तब्बल पाच महिन्यांनंतर अशोक पवार, बाबूराव पाचर्णे एकाच मंचावर 

शिरूरच्या राजकीय पटलावरील एकमेकांचे राजकीय हाडवैरी समजल्या जाणाऱ्या पवार वपाचर्णे यांच्यातील जुगलबंदी आणि आरोप - प्रत्यारोपांतून रंगणारा राजकीय संघर्ष अनुभवण्यासाठी आलेल्यांचा अपेक्षाभंग झाला.
ashok-pawar-baburao-pacharn
ashok-pawar-baburao-pacharn

शिरूर : विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या जय-पराजयाच्या खपल्या काढताना एकमेकांवर खरमरीत भाषेत आगपाखड करणाऱ्या ऍड. अशोक पवार व बाबूराव पाचर्णे या आजी - माजी आमदारांनी न्हावरे (ता. शिरूर) येथे काल झालेल्या कार्यक्रमात मात्र "तुझ्या गळा - माझ्या गळा' चा सूर आळवला. 

आमदार निधी तसेच जिल्हा परिषद निधीतील विविध विकास कामांच्या उद्‌घाटन व भूमीपुजन कार्यक्रमाच्या निमीत्ताने ऍड. पवार व बाबूराव पाचर्णे हे आजी - माजी आमदार काल एका स्टेजवर आले होते. या कार्यक्रमात आपापल्या नेत्याच्या बाजूने राष्ट्रवादी कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचीही गर्दी होती.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकमेकांचे तोंड देखील पाहणे टाळत असलेले पवार व पाचर्णे हे तब्बल पाच महिन्यानंतर एकाच स्टेजवर आल्याने राजकीय पटलावर या एकीकरणाची मोठी उत्सुकता होती. 

पत्रकार परिषदा व जाहीर भाषणांतून एकमेकांची उणीदुणी काढताना आणि टीकाटिपण्णी करताना या दोन्हीही नेत्यांनी शेलक्‍या शैलीचा स्वैर वापर केला होता. त्यामुळे या कार्यक्रमातही चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगेल अशी न्हावरेकरांबरोबरच; पंचक्रोशीत उत्सुकता होती.

ही जुगलबंदी अनुभवण्यासाठी राजकीय जाणकारांबरोबरच, हौशी तरूणांनी कार्यक्रमाला मुद्दामहून हजेरी लावली होती. प्रत्यक्षात, या कार्यक्रमात ऍड. अशोक पवार व बाबूराव पाचर्णे यांनी एकमेकांविषयी कुठलेही "आक्षेपार्ह' विधान न करता समयोचित भाषणे करून वेळ मारून नेली. 

सुरवातीला सर्वांचे स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले. त्यावेळी विद्यमान आमदार म्हणून ऍड. पवार यांचे नाव सुरवातीला सत्कारासाठी पुकारताच, त्यांनी ज्येष्ठत्वाचा मान देत अगोदर पाचर्णे यांचा सत्कार करण्यास सुचविले. ऍड. पवार यांच्या या "बॉडी लॅंग्वेज' मुळे कार्यक्रमातील ताण हलका झाला व पुढेही खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रम पार पडला.

ऍड. पवार यांनी चार महिन्यांतील आपल्या कामांचा आढावा घेताना विधीमंडळात सुचविलेल्या; तसेच मंजूरीच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांची माहिती दिली. बाबूराव पाचर्णे यांनीही, आम्ही सत्तेत असताना शिरूर - हवेलीच्या विकासासाठी राज्य शासनाकडून भरीव निधी मिळवला असून, आता अशोकबापू सत्तेत आहेत. त्यांनीही या मतदार संघाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणावा आणि विकास कामांमध्ये गुणवत्ता राखावी, अशा शब्दांत संयमी भूमिका मांडली. 

न्हावरे (ता. शिरूर) येथे पार पडलेल्या विविध विकास कामांच्या भूमीपुजन व उद्‌घाटन समारंभात आमदार अशोक पवार व माजी आमदार बाबूराव पाचर्णे हे मोठ्या कालखंडानंतर एकाच स्टेजवर आले होते. या कामातील काही कामे पाचर्णे यांच्या आमदार निधीतील; तर काही कामे जिल्हा परिषद सदस्या सुजाता पवार यांच्या निधीतील होती. त्यामुळे पाचर्णे व पवार यांना बोलावून न्हावरे ग्रामस्थांनी चांगला समन्वय साधला होता. शिवाय आता अशोक पवार आमदार असल्याने त्यांच्याच हस्ते कामांची उद्‌घाटने करण्याचा "दुरदृष्टीकोन' ही संयोजकांनी राखला होता.

या कार्यक्रमात दोन दिग्गज एकत्र येत असल्याने उत्सूकता होती. शिरूरच्या राजकीय पटलावरील एकमेकांचे राजकीय हाडवैरी समजल्या जाणाऱ्या पवार व पाचर्णे यांच्यातील जुगलबंदी आणि आरोप - प्रत्यारोपांतून रंगणारा राजकीय संघर्ष अनुभवण्यासाठी आलेल्यांचा मात्र हिरमोड झाला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com