चालणे हा उत्तम व्यायाम : प्रशांत ठाकूर आमदार, पनवेल. - Fitness Funda of Panvel MLA Prashant Thakur | Politics Marathi News - Sarkarnama

चालणे हा उत्तम व्यायाम : प्रशांत ठाकूर आमदार, पनवेल.

सरकारनामा ब्युरो
रविवार, 26 जानेवारी 2020

सकाळी सुमारे ४० मिनिटे चालणे, शक्यतो जिन्याचा वापर करणे, सुदर्शन क्रिया हा आहे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा फिटनेस फंडा

लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना स्वतःचे आरोग्य जपावे लागते. त्यासाठी चालण्याचा व्यायाम माझ्यादृष्टीने अधिक योग्य आहे. त्यामुळेच मी दररोज सकाळी 30 ते 45 मिनिटे चालतो. माझ्या निवासस्थानी सकाळी मित्र मंडळी भेटल्यानंतर गप्पा मारत हा व्यायाम सुरू होतो. पण एवढ्यावरच थांबत नाही. दिवसभरात शक्‍य होईल, त्यावेळी चालण्यास प्राधान्य देतो. कार्यक्रमस्थळी किंवा एखाद्या कार्यालयात जातानाही आरोग्याच्या दृष्टीने इमारतीच्या लिफ्टचा वापर टाळून जिन्यांचा वापर करतो. या चढ-उताराचा खूपच चांगला उपयोग होतो.

माझा व्यायाम एवढ्यावरच थांबत नाही. डॉ. जगन्नाथ दीक्षित यांचा 'डायट प्लॅन' स्वीकारला आहे. त्यानुसार दिवसभरात दोन वेळा जेवतो. 55 मिनिटांच्या आत खाणे संपवणे हा माझा नियम झाला आहे. या दोन नियामांनी आरोग्य चांगले राखण्यास उपयोग होत आहे. त्यानंतरही उच्च रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचा त्रास सुरू आहे. रक्तदाबामुळे रक्तदान करता येत नसल्याने खंत वाटते. दररोजच्या व्यायामाने हे आजार आटोक्‍यात येतील, अशी अपेक्षा आहे.

कामाच्या ताणामुळे शरीरावर ताण येतो. तो कमी करण्यासाठी 'आर्ट ऑफ लिव्हींग'मध्ये 'सुदर्शन क्रिया' शिकलो. ती करतो. त्याचा फायदा होत आहे. कोणत्याही आजाराच्या गोळ्या बंद करण्यासाठी माझा प्रयत्न असतो. खाण्यात शाकाहारी आणि मांसाहारी अन्न घेतो. आठवड्यातून दोन वेळा शाकाहार घेण्याचा प्रयत्न असतो. फार तेलकट पदार्थ खाणे टाळतो. आरोग्य सुदृढ राहवे यासाठी आहारतज्ज्ञांकडून आहार सल्ला घेतो; परंतु व्यस्त कामांमुळे त्याचे तंतोतंत पाळन करता आले नाही. उरणचे आमदार महेश बालदी यांनी तंदुरुस्तीसाठी जपलेली चालण्याची आवड मला भावली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख