Foreigners arrested 24 people after treatment | Sarkarnama

उपचारानंतर लगेचच ठोकल्या बेड्या, त्या  24 परदेशी पाहुण्यांचा असाही `पाहुणचार`

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 18 एप्रिल 2020

`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर जामखेड, मुकुंदनगर, नेवासे येथून ताब्यात घेतलेल्या त्या परदेशी नागरिकांना आता उपचारानंतर अटक करण्यात आली आहे.

नगर : `कोरोना`च्या पार्श्वभूमीवर नेवासे, नगर, जामखेड येथील प्रार्थनास्थळांमध्ये लपून बसलेल्या 29 जणांना पोलिसांनी बाहेर काढून त्यांना आरोग्य विभागाच्या ताब्यात दिले. योग्य उपचार होऊन त्यांचा हा `पाहुणचार` संपल्यानंतर पोलिसांनी सर्वांना अटक करून दुसरा `पाहुणचार` सुरू केला आहे. मकरज कार्यक्रमात सहभागी झालेल्या 24 परदेशी नागरिकांसह पाच भारतीय नागरिकांना अटकेनंतर आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

`कोरोना`च्या पार्श्वभूमीवर लाॅक डाऊन असल्याने सर्वत्र जिल्हा बंदी होती. कोणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नव्हती. सर्व धार्मिकस्थळांना टाळे लावण्यात आले होते. संचारबंदी असल्याने जमावाने जमू नये, रस्त्यावर फिरू नये, बाहेरगावहून आलेल्याची माहिती पोलिसांना द्यावी, परदेशी नागरिकांची माहिती तातडीने कळवावी, अशा सर्व नियमांची पायमल्ली करीत काही परदेशी नागरिक जामखेड, मुकुंदनगर, नेवासे येथील प्रार्थनास्थळात लपून बसले होते. हे सर्व दिल्ली येथील मकरज या कार्यक्रमातून आले होते. तेथील कार्यक्रमातील अनेक लोक कोरोनाबाधित असल्याचे सिद्ध झाल्याने नगर जिल्ह्यात आलेल्या या लोकांविषयी नागरिकांच्या मनात भिती होती. त्यांना तेथील स्थानिक नागरिकांनी जेवणाची व राहण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे साहजिकच होते, मात्र त्यातील कोणी कोरोनाग्रस्त आहेत का, हे तपासणे आवश्यक असल्याने त्या वेळी प्रशासनाने त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यातील काही कोरोनाग्रस्त निघाले, तर काहींचे अहवाल निगेटिव्ह आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर ठराविक काळ उपचार करण्यात आले. त्यांच्या वारंवार स्त्राव तपासण्या आता निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे सोडण्याची वेळ आली असतानाच पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करून त्यांना काल अटक केली. गेले पंधरा दिवस आरोग्य विभागाने त्यांचा चोख आरोग्य सेवा देवून `पाहुणचार` केला. आता पोलिस खात्याचा `पाहुणचार` ते घेत आहेत. दरम्यान, आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

त्यांच्यामुळे हा परिसर हाॅट स्पाॅट
दरम्यान, या लपून बसलेल्या परदेशी नागरिकांमुळे जामखेड, नेवासे, मुकुंदनगर, संगमनेर या गावांमधील संबंधित परिसर हाॅट स्पाॅट जाहीर झाला आहे. कोरोनाचे रुग्ण आढल्याने तेथे अतिदक्षता घेण्यात येत आहे. त्याचाच परिणाम तेथील स्थानिक नागरिकांना भोगावा लागत आहे. थोड्या वेळासाठीही त्यांना रस्त्यावर येण्यास परवानगी नाही. जीवनावश्यक वस्तू त्यांना थेट प्रशासन पुरवित आहे. संबंधित नागरिकांमुळे नगरची कोरोनाग्रस्तांची संख्याही वाढल्याने लाॅक डाऊन काळात नगरला अजूनही पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात येत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख