Fitness Happiness Article by Sunil Mali | Sarkarnama

आनंदाचा इंडेक्‍स...

सुनील माळी
शनिवार, 4 मार्च 2017

संध्याकाळचे सात वाजत आले होते. त्या कौलारू अन अघळपघळ पसरलेल्या घरासमोरच्या पडवीतल्या छोट्याश्‍या मंदिरात पुजारी मांड ठोकून बसला होता आणि हातातील घंटी हलवत मंत्र म्हणत होता. मंदिराबाहेर पडवीतल्या छतापासून निघालेल्या झिरमिळ्यांमिश्रित दोरीच्या दुसऱ्या टोकाला पाळणा होता अन त्यात पादुका विराजमान होत्या. थोड्यात वेळात पूजा आटोपली अन पुजाऱ्यानं जसा आवाज दिला तशी पडवीपासनं थोडी पांगलेली मंडळी जमा झाली. आरतीचं ताम्हण सज्ज झालं, माजघरातनं बाहेर आणलेल्या पोत्यातल्या टाळ-झांजा प्रत्येकाच्या हाती जाऊ लागल्या अन आरत्यांना सुरवात झाली.

संध्याकाळचे सात वाजत आले होते. त्या कौलारू अन अघळपघळ पसरलेल्या घरासमोरच्या पडवीतल्या छोट्याश्‍या मंदिरात पुजारी मांड ठोकून बसला होता आणि हातातील घंटी हलवत मंत्र म्हणत होता. मंदिराबाहेर पडवीतल्या छतापासून निघालेल्या झिरमिळ्यांमिश्रित दोरीच्या दुसऱ्या टोकाला पाळणा होता अन त्यात पादुका विराजमान होत्या. थोड्यात वेळात पूजा आटोपली अन पुजाऱ्यानं जसा आवाज दिला तशी पडवीपासनं थोडी पांगलेली मंडळी जमा झाली. आरतीचं ताम्हण सज्ज झालं, माजघरातनं बाहेर आणलेल्या पोत्यातल्या टाळ-झांजा प्रत्येकाच्या हाती जाऊ लागल्या अन आरत्यांना सुरवात झाली. यावेळेपर्यंत भलमोठ्ठं चंद्रबिंब पडवीबाहेरच्या माडा-पोफळीच्या पानांतून ठसठशीतपणं दिसू लागलं होतं.

आरत्या संपल्या अन जमलेल्यांनी पाळण्यातील दत्तगुरूंच्या पादुकांवर फुलांचा वर्षाव केला. सुंठवडा अन प्रसाद वाटला गेला अन मग पायाने भाता हलवून स्वरांत प्राण फुंकायचा ऑर्गन कुणीतरी मधोमध मांडला. त्यावर वाडीतल्या म्हाताऱ्या आजोबांनी सूर धरला अन सगळीजणंच त्यांच्या भोवती बसले. एकानं तबल्यावर ताल धरला तर बाकीच्यांच्या हाती टाळ असल्याने भजनी ठेका छान जमला. एकएक जण एकएक अभंग म्हणू लागला. तो समेवर येऊ आला की कोरसमध्ये सगळेजण धृपद म्हणून त्याला साथ देत होते. चंद्र चढत होता तसतसे एकेकांचे आवाज तापू लागत होते. थोड्या वेळानं म्हातारबाबा बाजूला झाले अन दुसऱ्यानं ऑर्गनचा ताबा घेत स्वर लावला. काही वेळानं दुसऱ्यानं तर आणि काही वेळानं तिसऱ्यानं स्वर लावला. अभंगाचंही तसंच होतं. एकाचा अभंग संपला की दुसरा म्हणत होता. सगळ्यांना भरपूर अभंग येत होते अन ते सुरात म्हणतही होते.

र्शीर्ष पौर्णिमेचा हा दत्तजयंतीचा उत्सव रंगला होता तो कोकणातल्या लांजा या तालुक्‍याच्या गावापासनं दहा किलोमीटरवरच्या वनगुळे या गावी. लांजा हे मुंबई-गोवा मार्गावरचं गाव. हायवे सोडून पश्‍चिमेला आपण जसजसं आत जायला लागतो तसतसा निसर्ग दाटून यायला लागतो. छोटी-छोटी गावं मागं पडत जातात, रस्ता चिंचोळा होत जातो. बाणवली नारळ, काजू, पोफळी, रातांबा, फणस, आंबा यांची दाटी असलेल्या वाड्यांमधून आपण आतआत जातो. शहराच्या खुणा पुसट होत संपून जातात आणि आपणही निसर्गाचाच एक भाग होऊन जातो. गाडीचा आवाज, धूर आपण मागंच सोडून पुढं जातो. अवघ्या दीड हजाराची लोकसंख्या असलेलं हे गाव काही वाड्यांमध्ये विखुरलं गेलंय. समोरच्या डोंगरावरून सूर्य उगवतो आणि मागच्या डोंगरामागं मावळताना रंगांची उधळण करतो. पहाटे मोठी पिवळीधम्मक चोच असलेल्या धनेशच्या तीन-चार जोड्या मोठ्या आवाजात कालवा करतात, हळद्यापासून ते शिपाई बुलबुलपर्यंत अन चष्मेवाल्यापासनं हरियलपर्यंतचे पक्षी मंजुळ कुजन करतात. लोकांचा दिवस रानात जातो अन संध्याकाळ एकत्र जमून, सुपारी कातरून अन पान जमवून गप्पा मारण्यात जाते. लोकं खूपच रसिक. त्यामुळं अनेकांची बोटं पेटीवर फिरू लागली की त्यातून वेगवेगळ्या रागांच्या सुरावटी बाहेर येऊ लागतात. त्यावर ते आवाजही साफ करतात. काही जणांचा हात तबल्यावर, मृदुंगावर छान फिरतो.

दत्तजयंतीच्या त्या रात्रीही अशीच पंचवीस-तीस जणांची मैफल शेवड्यांच्या पडवीत जमली होती. जगण्यापुरतंच उत्पन्न असलेली मंडळी त्यात होती. शहरातील मंडळींच्या मानगुटीला उद्याचा एक अदृश्‍य ताण असतो. तोच ताण त्यांच्या कपाळावरच्या आठ्यांमध्ये आधी उतरतो अन नंतर वागणुकीतल्या तुसडेपणात. एकमेकांना मागं खेचण्याची वृत्तीही त्यातनं येते. 'इस शहर में हर शख्स परेशॉं सा क्‍यों हैं', असं आपण मग विचारतं राहातो. वनगुळ्यात रंगलेल्या त्या रात्रीत असा कोणताही तणाव दिसत नव्हता. सणावाराप्रमाणंच प्रत्येक दिवसही तिथली मंडळी आनंदानं, समरसून जगत होती. मला अचानक आठवण झाली ती जगातील सर्वात आनंदी देशाच्या बातमीची. जगातील आनंदाचा इंडेक्‍स सर्वाधिक असलेला देश आहे भूतान. त्यात भले उद्योग मर्यादित असतील, त्यांतील लोकांचे दरडोई उत्पन्न कमी असेल, पण निसर्ग जेवढं देतो त्यात समाधान मानण्याची, आनंदी राहण्याची वृत्ती जगातल्या पहिल्या क्रमांकाची आहे. अमेरिकेतील एक गोष्ट मागं कुठंतरी वाचली होती. एका लहानशा खेड्यात मासे पकडणाऱ्या त्या तरुणाला न्यूयॉर्कमधला तरूण सांगतो, 'तू कर्ज काढून यांत्रिक बोट घे, अधिक मासेमारी करं, पैसे कमव, शहरात ये, आणखी पैसे कमव. एवढे पैसे कमव की तू फार्म हाऊस घेऊन निवांत मासेमारी करीत बस.' त्याला उत्तर देताना तो गावातला तरूण म्हणतो, 'मग मी आता काय करतोय ? मी आताही मासेमारीच करतोय, अन निवांतही आहे...'

वनगुळ्याच्या त्या गावातला आनंदाचा असा इंडेक्‍स मोजला तर तो भूतानएवढा भरेल का नाही, ते माहिती नाही, पण तो निश्‍चितच पुण्या-मुंबईतल्या मंडळींपेक्षा कितीतरी अधिक असेल एवढं नक्की...!

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख