First Three Corona Victims in Pimpri Tested Negative | Sarkarnama

पिंपरीत पहिल्या कोरोनाबाधित तीन रुग्णांचे चौदा दिवसांनंतरचे रिपोर्ट 'निगेटीव्ह' 

दिलीप कांबळे
गुरुवार, 26 मार्च 2020

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे पहिले पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन पुरुष रुग्णांचे चौदा दिवसांनंतरचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. शहरवासीयांसाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे पहिले पॉझिटीव्ह आढळलेल्या तीन पुरुष रुग्णांचे चौदा दिवसांनंतरचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. शहरवासीयांसाठी मोठी दिलासा देणारी ही बातमी आहे. आज त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने आणखीन एकदा  तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात येणार आहेत. हे रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे. 

पिंपरी-चिंचवड शहरात बारा मार्च रोजी हे तीन पॉझिटीव्ह रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाबधित हे पहिले रुग्ण होते. त्यानंतर शहरातील रुग्णांचा आकडा वाढत जात असल्याने राज्याचे शहराकडे लक्ष लागले होते. परंतु, त्यानंतर महापालिकेने केलेल्या प्रभावी उपाययोजनांमुळे रुग्णांची संख्या वाढली नाही. या पहिल्या पॉझिटीव्ह तीन रुग्णांचे चौदा दिवस पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीसाठी ‘एनआयव्ही’कडे पाठविण्यात आले होते. त्यांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. आज पुन्हा एकदा  या तिघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. या तपासणीत देखील रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर हे रुग्ण पूर्णपणे ‘कोरोनामुक्त’ असल्याचे स्पष्ट होईल. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येणार आहे.

दरम्यान, कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या सहा संशयितांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. काल दहा जणांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’  आले होते. तर, कोरोना बाधित असलेल्या बारा जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील पाच दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटीव्ह‘  रुग्ण आढळला नाही.  शहरवासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख