देशातील पहिली दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी : प्रांजल पाटील - First Blind IAS | Politics Marathi News - Sarkarnama

देशातील पहिली दृष्टिहीन विद्यार्थिनी जिल्हाधिकारी : प्रांजल पाटील

प्रशांत कोतकर
गुरुवार, 1 जून 2017

प्रांजलचे यश संबंध भारतातील मुलींसाठी प्रेरणादायी आहे. मागील वर्षी त्यांना भारतीय कस्टम सेवेत पद मिळाले परंतु जिद्दीच्या बळावर तिने आय ए एस चे शिखर सर केले. तिच्याकडून प्रेरणा घेऊन अल्पना दुबे या अंध भगिनीने यश मिळविले आहे. दुर्दम्य इच्छाशक्तीचे जिवंत उदाहरण या दोन्ही मुली आहेत.
- यजुर्वेन्द्र महाजन, संचालक, मनोबल प्रकल्प, जळगाव

नाशिक -  दृष्टिहीन असलेली प्रांजल लहेनसिंग पाटील (वय 28) ह्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत 124 गुणानुक्रमाने उत्तीर्ण झाली आहे. एका असामान्य जिद्दीचे हे आपल्या देशातील एकमेवद्वितीय असे उदाहरण आहे. अंध विद्यार्थ्यांमधून महाराष्ट्रातून 'आय ए एस' साठी पात्र ठरणारी ती पहिली महिला ठरली आहे. मागील वर्षी याच परीक्षेत 774 गुणानुक्रमाने त्या उत्तीर्ण झाल्या होत्या. भारतीय रेल्वे सेवेत त्यांची निवड नाकारली होती. त्यांना कस्टम सेवा मिळाली होती. यावेळी 'सकाळ' ने वृत्त प्रसिद्धकरून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली होती.

मलकापूर तालुक्‍यातील वडजी हे प्रांजल चे मूळ गाव. लहानपणापासून नजर कमकुवत असल्याने शालेय जीवनातच प्रांजलला अंधत्व आले. मात्र, आई- वडिलांच्या प्रोत्साहनाने प्रांजलने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. बी. ए. मध्ये विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान तिने मिळविला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेत यश मिळविण्यासाठी प्रांजलीने प्रयत्न सुरू केले. आज तिच्या मेहनतीला यश आले आणि दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) निवड चाचणीत हजारो मुलांच्या निवडीतून प्रांजलची निवड झाली. 'जेएनयू' तून तिने एमए., एम. फिल केले. याच विद्यापीठात सध्या 'आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयात ती पीएच.डी. करीत आहे.

'प्रांजल'ने कोणताही खासगी क्‍लास न लावता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. खानदेशातील भुसावळ तालुक्‍यातील ओझरखेडा हे तिचे सासर, सध्या ती पती कोमलसिंग पाटील यांच्या समवेत उल्हासनगर येथे स्थायिक आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात राहूनच तिने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. अभ्यासाशी नेहमी मैत्री केल्याने आजवरचा प्रवास आनंददायी ठरला आहे. दोन्ही डोळ्यांना अंधत्व असल्याने, अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु, आई-वडील आणि पतीच्या साथीने यश मिळाले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख