सचिवाच्या अपहरणप्रकरणी पानसरे व नाहाटांवर गुन्हा

सचिवाच्या अपहरणप्रकरणी पानसरे व नाहाटांवर गुन्हा

श्रीगोंदे : जिल्हा सहकारी बॅंकेच्या निवडणुकीसाठी कोथूळ सेवा संस्थेचा मतदान प्रतिनिधी पाठविण्यासाठी करण्यात येणारा ठराव, बैठक घेऊ नये, या हेतूनेच अपहरण केल्याचा दावा करीत संस्थेचे सचिव राजेंद्र मधुकर खोल्लम यांनी बेलवंडी पोलिसात फिर्याद दिली.

जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रेय पानसरे व राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा यांच्यासह आठ जणांनी अपहरण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप खोल्लम यांनी केला. त्यावरून आठ जणांविरुद्ध रविवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

"सकाळ'ने कोथूळ सेवा संस्थेच्या ठरावावेळी सचिवच गायब असल्याचे वृत्त आज प्रसिद्ध केले आहे. बॅंकेच्या या ठरावात गोंधळ व दादागिरी होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. खोल्लम यांच्या पत्नीने ते हरवल्याची तक्रार पोलिसात दिली होती. आरोपींनी दबाव आणल्यानेच आपण पोलिसांना दूरध्वनीवरून खोटा जबाब दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

खोल्लम यांनी फिर्यादीत म्हटले आहे, की आरोपी जिल्हा बॅंकेचे संचालक दत्तात्रय भाऊसाहेब पानसरे, राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब ऊर्फ प्रवीणकुमार बन्सीलाल नाहाटा यांच्यासह कल्याण बाबासाहेब शिंदे, धनंजय सुधाकर लाटे, विजय पाटोळे, महेश पानसरे, बाजीराव कळमकर, अमोल लाटे यांनी आपले अपहरण करून पुणे येथील कृषी विद्यापीठाच्या खोलीत बंद करून ठेवले होते. कोथूळ सेवा संस्थेची बॅंक ठरावासाठीची बैठक घेऊ नये, असा या आरोपींचा आपल्यावर दबाव होता.
पिंपळगाव पिसे येथील आपल्या घरातून आरोपींनी बोलावून नेले. नंतर मोटारीतून (एमएच 16 बीएच 6666) पुण्याच्या दिशेने घेऊन गेले. बैठक घेतली तर मोटारीखाली घालून मारून टाकू, अशी दमबाजीही त्यांनी केली. मात्र, त्यांचे न ऐकल्याने माझे अपहरण केले. नंतर पोलिसांना स्वत:हून निघून गेल्याचे सांगण्यासाठी आरोपींनी दबाव आणला. पानसरे, नाहाटा व इतरांनी बळजबरीने सेवा संस्थेच्या सचिवपदाचा राजीनामा लिहून घेतल्याचा आरोपही त्यांनी फिर्यादीत केला आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com