लाॅकडाऊनमध्ये मोकाट फिरणाऱ्या माजी खासदाराच्या पीएसह 1000 लोकांवर नगरमध्ये गुन्हे दाखल

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असताना, अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक जण मोकाट फिरताना आढळून आले. आज शहरात 150 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आतापर्यंत जनता कर्फ्यु लागू झाल्यापासून शहरात सुमारे एक हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
fir registered against 1000 persons in nagar
fir registered against 1000 persons in nagar

नगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असताना, अत्यावश्‍यक सेवेच्या नावाखाली अनेक जण मोकाट फिरताना आढळून आले. आज शहरात 150 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. आतापर्यंत जनता कर्फ्यु लागू झाल्यापासून शहरात सुमारे एक हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

दरम्यान, नगर शहरात "वैद्यकीय सेवा', "प्रेस', "माजी खासदार' असे फलक वाहनांवर लावून शहरात फिरणाऱ्यांवर प्रशासनाने आज कारवाई केली. त्यात एका माजी खासदाराच्या वाहनचालक व कार्यकर्त्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात संचारबंदी असताना, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्या कमी नाही. नगर शहरात एक हजार लोकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे नोंदविले आहेत. आज सकाळी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनाच एका माजी खासदाराचे वाहन घेऊन कार्यकर्ता जाताना दिसला. पोलिसांनी त्याला अडवून माजी खासदाराचा स्वीय सहायक व चालकाविरुद्ध कारवाई केली. तसेच, दोन वर्षांपूर्वी वृत्तपत्रात काम करीत असल्याचे ओळखपत्र दाखवून फिरणाऱ्यांवरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अत्यावश्‍यक कामाच्या बहाण्याने फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. 
 
विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून आढावा
नाशिक विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी आज जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयास भेट देऊन कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर बंदोबस्ताचा आढावा घेतला. नूतन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित होते. नूतन पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी काल (गुरुवारी) पदभार स्वीकारला. विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी आज पोलिस अधीक्षक कार्यालयास भेट दिली. जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी असल्याने ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त दिला आहे. बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दलाचे 600 जवान जिल्ह्यात तैनात करण्यात आले आहेत. याबाबत दोरजे यांनी आढावा घेतला.  

पारनेरमध्ये तिघांविरुद्ध गुन्हे
जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पारनेर पोलिसांनी तिघांविरोधात आदेशभंग व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत तहसीलदार ज्योती देवरे यांनी फिर्याद दिली. संचारबंदीचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. 

पोलिसांशी हुज्जत पडली महागात
कोपरगाव शहरातील खाटीक गल्ली परिसरात पोलिस, महसूल व आरोग्य विभागातर्फे पेट्रोलिंग सुरू असताना संचारबंदीचे उल्लंघन करून पोलिसांशी हुज्जत घालणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप प्रभाकर लचुरे, रवींद्र दीपक लचुरे, दीपाली संदीप लचुरे (सर्व रा. खाटीक गल्ली, कोपरगाव) यांच्यावर पोलिस नाईक अर्जुन दारकुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी तोंडाला मास्क न लावता विनाकारण गर्दी केली होती. 

विनाकारण फिरणाऱ्या 11 जणांवर गुन्हा
संगमनेर येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊनच्या काळात, जिल्हाधिकाऱ्यांच्या संचारबंदीच्या आदेशाचा भंग करून शहरातील रस्त्यांवरून विनाकारण फिरणाऱ्या 11 युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने आजपासून रविवारपर्यंत संगमनेर शहरात 100 टक्के लॉक डाऊन व संचारबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. पहाटे शहरातील मालदाड रस्ता, तसेच मुख्य मार्गावर जॉगिंग करणारे वयस्कर नागरिक व काही युवकांना पोलिस पथकाने ताब्यात घेतले. त्यांची पोलिस ठाण्यात चौकशी करून महत्त्वाच्या कारणाशिवाय फिरणाऱ्या 11 युवकांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 
 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com