आमदार सुनील केदारांवर सिल्लेवाडा प्रकरणात गुन्हा दाखल

आमदार सुनील केदारांवर सिल्लेवाडा प्रकरणात गुन्हा दाखल

खापरखेडा : सिल्लेवाडा स्टार बससेवा उद्‌घाटन सोहळ्याचा वाद अधिकच चिघळला आहे. शनिवारी निषेध सभेत ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेचा वापर केल्याची तक्रार सरपंच प्रमिला बागडे यांनी केली आहे. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी तंबाखे यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, डॉ. राजीव पोतदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार सुनील केदार यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सिल्लेवाडा येथील "झेंडे लावा' आंदोलनासाठी स्थानिक लाल चौकात भाजपने सभा घेतली होती. या सभेत तंबाखे यांनी सरपंचाविरुद्ध अश्‍लील भाषेचा वापर केल्यामुळे विनयभंग व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन खापरखेडा ठाणेदारांना देण्यात आले.

महिला सरपंच बागडे या कायद्यानुसार दिलेल्या अधिकारामुळे 2017 मध्ये थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. गुरुवारी आमदार केदार बससेवेचे अधिकृत उद्‌घाटन करणार होते. मात्र, तंबाखे यांनी भाजपला श्रेय देण्यासाठी जिल्हाध्यक्ष डॉ. पोतदार यांच्या हस्ते आधीच उद्‌घाटन करून घेतले. या कार्यक्रमात सरपंचांना बोलाविले नसल्याचा आरोप बागडे यांनी केला. यावरून दोन्ही पक्षांत वाद वाढत गेला. याच कार्यक्रमात केदार यांच्या भाषणाची व्हिडिओ क्‍लिप व्हायरल झाली. यानंतर शनिवारी भाजपने "झेंडे लावा' आंदोलन केले. येथे तंबाखे यांच्या अश्‍लील भाषणाची क्‍लिपही व्हायरल झाली आहे.

ग्रामपंचायत सदस्य तंबाखे भाजपमधून निलंबित
सिल्लेवाड्याच्या महिला सरपंचांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य ग्रामपंचायत सदस्य तंबाखे यांना चांगलेच भोवले. या प्रकाराची तक्रार दाखल झाली आहे. एखाद्या महिला सरपंचाबद्दल अशा प्रकारचे मानहानी, बदनामी, निंदानालस्ती व अपमान करणारे कोणतेही वक्तव्य किंवा कृत्य भाजप कधीच सहन करीत नाही. त्यामुळे तंबाखे यांना भाजपमधून निलंबित करण्यात येत आहे. यासंदर्भात पूर्ण सत्यता जाणून घेऊन पक्षातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल. यासंदर्भात पोलिस प्रशासनाने कायदेशीर कार्यवाही करावी, असे भाजपचे नागपूर जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी कळविले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com