'मी माझे नाव मतदार यादीत नोंदविणार' : प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार हमीपत्र - First year students made compolsory to enroll in voters list | Politics Marathi News - Sarkarnama

'मी माझे नाव मतदार यादीत नोंदविणार' : प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना द्यावे लागणार हमीपत्र

विजयकुमार सोनवणे
बुधवार, 17 मे 2017

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींचे 18 वर्षे पूर्ण झालेली असतात. या सर्वांची नावे मतदार यादीत कशा पद्धतीने नोंदविता येतील याबाबत विविध स्तरांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या संदर्भात आदेश काढण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा आदेश जारी केला आहे.

सोलापूर - 'मला वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावर मी माझे नाव मतदार यादीत नोंदवून घेणार आहे. त्यासाठी आवश्‍यक असलेले अर्ज व्यवस्थितपणे भरले आहेत', अशी प्रतिज्ञा सर्वच शाखांसाठी प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना घ्यावी लागणार आहे. इतकेच नव्हे तर तसे हमीपत्र प्रवेश अर्जासोबत द्यावे लागणार आहे. हा आदेश राज्यातील सर्व विद्यापीठे, शासकीय, निमशासकीय व खासगी तंत्रनिकेतन यांनाही बंधनकारक असणार आहे.

आगामी लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला आहे. इयत्ता बारावी उत्तीर्ण बहुतांश विद्यार्थी-विद्यार्थिनींचे 18 वर्षे पूर्ण झालेली असतात. या सर्वांची नावे मतदार यादीत कशा पद्धतीने नोंदविता येतील याबाबत विविध स्तरांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने या संदर्भात आदेश काढण्याची सूचना केली होती. त्यानुसार उच्च व तंत्रशिक्षण विभागाने हा आदेश जारी केला आहे.

प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या अर्जासोबतच हे प्रतिज्ञापत्र नव्याने समाविष्ट केले जाणार आहे. ज्यांचे नाव मतदार यादीत नाही त्यांना हे प्रतिज्ञापत्र हमीसह द्यावे लागणार आहे. ज्यांचे नाव आहे त्यांनी मतदारसंघ व मतदारयादीतील क्रमांक लिहावा लागणार आहे. या कामासाठी महाविद्यालयातील एका प्राध्यापकाची 'नोडल ऑफिसर' म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. जमा झालेले सर्व अर्ज जिल्हाधिकारी किंवा जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत तपासले जाणार आहेत.

मतदार दिनादिवशी वाटणार ओळखपत्र

नव्याने नोंदविण्यात आलेल्या मतदारांचे ओळखपत्र लगेच दिले जाणार आहे. ते शक्‍य न झाल्यास प्रत्येक वर्षी राष्ट्रीय मतदार दिनादिवशी (25 जानेवारी) ओळखपत्र वाटपाचे नियोजन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख