ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा - FIR registered against MNS workers | Politics Marathi News - Sarkarnama

ठाणे रेल्वे स्थानकातील फेरीवाल्यांना हुसकावल्याप्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा

श्रीकांत सावंत
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

ठाणे रेल्वे स्थानक परिसर आणि सॅटीस परिसरामध्ये अनधिकृतपणे बाकडे टाकून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्यानंतर या विरोधात पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसर आणि सॅटीस परिसरामध्ये अनधिकृतपणे बाकडे टाकून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना मनसे कार्यकर्त्यांनी हुसकावून लावल्यानंतर या विरोधात पोलिसांकडून मनसे कार्यकर्त्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. 

ठाणेनगर पोलिस ठाणे आणि नौपाडा पोलिसांच्या हद्दीमध्ये हा प्रकार घडल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचे नुकसान केल्याचे तसेच गैर कायद्याची मंडळी जमवून आयुक्तांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल करण्यात आला आहे. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचा फटका स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना बसला असून त्यांच्यावतीने थेट पोलिसांनीच तक्रारी केल्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

एल्फिस्टन येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चानंतर रेल्वे प्रशासनाला 15 दिवसांमध्ये फेरीवाल्यांना हटवण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानंतर स्थानक परिसरातील अनेक फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली होती. परंतु तरीही ठाणे स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात फेरीवाले बसत असल्याचे स्पष्ट झाले होते. 

मनसे अध्यक्षांनी दिलेल्या 15 दिवसांची मुदत संपल्यानंतर शनिवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना हुसकावण्यास सुरूवात केली. रेल्वे पादचारी पुल, सॅटीस, सॅटीसखालील जागा, बस थांबा आणि स्टेशन प्रवेश द्वारावर उभ्या असलेल्या फेरीवाल्यांना मनसैनिकांनी हुसकावण्यास सुरूवात केली. होती. फेरीवाल्यांच्या माल रस्त्यावर फेकरणे, त्यांची बाकड्यांची तोडफोड करणे, फेरीवाल्यांना मारहाण करणे आणि धमकावण्याचे प्रकार मनसे पदाधिकाऱ्यांनी केली होती. 

या प्रकारानंतर ठाणे पोलीसांतील नौपाडा आणि ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. या प्रकरणी पोलीस प्रशासनाने मनसे पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची हालचाल सुरू केली होती. दुपारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

न्युज चॅनलवरील बातमी पाहून नावांचा शोध...
मनसेच्या दहा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी त्यामध्ये प्रामुख्याने शहराध्यक्ष अविनाश जाधव, आशिष डोके, रविंद्र सोनार, महेश कदम, सुशांत सुर्यराव, रविंद्र मोरे, विश्वजीत जाधव यांच्या नावाचा उल्लेख पोलीसांकडून दाखल गुन्ह्यात करण्यात आला आहे. ठाणे नगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक जयवंत पाटील, तर नौपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक हणमंत ओवुळकर यांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. फेरीवाल्यांना धमकावणे, हुसकावणे, या प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्युज चॅनलवर सुरू असलेल्या बातम्यांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावाही ठाणे नगर पोलिसांनी दाखल एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख