गुलाबराव पाटलांना पहिल्यांदाच `या रूपात` जळगावकरांनी पाहिले....

....
gulabrao patil as gaurdian minister of jalgaon
gulabrao patil as gaurdian minister of jalgaon

जळगाव : "अध्यक्ष महोदय, आमच्या भागात विजेची समस्या आहे, दिवसा वीज गायब असते, शेतकऱ्यांना रात्री शेतात जावे लागते, वीज मंडळ अधिकारी करतात काय, जर शेतकऱ्याच्या विजेचा प्रश्‍न सुटला नाही, तर आपण वीज मंडळ कार्यालयावर ऱ्हुमणे मोर्चा काढणार आहोत. यावेळी काही कमी जास्त झालं तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, हा आपला इशारा समजा,'' असा धारदार आवाज जिल्हा नियोजन मंडळाच्या सभेत एकेकाळी घुमत होता. पीठासीन अध्यक्षांना ते घाम फोडत होते. आज त्याच गुलाबराव पाटील यांचा धारदार आवाज पालकमंत्री म्हणून याच सभेत व्यासपीठावरून घुमला. त्यामुळे त्यांच्या या पहिल्या सभेत जनतेच्या प्रश्‍नाची किती तड लागणार, याकडेच सर्वांचे लक्ष होते. जळगाव जिल्हा नियोजन समितीची सभा आज ) दुपारी एकला सुरू झाली.

ग्रामीण भागात कार्य केलेले आणि शिवसैनिक म्हणून थेट जनतेचे प्रश्‍न माहीत असलेले गुलाबराव पाटील हे जनतेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी नेहमीच आक्रमक राहिले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्‍न हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अगदी शेतकऱ्यांना वीज मिळण्यासाठी त्यांनी अनेक वेळा वीज मंडळ कार्यालयावर मोर्चे काढले आहेत. जिल्हा रुग्णालयात जनतेच्या मिळणाऱ्या सुविधेवरही त्यांनी वेळोवेळी आसूड ओढले आहेत. यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाईही झाली आहे. परंतु त्यांनी त्यांची चिंता केली नसल्याचे दिसून आले आहे.

जिल्हा नियोजन मंडळाची सभा म्हणजे जिल्ह्यातील आणि मतदार संघातील जनतेचे प्रश्‍न मांडण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणून त्यांचा उपयोग त्यांनी चांगल्या पद्धतीने केला. पालकमंत्री म्हणून पीठासीन अध्यक्ष कोणीही असले तरी आक्रमकपणे प्रश्‍न ते मांडत होते. अगदी पीठासीन अध्यक्षांनाही ते घाम फोडत होते. त्यामुळे जिल्हा नियोजन सभेत गुलाबराव पाटलांची उपस्थिती म्हणजे जनतेच्या प्रश्‍नावर सभा वादळी होणार हे समीकरण ठरलेलेच होते.

विरोधात असताना अधिकारी आणि गुलाबराव पाटील यांचे विळ्याभोपळ्याचे नाते मानले जात होते. जनतेचे प्रश्‍न सुटले नाही, तर त्या अधिकाऱ्यावर ते सडकून टीका करीत होते, वेळप्रसंगी दणकाही दिला आहे. आता कॅबिनेट मंत्री झाल्यावरही त्यांनी पहिल्याच मुलाखतीत "मस्तवाल अधिकाऱ्यांना वठणीवर आणू, असा इशारा दिला आहे.

आज जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन मंडळाचे ते अध्यक्ष आहेत. प्रथमच त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा होत आहे. त्यामुळे आजच्या सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे सदस्य सत्तेत त्यांच्या सोबत आहे. परंतु एकेकाळी शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला भाजप आज त्यांच्यासमोर विरोधी असणार आहे. त्यामुळे अध्यक्ष म्हणून गुलाबराव पाटील प्रश्‍नाची तड लावण्यासाठी प्रशासनावर कसा वचक ठेवणार याबाबतच आजच्या सभेकडे लक्ष असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com