Forget Govt Jobs. Increase your ability and go to pvt Sector- CM | Sarkarnama

सरकारी नोकऱ्यांचे खूळ डोक्यातून काढून टाका

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 28 मार्च 2017

परिवर्तन हा नियम असून, यात सामील न होणारा संपल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्षमतेने काम केल्यास जीवनात स्थैर्य येईल. आज देशात तरुणाईची कमतरता नाही; परंतु त्यांना कौशल्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे.- फडणवीस

नागपूर - "निव्वळ सुरक्षित जीवनासाठी सरकारी नोकरीचे खूळ डोक्‍यातून काढून टाका. गुणवत्ता असेल तर खासगी कंपन्या तुम्ही मागाल तेवढे वेतन देण्यासाठी तयार आहे. गुणवत्ता असलेला तरुण खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांचा राजा आहे,'' असे नमूद करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज तरुणाईला कौशल्य विकासावर भर देण्याचा कानमंत्र दिला. पदवी महत्त्वाची आहे; परंतु कौशल्यही आवश्‍यक असल्याची पुष्टी त्यांनी जोडली.

फॉर्च्युन फाउंडेशन, इंजिनिअरिंग कॉलेजेस प्लेसमेंट असोसिएशन व महापालिकेतर्फे आयोजित "युथ एम्पॉवरमेंट समिट'मध्ये ते बोलत होते. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्योग, नोकरीत यशस्वी झालेल्या युवकांचा गौरव करण्यात आला. यानंतर तरुणाईला मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी "डर के आगे जित है' असे सांगून स्वतःतील अभिजात गुणांना आणखी चांगले करून उत्तम व्हा, असे आवाहन केले. ते म्हणाले, "परिवर्तन हा नियम असून, यात सामील न होणारा संपल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण क्षमतेने काम केल्यास जीवनात स्थैर्य येईल. आज देशात तरुणाईची कमतरता नाही; परंतु त्यांना कौशल्य उपलब्ध करून देण्याची गरज आहे." ठेविले अनंत तैसेची राहावे' ही मानसिकता बदलून रोजगाराकडे जाण्याची मानसिकता तयार करा, असे आवाहनही त्यांनी केले.

कार्यक्रमाला व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार डॉ. मिलिंद माने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मिहानमधील कंपन्या परतणार - पालकमंत्री
मागील सरकारने मिहानमधील कंपन्यांना अवाजवी वीज दर आकारल्याने त्या येथून गेल्या. आता मिहानमधील कंपन्यांना 14.40 रुपये प्रतियुनिटऐवजी केवळ 4.40 रुपये दराने वीज दिली जाणार आहे. त्यामुळे येथे 49 कंपन्या परतणार आहेत. परिणामी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी मिहानमध्ये 50 हजार रोजगाराचे पाहिलेले स्वप्न पूर्ण होणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या वेळी सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख