first patient of corona celebrated 25 marriage anniversary in Dubai but next days horrible | Sarkarnama

लग्नाचा 25वा वाढदिवस दुबईत; पण त्यानंतरचे 25 दिवस काटा आणणारे : पहिल्या कोरोना पेशंटची कहाणी

ज्ञानेश सावंत
बुधवार, 25 मार्च 2020

राज्यात पुण्यातील एका दांपत्याला कोरोना असल्याचे सर्वप्रथम लक्षात आले. त्यानंतर राज्यात नवीन लढाई जनतेची सुरू झाली. या दांपत्यालाही मोठ्या ताणतणावात जावे लागले. कारण वेळच तशी होती. 

पुणे : ``मी आणि ती पंचवीस वर्षापूर्वी बोहल्यावर चढलो; इतक्या वर्षात आम्ही कधीच सलग पंचवीस दिवसही एकमेकांसह मुलांसमवेत घालविले नाहीत. कारणही तसचे माझी नोकरी: मला परराज्यांत जावं लागायचं तेव्हा, 'ही' (म्हणजे माझी बायको समजून घ्यायची, पण मुलांचे काय?)... पण, आम्हाला कोरोना झाल्याचे उघड झालं; मग, ती अन मी डॉ. नायडूतल्या एका खोलीत बंद झालो...``राज्यातील पहिला कोरोना रुग्ण सांगत होता.

त्यांचे हे दुर्देव तेथेच थांबले नाही. त्यांच्या दोन मुलांनाही याच संकटातून जावे लागले. त्यांची दोन्ही मुले अजूनही पुणे महापालिकेच्या नायडू रुग्णालयात आहेत. त्यांना आता गुरूवारी (ता. 26) सोडण्यात येणार आहे. या दोन मुलांपैकी मुलीगी कोरोना पाॅझिटिव्ह सापडली. मुलगा निगेटिव्ह आहे. मात्र तो क्वारंटाईन आहे. मुलीवर नायडू रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नऊ तारखेला पुण्यात उपचारासाठी दाखल होणे आज गुढिपाडव्याच्या दिवशी सुटका होणे असे सतरा दिवस या दांपत्याने लढा दिला.

हे दांपत्य आपल्या लग्नाचा 25 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुबईला गेले होते. सोबत मुलीलाही नेले होते. मुलगा पुण्यातच होता. लग्नाचा वाढदिवस साजरा केल्यानंतर आपल्यावर एवढे मोठे संकट येईल. याची त्यांना जाणीव नव्हती. पुण्यात आल्यानंतर त्यांना कफ आणि तापाचा थोडा त्रास सुरू झाला. सामान्य माणसासाठी नेहमीचा असलेला आजार आपल्यावर एवढे मोठे संकट घेऊन येईल, याची त्यांना कल्पनाच नव्हती. कोरोना तपासणी पाॅझिटिव्ह आल्यानंतर ते दोघे नायडूत दाखल झाले. एकमेकांना आधार देण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र मुलगीही पाॅझिटिव्ह आल्याचे समजल्यानंतर ते पण ताणात होते. पण पुढच्या १७ दिवसांत लेकीनं सावरलं अन आम्ही स्वतःला आवरलं, असे या दांपत्याने सांगितले.

दुबईतून आल्यानंतर आठवडाभर संपर्कात राहिलेल्या त्यांच्या मुलाच्या तपासणीचा रिपोर्ट मात्र, 'निगेटिव्ह' आला. तरीही त्यालाही १४ दिवस डॉ. नायडूत राहावे लागले. तेव्हापासून हे चौघेजण याच हॉस्पिटलमध्ये होते. या सगळ्याजणांवर सलग सतरा दिवस उपचार झाल्यानंतर ते बरे झाले ; या दाम्पत्याच्या शेवटच्या टप्प्यातील दोन्ही अहवाल 'निगेटिव्ह' आले आणि त्या गुढिपाडव्याच्या दिवशी म्हणजे, बुधवारी दुपारी त्यांना घरी सोडण्यात आले. मुलांना उद्या सोडण्याची आशा त्यांना आहे.

"गेल्या सतरा दिवसांत आम्ही एकमेकांना वेळा दिला. मित्रांनी दिलेल्या १२ पुस्तकांपैकी ६ पुस्तके आम्ही वाचली. हा काळ आम्ही छान घालविला. तेव्हा महापालिकेच्या डॉक्टरांची मोठी मदत मिळेल," हेही दांम्पत्य सांगायला विसरले नाहीत.

या दाम्पत्याला सुरवातीला एका खोली ठेवण्यात आले. तेव्हा त्यांची लेक मात्र, पाच-सहा फूट अंतरावरील एका खोलीत होती. या काळात ते एकमेकांना खोलीच्या दरवाज्याच्या काचेतून पाहायचे आणि जेवण कर, वाचन कर हे इशाऱ्यातून सांगायचे. सातव्या दिवशी मात्र तिघेही जनरल वॉर्डमध्ये आले. आता त्यातील दोघांची सुटका झाली. मुलगीही लवकरच घऱी जाईल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख