पहिलं पाऊल - अपघाताने राजकारणात आले अन्‌ लोकसेवेसाठी थेट आमदार झाले - दीपिका चव्हाण - First Step in Politics MLA Deepika Chavan Baglan | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

उर्मिला मातोंडकर मातोश्रीवर दाखल

पहिलं पाऊल - अपघाताने राजकारणात आले अन्‌ लोकसेवेसाठी थेट आमदार झाले - दीपिका चव्हाण

दीपिका चव्हाण, आमदार (शब्दांकन - संपत देवगिरे)
गुरुवार, 17 मे 2018

राजकारणात समर्थक आणि विरोधक दोन्हीही असतात. विरोधकांच्या कारस्थानांमुळे पती संजय चव्हाण यांची उमेदवारी अडचणीत आली. त्यामुळे पती व कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे मी 2014 मध्ये बागलाण विधानसभा मतदारसंघातुन उमेदवारी अर्ज दाखल केला. सगळ्यांच्या पाठिंब्याने आमदार झाले. खरे सांगायचे तर मी कधी नगरपालिकेची निवडणुक लढवायचाही विचार केला नव्हता. मात्र, राजकीय अपघातातून आमदार झाले. आता जी संधी मतदारांनी दिली आहे, तिच्या माध्यमातुन मी मतदारसंघ आणि तालुक्‍याच्या विकासासाठी परिश्रम घेत आहे. सगळ्यांच्या सहकार्याने मी त्यात नक्की यशस्वी होईल यात शंका नाही. - आमदार दीपिका चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस बागलाण 

माझे माहेर झोडगे (ता. मालेगाव) येथील आहे. ते मोठे खटल्याचे घर आहे. मला सहा काका असल्याने सात भावंडाचे कुटुंब आहे. बहुतांश काका नोकरीत आहेत. वडील सुखलाल मोतीराम भामरे यांचे हॉटेल आहे. तीन बहिणी, एक भाऊ आहे. मात्र, यातील कोणाचाही राजकारणाशी संबंध आलेला नव्हता. 

माझे बारावी पर्यंतचे शिक्षण झोडगे येथे तर महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण सटाण्यात झाले. 1993 मध्ये माझा विवाह नात्यातीलच संजय चव्हाण यांच्याशी झाला. त्यानंतर माझा राजकारणाशी जवळून संपर्क आला. माझे सासरे कांतीलाल लक्ष्मण चव्हाण हे नगरसेवक होते. त्याहीपेक्षा समाजात त्यांचा मोठा वावर होता. शहरात त्यांचे हॉटेल असल्याने अनेकांशी त्यांचा निकटचा परिचय होता. विवाह, मृत्यु अशा प्रत्येक सुखदुःखात ते धावून जात. परिसरात त्यांना सगळेच सन्मान देत असत. आजही प्रचारात असो वा सामाजात वावरतांना अनेक ज्येष्ठ मंडळी आम्हाला त्यांच्याविषयी सांगतात. त्यांच्या कार्याचा वारसा आमच्या कुुटंबाला मिळाला आहे. 

विवाहानंतर मी सटाण्याला सासरी आले. तिथे मात्र सगळेच कुटुंब व्यवसाय, सामाजिक आणि राजकारणात सक्रीय असल्याने घरी- दारी प्रचंड वर्दळ. मला अनेकदा दबाव यायचा. मात्र, हळूहळू मी त्यात रमले. पती नगरापलिकेच्या निवडणुकीला उभे राहिल्यावर आमचे सबंध कुटुंब प्रचारात सक्रीय  असे. त्यात मला पहिल्यांदा घरोघर जाऊन लोकांशी संपर्काची संधी मिळाली. त्यानंतर सासुबाई सुलोचना चव्हाण नगरपालिका निवडणुकीत उतरल्या. त्यांच्या प्रचारात मी खुप परिश्रम घेतले. 

माझे पती संजय चव्हाण सटाण्याचे नगराध्यक्ष होते. विवाहानंतर लगेचच पुढच्या वर्षी त्यांनी 1995 मध्ये विधानसभेची उमेदवारी केली. त्यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मी पहिल्यांदा पतीला राजकीय मदतीसाठी घराबाहेर पाऊल टाकले. त्यावेळी ते पराभूत झाले. पुन्हा 1999 मध्ये पुन्हा विधानसभेची उमेदवारी केली. मात्र तेव्हाही त्यांना यश आले नाही. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा अपक्ष उमेदवारी केली व ते आमदार झाले. त्यानंतरच्या निवडणुकीत 2009 मध्ये मात्र ते पराभूत झाले. या कालावधीत त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राचे विरोधकांनी सातत्याने राजकीय हेतुने प्रेरीत होऊन वादळ उठवले. हे प्रकरण न्यायालयात देखील गेले. 2014 च्या निवडणुकीत त्याची अडचण झाली. पती आमदार संजय चव्हाण यांनी माझ्यासमोर निवडणुकीचा पर्याय ठेवला. कुटुंबीयांचा खुप आग्रह केला. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी घेतली. मला सदुसष्ट हजार मते मिळाली. सबंध तालुक्‍याच्या जनतेने व्यक्त केलेला हा विश्‍वास होता. 

निवडून आल्यावर ज्या सदुसष्ट हजार मतदारांनी मला मतदान केले त्यांच्याकडे मी जबाबदारी म्हणुन पाहते. एका सामान्य कुटुंबातील मुलगी, जिला राजकारण कशाशी खातात हे देखील माहिती नाही ती आमदार झाली. हे मला स्वप्नातही वाटले नव्हते. आमचा तालुका प्रगत. मात्र, आदिवासी आहे. सर्व प्रकारचे समाज घटक येथे आहेत. एकेकाळी जिल्ह्याचे नेतृत्व या तालुक्‍याने केले आहे. ती प्रतिष्ठा पुन्हा मिळावी यासाठी आम्ही सगळे मिळून काम करतो. राजकीय वादापेक्षा विकासासाठी राजकारण करतो. शेतीला बारमाही पाणी, वाड्या- पाड्यावर रस्ते, सभामंडप, रोजगार, शिक्षणाच्या सुविधा अद्ययावत करणे यासाठी पाठपुरावा करत आहे. यासंदर्भात तालुक्‍यातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आम्ही घेतो. 

ज्येष्ठ नेते शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रियाताई सुळे माझे राजाकरणातील 'आयडॉल' आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श व मार्गाने जाऊन बागलाण हा आदर्श मतदारसंघ बनविण्याचा व येथील नागरिकांचे समाधान करण्याचा ध्यास घेऊन सगळ्यांच्या आर्शिवादाने मी काम करणार आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख