 'निर्भया'ला उशीरा का होईना न्याय देण्यात आला
Four in Nirbhaya Case Hanged in Tihar Jail
Four in Nirbhaya Case Hanged in Tihar Jail

नवी दिल्ली : संपूर्ण देशच हादरवून टाकणाऱ्या दिल्लीच्या 'निर्भया' प्रकरणात चारही नराधमांना दिल्लीच्या तिहार तुरुंगात आज  पहाटे फाशी देण्यात आले. या चौघांनीही आपली फाशी टाळण्यासाठी कायद्याच्या साऱ्या क्लुप्त्या वापरल्या. पण अखेर त्यांना फासावर लटकवून 'निर्भया'ला उशीरा का होईना न्याय देण्यात आला. 

या बाबत आज पहाटे साडेचार वाजेपर्यंत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. यातील एक आरोपी पवन कुमार याच्या वकिलांनी रात्री दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. पण उच्च न्यायालयाने राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळण्याच्या निर्णयाला दिलेले आव्हान फेटाळून लावले. त्यानंतर पवन कुमारचे वकिल ए. पी. सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. पहाटे सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. फाशी देण्याच्या वेळेच्या एक तासभर आधी म्हणजे साडेचार वाजता सर्वोच्च न्यायालयाने पवन कुमारची याचिका फेटाळली. अखेर पहाटे साडेपाच वाजता चारही नराधमांना फासावर लटकवण्यात आलं. तिहारचे महासंचालक संदीप गोएल यांनी ही माहिती जाहीर केली. 

दिल्लीतल्या मुनारिकाजवळ १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री 9 वाजता चालत्या बसमध्ये एका बावीस वर्षांच्या तरुणीवर सामूहिक बलात्काराची करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही घटना चर्चेचा विषय ठरली. या हल्ल्यात ती दुर्दैवी तरुणी पुढे मृत्युमुखी पडली. तिला 'निर्भया' या टोपणनांवाने ओळखले जाऊ लागले. 

पॅरामेडिकलची विद्यार्थिनी ही निर्भया आणि तिचा इंजिनिअर मित्र दिल्लीतल्या साकेतमधील मॉलमध्ये 'लाईफ ऑफ पाय' सिनेमा पाहून परतत होते. ते थंडीचे दिवस होते आणि अंधार लवकर पडला होता. दिल्लीतल्या द्वारका या भागात या दोघांना जायचे होते.  ते द्वारकाला जाणाऱ्या एका बसमध्ये मुनारिकाहून चढले. तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते.

बसचा प्रवास सुरू झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयासोबत छेडछाड करायला सुरूवात केली. त्यांना रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिच्या मित्राला आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्यात तो बेशुद्ध पडला. त्यानंतर सहा जणांनी चालत्या बसमध्येच तिच्यावर बलात्कार केला. तिला अमानुष मारहाण केली. त्यातल्या एकाने लोखंडी राॅड तिच्या गुप्तांगात घुसवला. तिची आतडीही खेचून काढण्यात आली. त्यानंतर निर्भया व तिच्या मित्राचे कपडे काढून सहाही आरोपींनी या गोघांना वसंत विहार भागात चालत्या बसमधून फेकून दिले. 

पोलिसांनी या प्रकरणात राम सिंह या बसचालकासह मुकेश सिंह, विनय शर्मा, पवन गुप्ता, अक्षय ठाकूर व एका अल्पवयीन मुलाला अटक केली. यापैकी राम सिंहने ११ मार्च २०१३ रोजी दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. उर्वरित चार आरोपींना फास्ट ट्रॅक कोर्टाने १३ सप्टेंबर, २०१३ रोजी फाशीची शिक्षा सुनावली. १३ मार्च २०१४ रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने  तर ५ मे २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर राष्ट्रपतींनीही या चारही आरोपींचा दयेचा अर्ज फेटाळून लावला. अखेर आज चौघांनाही फासावर लटकवण्यात आले. 

या आरोपींनी फाशी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरु ठेवले होते. काल सायंकाळी उशीराही आरोपी पवनच्या वकिलांनी दिल्लीच्या पतियाळा कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, ती फेटाळून लावण्यात आली. त्या आधी सर्वोच्च न्यायालयानेही त्याची क्युरेटिव्ह याचिका फेटाळून लावली होती. तरीही आज पहाटेपर्यंत आरोपी पवन कुमारचे वकिल न्यायालयाचे दरवाजे ठोठावत होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com