Five police constables suspened for giving Iqbal Kaskar VIP treatment | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

दाऊदच्या भावाची ठेवली बडदास्त ,पाच पोलिस निलंबित

सरकारनामा
शनिवार, 27 ऑक्टोबर 2018

कासकर हा रुग्णालयाच्या आवारात काळ्या रंगाच्या काचा असलेल्या मोटारीमध्ये हातात सिगारेट शिलगावून फोनाफोनी करीत होता. तसेच मित्रांसह अनेकांच्या भेटीगाठी घेताना नागरिकांच्या दृष्टीस पडल्याने ठाण्यात एकच चर्चा रंगली आहे.

ठाणे  : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिमचा भाऊ इक्‍बाल कासकर याला ठाणे पोलिसांनी उपचाराच्या नावाखाली व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचे उघडकीस आले आहे.

पोलिसांनी कर्तव्यात कसूर केल्यामुळे कासकर हा रुग्णालयाच्या आवारात आलिशान मोटारीमध्ये बसून अनेकांशी तब्बल सहा तास गुफ्तगू करत होता. याची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कैदी पार्टीतील उपनिरीक्षक व चार पोलिसांना तडकाफडकी निलंबित केले.

ठाणे तुरुंगात बंदिस्त असलेला कासकर याला गुरुवारी सिव्हील रुग्णालयात आणण्यात आले होते. या दरम्यान त्याला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट मिळाल्याचे उघडकीस आले आहे.

न्यायालय आणि तुरुंग प्रशासनाने कासकरला दातांची तपासणी आणि उपचारासाठी मुभा दिली होती. त्याच्यावरील उपचार अवघ्या 20 मिनिटांत उरकले; मात्र त्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत कासकर हा सिव्हील रुग्णालयाच्या आवारात बिनधास्त वावरत होता. 

त्याच्यावर करडी नजर ठेवण्यासाठी तैनात असलेले पोलिस नागरिकांवरच डाफरत होते. किंबहुना त्यांनी अनेकांना मोबाईलवर चित्रीकरण करण्यापासून रोखल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली.

कासकर हा रुग्णालयाच्या आवारात काळ्या रंगाच्या काचा असलेल्या मोटारीमध्ये हातात सिगारेट शिलगावून फोनाफोनी करीत होता. तसेच मित्रांसह अनेकांच्या भेटीगाठी घेताना नागरिकांच्या दृष्टीस पडल्याने ठाण्यात एकच चर्चा रंगली आहे.

या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक रोहिदास पवार, पोलिस नाईक पुंडलिक काकडे यांच्यासह विजय हालोर, कुमार पुजारी, सूरज मनवर यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाच्या अहवालात कैदी पार्टीतील पोलिसांनी संगनमत करून न्यायालयाचे आदेश डावलले. तसेच कासकरच्या वकिलाकडून पैसे घेऊन त्याला मोबाईलवर संभाषण, जेवण तसेच सिगारेट ओढण्यास आणि मित्रांच्या भेटीगाठी घेण्यास सवलत दिल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख