Founder of Jai Bheem Slogan Babu Hardas N L
Founder of Jai Bheem Slogan Babu Hardas N L

कोण होते 'जयभीम'चे जनक? का आहेत अजूनही उपेक्षित?

क्रांतीची पेरणी करणारा जयभीम हा शब्द देणारे हरदास लक्ष्मणराव नगराळे ऊर्फ बाबू हरदास एल. एन. यांचा जन्म सहा जानेवारी १९०४ रोजी नागपुरातील कामठी येथे झाला. जयभीम ही आंबेडकरी समाजाची कवच कुंडले आहेत. एकमेकांना अभिवादन करण्यासाठी 'जयभीम' हा क्रांतिकारक शब्द देणारे बाबू हरदास एल. एन. मात्र अजूनही उपेक्षित आहेत

नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मक्रांतीचा सोहळा असो की, चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांच्या उपस्थितीतील महापरिनिर्वाणदिन... किंवा दोन आंबेडकरी माणसांच्या भेटीचा क्षण... सर्व ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या मुखातून एकच आवाज निनादला जातो तो म्हणजे 'जयभीम'... जयभीम ही आंबेडकरी समाजाची कवच कुंडले आहेत. एकमेकांना अभिवादन करण्यासाठी 'जयभीम' हा क्रांतिकारक शब्द देणारे बाबू हरदास एल. एन. मात्र अजूनही उपेक्षित आहेत.

आंबेडकरी समाजातील राजकारणात गटा-तटात विभागलेले नव्हे तर भरकटलेले रिपब्लिकन नेते असोत की, कॉंग्रेस, भाजप, डाव्या पक्षात स्थिरावलेले नेते असोत. त्यांच्या मुखातूनही 'जयभीम' हाच क्रांतीनाद बाहेर येतो. हिंदू धर्मातून बाहेर पडल्यानंतर बौद्ध धम्माची स्वतंत्र वाटचाल अंगिकारल्यानंतर बौद्धांना नवी ओळख प्राप्त व्हावी, यासाठी जयभीम हा शब्द मोठ्या आदरभावाने संबोधला जातो.

क्रांतीची पेरणी करणारा जयभीम हा शब्द देणारे हरदास लक्ष्मणराव नगराळे ऊर्फ बाबू हरदास एल. एन. यांचा जन्म सहा जानेवारी १९०४  रोजी नागपुरातील कामठी येथे झाला. वडील लक्ष्मणराव नगराळे रेल्वे खात्यात होते. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण नागपुरातील पटवर्धन हायस्कूलमध्ये झाले. संस्कृतवरही त्यांचा प्रभाव होता. अवघ्या १७ व्या वर्षी 'महारठ्ठ' नावाचे साप्ताहिक सुरू करून त्यांनी सामाजिक चळवळीत भाग घेतला. कामठी येथे रात्र शाळा चालवली.

१९२८ साली हरदास आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली भेट झाली. बाबासाहेब दुसऱ्या गोलमेज परिषदेत गेल्यानंतर अस्पृश्‍यांचा नेता कोण, असा सवाल पुढे आल्यानंतर बाबू हरदास एल. एन. यांनी रॅमसे मॅक्‍डोनाल्ड यांना भारतातून ३२ तारा पाठवून देशात अस्पृश्‍यांचे नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर हेच आहेत, असे सुचविले. त्यांनी मॅकडोनाल्ड यांच्याशी जवळपास ३२ वेळा पत्रव्यवहार केला होता.

'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्‍लासेस फेडरेशन'च्या पदावर सचिव आणि अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. १९२४ साली त्यांनी 'मंडल महात्मे' हा ग्रंथ लिहिला. 'वीर बालक' नावाचे नाटकही लिहिले. बाबासाहेबांच्या 'जनता' वृत्तपत्रातही त्यांनी लेखन केले. १९३७  साली नागपूर-कामठी या मतदारसंघातून ते निवडून आले होते. बाबू हरदास यांचे १२ जानेवारी १९४० साली अवघ्या 35 व्या वर्षी निधन झाले.

इतिहास प्रेरणादायी

आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत म्हणून हरदास एल. एन. यांचे नाव इतिहासात कोरले आहे. निष्ठावंत कार्यकर्ते घडविण्यासाठी यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. मात्र, या कामठीत त्यांचे प्रेरणादायी स्मारक नाही. ८० वर्षांपासून कामठीत हरदास मेळा भरतो; परंतु रिपब्लिकन नेत्यांना 'जयभीम'चे जनक बाबू हरदास यांच्या समाधीस्थळाला अभिवादन करावेसे वाटत नाही. समाजही त्यांच्याबाबतीत अज्ञानी असल्याने बाबू हरदास अद्यापही दुर्लक्षितच राहिले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घ्यावा आणि स्मारक उभारावे - भन्ते नागदीपंकर थेरो, मुख्य मार्गदर्शक, हरदास मेळा

(छायाचित्र सौजन्य- विकिपिडीया)
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com